मुंबईतील एका व्यक्तीने आपल्या आजीसाठी अॅमेझॉनवरुन एक फोन मागवला होता. मात्र, त्याला त्याच्या ऑर्डरची डिलिव्हरी मिळाली नाही. त्याच्या ऑर्डरचं पार्सल सोसायटीच्या गेटवरुनच चोरी झालं. या प्रकारामुळं भडकलेल्या मुंबईकर तरुणानं थेट अमेरिकेत राहणाऱ्या अॅमेझॉनच्या सीईओ जेफ बेझोस यांना ई-मेलद्वारे तक्रार केली. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे बेजोस यांनी हा ई-मेल केवळ वाचलाच नाही तर अॅमेझॉनच्या टीमला तात्काळ त्याची अडचण दूर करण्याचे आदेश दिले. अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांनी काही दिवसांतच त्या व्यक्तीशी संपर्क केला आणि त्याची अडचण दूर केली.

मुंबईच्या ओंकार हणमंते यांनी अॅमेझॉनच्या वेबसाईटवरुन आपल्या आजीसाठी नोकियाचा बेसिक फोन ऑर्डर केला होता. मात्र, त्यांना अनेक दिवस झाले तरी डिलिव्हरी मिळाली नाही उलट वेबसाईटवर त्याची डिलिव्हरी झाल्याचे स्टेटस दाखवले जात आहे. हे पाहिल्यानंतर भडकलेल्या ओंकार यांनी थेट अॅमेझॉनच्या सीईओलाच ई-मेलद्वारे तक्रार केली.

ई-मेलमध्ये काय म्हटलंय?

हाय जेफ,

मला आशा आहे की आपण चांगले असाल.

मी आपली ग्राहक सेवा आणि डिलिव्हरी सुविधेबाबत नाराज आहे. मी अॅमेझॉनवरुन एक फोन ऑर्डर केला, जो मला अद्याप मिळालेला नाही. तो माझ्या सोसायटीच्या दारावरच ठेवण्यात आला, तिथून तो चोरी झाला. मला या डिलिव्हरीबाबत एक फोनही आला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, तुमची कस्टमर सर्व्हिस टीम नेहमीच मला याची चौकशी सुरु असल्याचे आणि मी बॉटशी बोलत असल्याचे उत्तर देत आहे.

पाकीट झालं होतं चोरी

जेव्हा या प्रकरणाची चौकशी झाली तेव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दिसून आलं की, डिलिव्हरी बॉयने ओंकारच्या हातात पार्सल देण्याऐवजी ते दारातच ठेवलं. त्यानंतर एका व्यक्तीने ते चोरी करत तिथून निघून गेला.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस स्वतः ग्राहकांचे मेल चेक करत नसतीलच. पण चांगली गोष्ट ही आहे की, त्यांची टीम असे महत्वाचे मेल पाहते आणि त्याला उत्तरही देते. बेझोस यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, ते आपल्या ग्राहकांचे ई-मेल आता स्वतः वाचतात. जर ते सरळ उत्तर देऊ शकत नसतील तर तो संबंधित विभागाकडे फॉरवर्ड करतात.