मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने, अनेक जण विविध ग्रुपमध्ये ‘मराठी भाषा दिनाच्या’ मराठीमधून शुभेच्छा देत असतात. सोशल मीडियावर त्याबद्दल स्टेटस, स्टोरीसुद्धा ठेवतात. इतकेच नाही तर काही मंडळी तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना शुद्धलेखनाचे, बोलताना होणाऱ्या ‘न’ आणि ण’ मधील चुकांबद्दल धडे देत असतात. परंतु, आपल्या मराठी भाषेवरील असलेले प्रेम, त्याबद्दल वाटणारा आदर, आपुलकी या सगळ्या गोष्टी एका दिवसापर्यंत मर्यादित ठेवून चालणार नाही.

यासाठी मराठी भाषा दिनानिमित्त सोशल मीडियावर, मराठी भाषा टिकवण्यासाठी तसेच तिला सर्वदूर पोहचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘खलबत्ता’ या सोशल मीडिया पेजच्या, ‘अश्विनी देशपांडे’ यांची आम्ही मुलाखत घेतली. खलबत्ता [@khalbatta_vyaspith] हे अकाउंट, तेजस गोखले आणि अश्विनी देशपांडे यांनी सुरू केले आहे. हे पेज सोशल मीडिया माध्यमाच्या मदतीने मराठी भाषा वापरताना होणाऱ्या बारीकसारीक चुका, वेगवेगळ्या शब्दांचे, म्हणींचे, वाकप्रचारांचा अर्थ सांगणे, तसेच इंग्रजी शब्दांना असणारे मराठी पर्यायी शब्द लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात.

हेही वाचा : तुम्ही ‘महाराष्ट्रीयन’ आहात की, ‘महाराष्ट्रीय? मराठी भाषेतील रोजच्या रोज चुकणारे ‘हे’ शब्द तुम्ही वापरता का?

आपल्याला जर मराठी भाषेचा वापर, मराठी बोलण्याचे प्रमाण अधिकाधिक वाढवायचे असेल, तर त्याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. म्हणजे दैनंदिन आयुष्यात वापरले जाणाऱ्या सामान्य इंग्रजी शब्दांना, मराठी भाषेत असलेल्या पर्यायी शब्दांचा वापर केला तर? किंवा पुढच्या पिढीने मराठी भाषा टिकवून ठेवण्यासाठी, लहान मुलांना मराठी भाषेबद्दल गोडी निर्माण करण्यासाठी काय करता येऊ शकते? ते आपण पाहू. मराठी भाषा दिनानिमित्त तुम्ही स्वतःपासून या गोष्टीची सवय केलीत तरच पुढे तुमच्या आजूबाजूची मंडळी, तुमच्यातील हा बदल बघून किंवा यापासून लागणाऱ्या सवयीने मराठी भाषा जास्त प्रमाणात वापरू लागतील आणि आपली मातृभाषा अधिक समृद्ध होईल. त्यासाठी आज आपण काही अतिशय सोप्या अशा टिप्स… माफ करा उपाय आपण पाहू.

“लहान मुलांना मराठी भाषेची गोडी कशी लावावी?”

सध्या बहुतांश मुलांचे शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून होते, त्यामुळे शाळेचा अभ्यास, शिक्षक आणि पालकांबरोबरचे संभाषण मुलं शक्यतो इंग्रजी भाषेतूनच करत असतात. पण, इंग्रजी आणि इतर भाषांसह मुलांना आपली मराठी ही मातृभाषादेखील तेवढ्याच सहजतेने यायला हवी. त्यासाठी आई-वडील, नातेवाईक यांनी स्वतःहून मुलांना मराठी बोलण्यासाठी, वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
“इंग्रजी भाषा ही काळाची गरज आहे, हे सत्य आहे. मात्र, असे असताना लहान मुलांना मराठी भाषेची गोडी लागण्यासाठी, आवड निर्माण होण्यासाठी पालकांनी स्वतःहून प्रयत्न केले पाहिजेत. ज्योत्स्ना प्रकाशनाची मराठी भाषेतील सुंदर चित्र असणारी आणि लहान मुलांसाठी खास गोष्टींची पुस्तकं आहेत. अशा पुस्तकांच्या वाचनाची मुलांना सवय लावली किंवा त्यांना वाचून दाखवली तरी त्यामधून मराठी भाषेची गोडी मुलांना लागण्यास मदत होऊ शकते”, अशी माहिती सोशल मीडियावरील ‘खलबत्ता’ नावाच्या पेजच्या ‘अश्विनी देशपांडे’ यांनी दिली. तसेच “मुलांना किंवा कुणालाही कोणतीही भाषा शिकण्यासाठी जबरदस्ती करू नये. परंतु, पालकांनी ‘ए फॉर ॲपल’ शिकवल्यानंतर ॲपल म्हणजेच सफरचंद असेही शिकवणे गरजेचे आहे, तरच मुलं मनाने आणि आवडीने मराठी भाषेत स्वतःहून रस घेतील”.

“मराठी बोलण्याची सुरुवात स्वतःपासून करा.”

अनेकदा आपण मित्र-मंडळींना भेटल्यानंतर सहसा हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा उपयोग करतो. आभार मानण्यासाठी, माफी मागण्यासाठी किंवा अगदी शुभेच्छा देतानादेखील आपण नकळत थँक्यू, सॉरी अशा इंग्रजी शब्दांचा वापर करतो. “संभाषण करताना इंग्रजी शब्दांचा वापर हा आपल्याकडून सवयीने आणि नकळत होत असतो. परंतु, थँक्यूऐवजी धन्यवाद, सॉरी शब्दासाठी माफ करा किंवा नेहमीच्या, हॅपी बर्थ डे ऐवजी वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा असे शब्दप्रयोग करण्यास जेव्हा तुम्ही स्वतः सुरुवात कराल, तेव्हाच तुमचे ऐकून तुमचे मित्रदेखील, कालांतराने या पर्यायी शब्दांचा वापर करू शकतात. अर्थात, सुरुवातीला सगळ्यांनाच याची सवय होण्यास वेळ लागेल. पण, मराठी भाषेचा वापर अधिक होण्यासाठी तुम्ही स्वतःला ही एक छोटी सवय नक्कीच लावू शकता.”

थोडक्यात काय तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत मराठी भाषेची आवड आणि वापर करण्याची इच्छा ही स्वतःहून व मनापासून झाली तरच त्यामध्ये खरी मजा आहे; तरच त्यात सातत्य टिकून राहू शकते. असे असताना, दरवेळेस व्यक्तीने शुद्ध आणि अस्खलित भाषेचा वापर करावा हा आग्रह असू नये. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात विविध भागांत, प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने मराठी भाषा आणि त्यातील शब्दांचा वापर केला जातो. त्यामुळे एखादा शब्द वेगळ्या पद्धतीने बोलला गेल्यास, तो साफ चुकीचा आहे असे समजू नये.
“खरंतर बोलली जाणारी भाषा ही शुद्ध नसून ती प्रमाण किंवा बोली असते. उदाहरण द्यायचे झाले, तर ‘पाणी’ हा शब्द प्रमाण भाषेतला आहे. परंतु, गावाकडे किंवा इतर भागांमध्ये लहानपणापासून त्यांना ‘पानी’ असा शब्द बोलायला शिकवला आहे. त्यामुळे समोरची व्यक्ती चुकीची भाषा बोलते म्हणून त्याला चिडवण्यापेक्षा पाणी आणि पानी मधील फरक समजावून देणे अधिक चांगले आहे. शहरी भागांमध्ये वस्तू शोधणे असे म्हटले जाते, तर मराठवाडा भागात वस्तू हुडकणे असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांतातील मराठी भाषा, बोलण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे अमूक एका शहरातील भाषा बोलण्याची पद्धतच योग्य आणि बाकी अयोग्य किंवा अशुद्ध असा समज लोकांनी केला नाही पाहिजे”, असे अश्विनी यांनी सांगितले आहे.

त्यामुळे यंदाच्या मराठी भाषा दिनानिमित्त आपण इंग्रजी भाषेच्या बरोबरीनेच, मराठी भाषेचादेखील वापर अभिमानाने आणि अधिक प्रमाणात करण्यास सुरुवात करून मराठी भाषेला समृद्ध करू.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खलबत्ता या इन्स्टाग्राम पेजवरील, मराठी भाषेबद्दल माहिती देणारे काही व्हिडीओ.