रस्त्यावरचे खड्डे ही समस्या काही आपल्याला नवी नाही. जणू रस्त्यावरचे खड्डे आपल्या पाचवीलाच पूजले आहेत. असो, तर काही दिवसांत पावसाळ्याला सुरूवात होईल तेव्हा हळूहळू खड्ड्यांची समस्या डोकं वर काढेल. रस्त्यात खड्डा? की खड्ड्यात रस्ते? हा दरवर्षीचा प्रश्न पुन्हा आपल्याला सतावेल. रस्त्यातील खड्ड्यांमुळे जीव अगदी नकोसा होईल, याचे हकनाक बळी जातील. प्रशासन मात्र आम्ही पावसाआधी खड्डे बुजवू असं आश्वासनाचं ‘गाजर’ आपल्याला दाखवेल. पण थोडक्यात काय तर आपण कितीही आटापीटा केला तरी रस्त्यातील खड्ड्यांची समस्या काही आपला पिच्छा सोडणार नाही.

कित्येकांनी पुढाकार घेऊन या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी  प्रयत्न केला. कोणी तीव्र शब्दात निषेध केला तर कोणी शांततेचा मार्ग निवडला. कोण्या भल्या कलाकारानं या खड्ड्याचं रुपांतर कॅनव्हॉसमध्ये केलं पण ही समस्या ‘जैसे थे’च राहिली. आता आपल्याकडेच खड्ड्यांची समस्या आहे असं नाही काही ठिकाणी कमी अधिकप्रमाणात ही समस्या लोकांना छळते आहे. तर यावर उपाय म्हणून ब्रुसेल्समधल्या एका कलाकारानं खूप वेगळ्या पद्धतीनं या समस्येकडे लक्ष वेधलं आहे. या शहरातील ज्या ज्या रस्त्यावर खड्डे आहे तिथे त्यांनी छोटी फुलंझाडं लावली आहेत. ट्विटरच्या माध्यमातून याचे काही फोटो अन्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. समस्येकडे लक्ष वेधण्याची त्याची ही कल्पना अनेकांना आवडली आहे. त्यामुळे यापुढे आमच्या शहरात खड्डे दिसले तर आम्ही त्यात फुलझाडंच लावू असं अनेकांनी म्हटलं आहे.

(छाया सौजन्य : ट्विटर )
(छाया सौजन्य : ट्विटर )