भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. सानियाने मंगळवारी पहाटे एका गोंडस मुलाला जन्म दिला. २०१० मध्ये सानिया आणि शोएब विवाहबंधनात अडकले होते. त्यानंतर तब्बल ८ वर्षांनी त्यांच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. सोशल मीडियावर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शोएब मलिकने ट्विटरच्या माध्यमातून ही गोड बातमी शेअर केली आहे. शोएब मलिकने सकाळी ट्विटरवर सानिया आई झाल्याची गोड बातमी दिली. “कळवताना अतिशय आनंद होतोय, मुलगा झाला आणि सानियाची प्रकृती उत्तम असून नेहमीप्रमाणे खंबीर आहे, तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आभार,” असं शोएबने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पाकिस्तान आणि भारत दोन्ही देशांमध्ये दोघांचे चाहते असून त्यांनीही ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ट्विटरवर #BabyMirzaMalik हा हॅशटॅगदेखील ट्रेंड होत आहे. काहीजणांनी हे बाळ दोन्ही देशांमधील शांततेचा दुवा ठरेल असंही म्हटलं आहे. दरम्यान काहीजणांनी यावरुन हलके विनोद करत या मुलाचं नाव काय असेल किंवा तो कोणता खेळ खेळेल असे प्रश्न विचारले आहेत.

मूल भारतीय की पाकिस्तानी ? सानिया मिर्झा काय म्हणते…

सानिया मिर्झा-शोएब मलिक झाले आई-बाबा!

३१ वर्षीय सानिया मिर्झाने २०१० साली पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला. हैदराबादमध्ये पारंपरिक पाकिस्तानी पद्धतीनुसार हा विवाहसोहळा पार पडला होता.