Shocking Video of man harassing woman: वर्षानुवर्षं मुलींवरच्या अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय. सोशल मीडिया, वृत्तपत्रं, बातम्या यांद्वारे आपल्याला या सगळ्याची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही देशात महिला असुरक्षित आहेत. अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या उघडपणे फिरतात. भररस्त्यात सगळ्यांसमोर महिलांची छेड काढतात, त्यांच्यावर हल्ला करतात. आणि या सगळ्यात ते काही चुकीचं करतायत असं त्यांना वाटतही नाही.
अशा परिस्थितीत काही मुली आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतात, तर काही जणी तसाच अत्याचार सहन करत घाबरून शांत बसतात. सध्या अशीच भयंकर घटना एका तरुणीबरोबर घडलीय ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये बसमध्ये एक माणूस तरुणीबरोबर असभ्य वर्तन करताना दिसतोय. नेमकं काय घडलं, जाणून घ्या…
बसमध्ये महिलेबरोबर केलं असं काही… (Man abusing Young Woman Video)
बसमधील माणसाच्या विकृत कृत्याचा व्हिडीओ पाहून तुमचाही राग अनावर होईल. या व्हिडीओमध्ये एक माणूस एका तरुणीला एकटीला पाहून तिच्या संवाद साधण्याचा आणि ती त्याच्या शेजारी बसावी असा आग्रह करताना दिसतोय. वारंवार इशारे करून तो तिला त्रास देताना दिसतोय. तिला शेजारी बसण्यासाठी आग्रह करत असताना तो तिच्या सीटजवळ जातो आणि तिची पर्सदेखील खेचू लागतो. पण हे सगळं होत असताना बसमधील इतर माणसंही तिला मदत करत नाहीत असं दिसतंय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @itsgoneviralofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल ४.४ मिलियन व्ह्यूज आले आहेत. तसंच “तो माझा पाठलाग करत होता! ” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलेली आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडलीय हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
तरुणीचा हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हे खूप भयानक आहे, तिथे असलेली इतर लोकंही मदतीसाठी काही करत नाहीयत”, तर दुसऱ्याने “पोलिसांना बोलवलं पाहिजे” अशी कमेंट केली.