पावसाळा सुरू झाला की वर्षा विहार करण्यासाठी धबधबे, किल्ले, धरण अशा ठिकाणी आवर्जून भेट देतात. पुण्याजवळ सिंहगड, खडकवासला धरण, ताम्हिणी घाट, लोणावळ्यातील भूशी धरण अशी काही मोजकी ठिकाणं आहेत जिथे पावसाळ्यात पुणेकर हमखास भेट देतात. विशेषत: शनिवार-रविवारी सुट्टी असेल मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणांना भेट देतात. गेल्या काही वर्षांपासून या पर्यटन स्थळांना भेट देण्याच्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेले पर्यटक वाहतूक कोंडीमध्ये आणि लोकांच्या गर्दीमध्ये अडकता. दरम्यान पावासाळा येण्यापूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे अनेक पुणेकर आणि पर्यटक सिंहगडाला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहे. दरम्यान सिंहगडला भेट देण्यासाठी आलेले पुणेकर आणि पर्यटक वाहतूक कोंडीत अडकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

सिंहगड ही ऐतिहासिक वास्तू आहे. पुणेकरांसाठी हाकेच्या अंतरावर असलेला या सिंहगडाला बाराही महिने पर्यटक भेट देण्यासाठी येतात. दरम्यान, पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत आणखी वाढ होते. सध्या परिस्थिती अशी झाली आहे की, अक्षरश: वाहनांची कोंडी होत आहे. विशेषत: शनिवार रविवारच्या सुट्टी दिवशी सिंहगडाला लोक आवर्जून भेट देतात. तुम्हीही जर शनिवारी-रविवारी सिंहगडाला भेट देण्याचा विचार करत असाल तर आधी हा व्हायरल व्हिडिओ बघा अन्यथा तुम्हालाही सिंहगडाला जाताना वाहतूक कोंडीत अडकावे लागेल.

इंस्टाग्रामवर pune_travelling_’s नावाच्या पेजवर सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीची व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये सिंहगड परिसरातील निसर्गरम्य वातावरण दिसत आहे. रिमझिम पाऊस पडत आहे पण वाहनांची भल्ली मोठी रांग लागलेली आहे. सिंहगडावरील निसर्गरम्य वातवरणाचा आनंद घेण्यासाठी आलेले पर्यटक वाहतूक कोंडीत अडकल्याचे दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ शनिवार २४ मे २०२५चा असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी व्हिडीओवर कमेंटही केल्या आहेत.

नेटकरी काय म्हणाले?

एकाने लिहिले,”दरवर्षीचा ठरलेला विषय…पुणे तिथे काय उणे”

दुसऱ्याने लिहिले की, “शनिवार रविवार सिंहगडावर जाऊच नये…प्रचंड गर्दी असते.”

तिसऱ्याने म्हटले की, “सर्वात चांगला पर्याय म्हणजे चालत जा आणि छान वाटेल.”

चौथ्याने लिहिले की, ” “लोकांना स्वतःसाठी फिरायला कमी आणि व्हाट्सअप स्टेटससाठी मटरेल शोधायला जास्त जायचं असतं”

पाचव्याने लिहिले की, “चारचाकी बंदी पाहिजे. फक्त दुचाकी . किंवा पायथ्यापासून बस सोडा. गाड्या खालीच राहू द्या.”

सिंहगड किल्ला

पुणे शहरापासून ३०-४० किमी अंतरावर असलेला, सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेला सिंहगड किल्ला हा पुर्वी कोंढाणा नावाने ओळखला जात जातो. हवेली तालुक्यातील डोणजे गावात हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू आणि शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघलांबरोबर युद्ध झाले. मुघलांपासून हा किल्ला वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कानावर तानाजी यांच्या मृत्यूची बातमी पडली ते म्हणाले, “गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढणा किल्याचे नाव बदलून सिंहगड असे नाव ठेवले.