आजकल ऑनलाइन खरेदी करणे अनेकांची पहिली पसंती ठरते आहे. खाण्याचे पदार्थ, कपडे, किराणा माल, घरातील शोभेच्या वस्तू आदी अनेक गोष्टी आपण सगळेच ऑनलाइन खरेदी करतो. ऑनलाइन खरेदीचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. अनेकदा असे होते की, आपण एखादी वस्तू मागवतो; पण,त्याऐवजी दुसरीच वस्तू बॉक्समध्ये येते. कधी कधी कपडे फाटलेले किंवा पदार्थांची एक्स्पायरी डेट संपलेली असते. अशा विविध समस्या उदभवतात. आज सोशल मीडियावर अशीच एक घटना घडली आहे. एक व्यक्ती सोनी कंपनीचा टीव्ही ऑर्डर करतो आणि त्याऐवजी त्याच्या पार्सल बॉक्समध्ये थॉमसन कंपनीचा टीव्ही पाठवला जातो.
प्रकरण असे आहे की, एका व्यक्तीने फ्लिपकार्टवरून ७ ऑक्टोबरला (Flipcart) सोनी कंपनीचा टीव्ही खरेदी केला. ८ ऑक्टोबरला या टीव्हीची डिलिव्हरी व्यक्तीच्या घरी पाठवण्यात आली. त्यानंतर टीव्ही इन्स्टॉलेशनसाठी फ्लिपकार्ट कंपनीचा एक माणूस अज्ञात व्यक्तीच्या घरी येतो. तेव्हा टीव्हीचे पार्सल उघडण्यात येते; पण त्यामध्ये सोनी कंपनीचा टीव्ही नसून थॉमसन कंपनीचा टीव्ही असल्याचे लक्षात येते. तसेच या थॉमसन कंपनीच्या टीव्ही बॉक्समध्ये स्टॅण्ड, रिमोट इत्यादी वस्तू उपलब्ध नसतात. तसेच त्यानंतर तो फ्लिपकार्ट कंपनीला याची माहिती देतो. फ्लिपकार्ट कंपनी व्यक्तीला टीव्हीचे फोटो अपलोड करायला सांगते. पण, वारंवार सांगून आणि फोटो अपलोड करूनही कंपनीने त्याच्या विनंतीला प्रतिसाद दिलेला नाही, असे ती व्यक्ती सांगताना दिसते आहे. कशा प्रकारे अज्ञात व्यक्तीच्या घरी सोनी कंपनीच्या टीव्हीऐवजी थॉमसन कंपनीचा टीव्ही आला. एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा.
पोस्ट नक्की बघा :
प्रकरण पाहताच फ्लिपकार्ट कंपनीने दिली प्रतिक्रिया :
आपला टीव्ही बदलून देतील या आशेवर व्यक्ती थांबलेली असते. कारण- त्याला या नवीन टीव्हीवर वर्ल्ड कप बघायचा असतो. तसेच काही दिवसांनी ही व्हायरल पोस्ट पाहून फ्लिपकार्टने या ट्वीटवर रिप्लाय केला आहे आणि लिहिले आहे की, तुमच्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत. आम्ही हे प्रकरण हाताळतो आहे. कृपया तुमच्या ऑर्डरची माहिती आम्हाला डायरेक्ट मेसेज करून (DM) पाठवून द्या, असा या ट्वीटवर फ्लिपकार्ट कंपनीच्या अधिकृत अकाउंटवरून रिप्लाय केला गेला आहे. ऑर्डर केलेल्या सोनी टीव्हीची किंमत एक लाख रुपये आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट @thetrurindian आणि @flipkartsupport एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, चार फोटो शेअर करण्यात आले आहेत. पहिल्या फोटोत डिलिव्हरीचा बॉक्स, तर दुसऱ्या फोटोत थॉमसन टीव्ही या कंपनीचे नाव, तर तिसऱ्यात थॉमसन टीव्हीचा फोटो व चौथ्या फोटोमध्ये या टीव्हीची किंमत दाखवण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची माहिती या पोस्टच्या कॅप्शनमध्ये देण्यात आली आहे. पोस्ट पाहताच सगळेच नेटकरी त्यांचा ऑनलाइन सामान खरेदी करण्याचा अनुभव कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत.