मंगळवारी जर्मनीमध्ये एका फोटोशूट दरम्यान बिबट्याने ३६ वर्षीय मॉडेलवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मॉडेलला गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिक वृत्तपत्र ‘आउटलेट बिल्ड’ने दिलेल्या वृत्तानुसार, या मॉडेलचे नाव जेसिका लिडॉल्फ असे आहे. ती फोटोशूटसाठी पूर्व जर्मनीमध्ये प्राण्यांचे संगोपन केले जात असलेल्या केंद्रामधील बिबट्यांचा आवास असणाऱ्या भागामध्ये गेली होती. फोटोशूट करत असताना अचानक बिबट्यांनी तिच्यावर हल्ला केला आहे. दरम्यान तिला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

जेसिका लिडॉल्फला बिबट्यांचा आवास असणाऱ्या भागामध्ये फोटोशूट करणे माहागात पडले आहे. या घटनेविषयी बोलताना ती म्हणाली, ‘बिबटे सतत माझ्या गालाला, माझ्या कानांना, माझ्या डोक्याला चावत होता.’ बिबट्यांनी हल्ला केल्यानंतर लिडॉल्फला हेलिकॉप्टरने रुग्णालयात पोहोचवण्यात आले. पण तिचे हे फोटोशूट कोणी अरेंज कले होते किंवा ते फोटोशूट कोण करत होते याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण लिडॉल्फला गंभीर दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे देखील समोर आले आहे.

जेसिका लिडॉल्फने तिच्या वेबसाइटवर स्वत: प्राणी प्रेमी असल्याचे सांगितले आहे. तिच्याकडे एक घोडा, कबूतर, पोपट आणि मांजर हे पाळीव प्राणी असल्याची तिने माहिती दिली आहे. स्थानिक पोलीस या घटनेची चौकशी करत असून त्या बिबट्यांचा तेथील नागरिकांना कोणताही त्रास नाही अशी माहिती समोर आली आहे.

जेसिका लिडॉल्फने स्वइच्छेने जर्मनीमधील सॅक्सोनी-अनहाल्ट राज्यातील नेब्रा येथील प्राण्यांचे संगोपन केले जात असलेल्या खासगी केंद्रामध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फोटोशूट दरम्यान तेथील दोन बिबट्यांनी तिच्यावर हल्ला केला. त्या मालमत्तेच्या मालकाने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.