प्राण्यांची काळजी घ्या म्हणणाऱ्या शाहिद आफ्रिदीनंच घरात पाळलाय सिंह?

एकीकडे मुक्या प्राण्यांची काळजी घ्या असा महत्त्वपूर्ण संदेश दिलाय, पण दुसरीकडे त्याच्याच घरात सिंहाला साखळीनं बांधून ठेवल्याचं दिसत होतं.

शाहिद आफ्रिदीचं प्राण्यांवर खरंच प्रेम आहे की हा फक्त दिखावा आहे अशा शब्दात त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आहे.

मुक्या प्राण्यांची काळजी घ्या म्हणणाऱ्या पाकिस्तानच्या माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर सोशल मीडियावर एका फोटोमुळे जोरदार टीका होत आहे. शाहिद आफ्रिदीनं आपल्या ट्विटरवर दोन फोटो शेअर केले आहे यातल्या एका फोटोत त्याची लहान मुलगी आहे तर दुसऱ्या फोटोत खुद्द तो हरणाच्या पिल्लाची काळजी घेताना दिसत आहे. या फोटोद्वारे त्यानं मुक्या प्राण्यांची काळजी घ्या असा महत्त्वपूर्ण संदेश दिलाय, पण विरोधाभास म्हणजे त्यातल्या एका फोटोत सिंहाला साखळीनं बांधून ठेवल्याचं दिसत होतं.

शाहिद आफ्रिदीचं प्राण्यांवर खरंच प्रेम आहे की हा फक्त दिखावा आहे अशा शब्दात त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आहे. काही वृत्तवाहिन्यांच्या मते आफ्रिदीनं घरात सिंह पाळला आहे. जगभरात या प्राण्यांच्या अस्तित्त्वाला धोका निर्माण झालाय, या प्राण्याचं स्थान जंगलात असायला हवं मग तो तुझ्या घरात काय करत आहे? असा प्रश्नही त्याला अनेकांनी विचारला आहे.

प्राण्यांची काळजी घ्यायला कधीही विसरू नका. त्यांनाही आपल्या मायेची, प्रेमाची गरज आहे असं म्हणणाऱ्या आफ्रिदीच्या घरातील पाळीव सिंह मात्र कृश दिसत होता.

त्यामुळे सोशल मीडियावर पितळ उघडं पडलेल्या आफ्रिदीवर सडकून टीका केली जात आहे. पैसा, प्रसिद्धीच्या जोरावर लोक काहीही करू शकतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. प्राणी हक्कांसाठी लढणाऱ्या संघटना आता का गप्प बसल्या आहेत? अशीही प्रतिक्रिया एका ट्विटर युजरनं दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shahid afridi seems to have a chained lion at home