Rohit Sharma Bus Driving Video Viral : इंडियन प्रीमियर लीग २०२४ (IPL)मध्ये मुंबई इंडियन्स पुन्हा ट्रॅकवर येत असल्याने संघातील खेळाडूही खूप उत्साही झाले आहेत. सलग तीन सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभव केला होता. पण, चेन्नई सुपर किंग्जबरोबरच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पुन्हा पराभवाला तोंड द्यावे लागले. पण, या सामन्यापूर्वीचा मुंबई इंडियन्स संघाचा फलंदाज रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात मुंबई इंडियन्स संघाच्या बसचे स्टेअरिंग रोहित शर्माच्या हातात असल्याचे दिसत आहे. संघातील खेळाडू बसने हॉटेलमधून निघत असताना रोहितने ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन स्टेअरिंगचा ताबा घेतला. त्याचा हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी मुंबई इंडियन्स संघाचे स्टेअरिंग रोहित शर्माच्या हातात, अब गाडी मेरा भाई चलायेगा अशा अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
रोहित शर्माची ही स्टाईल चाहत्यांनाही खूप आवडली आहे. यावेळी रोहितनेही त्यांच्या फोनमधून व्हिडीओ आणि फोटो काढले. रोहित शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहते मजेशीर कमेंट्सही लिहित आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रोहित शर्मा बसमध्ये चढतो आणि मागच्या सीटवर जाणार तितक्यात ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसतो. त्यानंतर तो समोर उभ्या असलेल्या लोकांना मजेशीर पद्धतीने दूर जाण्याचा इशारा करतो आणि बसच्या स्टेअरिंग व्हीलवर हात ठेवून नंतर आपल्या मोबाईलने समोर उपस्थित असलेल्या चाहत्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढू लागतो. यावेळी बसमध्ये चढलेले इतर खेळाडूदेखील समोर येत चाहत्यांच्या गर्दीचा व्हिडीओ शूट करू लागतात. त्यामुळे चाहतेही खूप जल्लोष करताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ व्हायरल होताच एका युजरने लिहिले की, आज गाडी मेरा भाई चलायेगा, यावर आणखी एका युजरने विचारले की, कशाचा कॅप्टन आहे शिप की बसचा? अशा प्रकारे चाहत्यांकडूनही अनेक मजेशीर कमेंट्स येत आहेत.
मुंबई इंडियन्स संघाने घरच्या मैदानावर आतापर्यंत दोन्ही सामने जिंकले आहे. त्यात रोहित शर्माने गेल्या सामन्यात जबरदस्त फॉर्म दाखविला होता. त्यामुळे मुंबईचा संघ सुरुवातीच्या वादातून सावरताना दिसत आहे. त्यात आयपीएलच्या १७ व्या हंगामात रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटविल्यानंतर नवा कर्णधार हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्स संघ चांगलाच चर्चेत आला. त्याबाबत सोशल मीडियावरही बराच गदारोळ झाला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ पाच वेळा विजयी ठरला आहे.