Facebook, Instagram, Threads face massive outage: इन्स्टाग्राम आणि फेसबुक सेवा मंगळवारी रात्री अचानक डाउन झाली. त्यामुळे केवळ देशातीलच नाही तर जगभरातील अनेक युजर्सना हे अॅप वापरण्यात अडचणी येत होत्या. अनेक युजर्सना लॉग इन करण्यात समस्या येत होती. अनेक युजर्सनी ट्विटरवर यासंबंधित पोस्टचा भडिमार सुरू केला. याच संधीचा फायदा घेत जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामची खिल्ली उडवली आहे.

एलॉन मस्क यांनी लिहिले, “जर तुम्ही ही पोस्ट वाचू शकत असाल, तर आमचे सर्व्हर व्यवस्थित काम करत आहेत.” अशा शब्दांत एलॉन मस्क यांनी मेटाला डिवचण्याचा प्रयत्न केला. आता एलॉन मस्क यांचे हे ट्वीट काही वेळातच व्हायरल झाले.

एलॉन मस्क यांनी आणखी एक पोस्ट केली, ज्यात पोटावर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि थ्रेडचा लोगो असलेले निराश झालेले ४ पेंग्विन, पोटावर एक्सचा (पूर्वीचे ट्विटर) लोगो घेऊन एका एटीत उभा असलेल्या पेंग्विनला सलाम करत आहेत.

अनेक फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्सचे अकाउंट आपोआप लॉकआउट होत होती, त्याच वेळी इन्स्टाग्रामवर लोकांना फीड रिफ्रेश केले जात नव्हते. यावेळी काही युजर्सनी यूट्युबवर तक्रारी सुरू केल्या. तर अनेकांनी याबाबत ट्विटरवर तक्रार करायला सुरुवात केली. या तांत्रिक बिघाडामागील कारण मेटाच्या इंटर्नल सिस्टीममधील कॉन्फिगरेशनमध्ये झालेला बदल असल्याचे सांगण्यात आले. पण, या प्रक्रियेमुळे डेटा सेंटरमधील ट्रॅफिक फ्लो विस्कळित झाला.

या प्रकरणी ‘मेट’च्या कम्युनिकेशन डायरेक्टरकडून एक निवेदनही समोर आले आहे; ज्यात सांगण्यात आले की, ही समस्या समोर आल्यानंतर आमच्याकडे सातत्याने तक्रारी येत आहेत. लोकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींवर ते काम करीत असल्याचे मेटा यांनी सांगितले. त्यानंतर भारतीय वेळेनुसार रात्री १० वाजण्याच्या सुमारास फेसबुक, इन्स्टाग्रामची सेवा पुन्हा सुरू झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण, फेसबुक अचानक बंद होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी २०२१ मध्येही असा अचानक आउटेज पाहायला मिळाला होता. ४ ऑक्टोबर २०२१ रोजी फेसबुक, इन्स्टाग्राम व व्हॉट्सॲप सेवा सुमारे चार तास पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या.