scorecardresearch

ह्रदयस्पर्शी! पंडित शिवकुमार शर्मा यांना अखेरचा निरोप देतानाचा उस्ताद झाकीर हुसेन यांचा फोटो चर्चेत का? वाचा…

झाकीर हुसेन यांचा पंडित शिवकुमार शर्मा यांना अखेरचा निरोप देतानाचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

Pandit Shivkumar Sharma Zakir Hussain
छायाचित्र सौजन्य – सोशल मीडिया

जगविख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं १० मे रोजी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर विर्लेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पं. शर्मा यांच्या दोन्ही मुलांनी मुखाग्नी दिला. यावेळी बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, तबलावादक झाकीर हुसेन यांच्यासह संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सध्या झाकीर हुसेन यांचा पंडित शिवकुमार शर्मा यांना अखेरचा निरोप देतानाचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

पंडित शिवकुमार शर्मा आणि तबलावादक झाकीर हुसेन यांचा हा फोटो व्हायरल होण्याचं कारण म्हणजे या दोन्ही दिग्गजांमधील व्यक्तिगत मैत्रीचे संबंध. त्यांचीच प्रचिती सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोत येत आहे. यात झाकीर हुसेन दुःखद अंतःकरणाने पंडित शिवकुमार यांच्या चितेजवळ उभे आहेत.

छायाचित्र सौजन्य – सोशल मीडिया

अनेक वर्षांपासून झाकीर हुसेन पंडित शिवकुमार शर्मा यांच्यासोबत विविध कार्यक्रमात जुगलबंदी करत आले आहेत. त्यामुळेच या दोघांच्या चाहत्यांना हा फोटो पाहून त्यांनी सोबत गाजवलेले कार्यक्रम आठवत असल्याचं फोटोवरील प्रतिक्रियावरून लक्षात येतंय. या फोटोला कोणी भावनिक, ह्रदयस्पर्शी म्हणत आहे, तर कोणी दोन मित्रांमधील नात्यांचं दर्शन दाखवणारा फोटो म्हणत आहे.

पंडित शिवकुमार यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना झाकीर हुसेन म्हणाले होते, “मी १२ वर्षांचा होतो तेव्हापासून मी पंडितजींच्या सान्निध्यात आहे. पंडितजी मला शाळेतून कार्यक्रमाला घेऊन जात होते. ते माझे मार्गदर्शक होते, माझे गुरू होते. त्यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा मी अमेरिकेत होतो. कालच मी अमेरिकेतून निघालो होतो म्हणून आज मी त्यांचे शेवटचे दर्शन घेऊ शकलो. आज पंडितजी गेले असले तरी ते आपल्या सर्वांच्या मनात आणि कानात कायम राहणार आहेत.”

छायाचित्र सौजन्य – सोशल मीडिया

पं. शर्मा यांचे मंगळवारी (१० मे) हृदयविकाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांचा मुलगा राहुल शर्मा यांच्या जुहू येथील निवासस्थानी बुधवारी सकाळी १० ते २ या वेळेत त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री जया बच्चन, ज्येष्ठ तबलावादक झाकीर हुसेन, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, तौफिक कुरेशी, गायक हरिहरन, रूपकुमार राठोड यांच्यासह संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अंतिम दर्शन घेतले. पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दुपारी २ वाजता पवनहंस स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा : ‘उनके हर सांस मे साज था’…अमूलकडून खास अंदाजात पंडित शिवकुमर शर्मा यांना श्रद्धांजली

पं. शिवकुमार शर्मा यांनी जम्मू काश्मीरमधील लोकसंगीतातील संतूर या वाद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली. भारतीय संगीत क्षेत्रातील मानिबदू ठरलेल्या पं. शिवकुमार शर्मा यांनी शास्त्रीय संगीताच्या मैफलीत संतूर वाद्य सादर करत सतार आणि सरोदच्या जोडीला संतूर वाद्य नेऊन ठेवले. अशा या महान कलाकाराच्या जाण्याने संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Photo of ustad zakir hussain at funeral of santoor maestro pandit shivkumar sharma is viral know why pbs

ताज्या बातम्या