पोलिस किंवा सैन्य दलात भरती होण्यासाठी लाखो तरुण-तरुणी तयारी करत असतात. अत्यंत कठीण परिस्थितीचा सामान करत, रात्रीचा दिवस करत मेहनत घेऊनही काही मोजकेच यशस्वी होतात. यात काही जण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही कोणताही क्लास, ट्रेनिंगशिवाय जिद्द, चिकाटी आणि अभ्यासात सातत्य ठेवून आपले पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण करतात. अशाचप्रकारे एका तरुणीने मेहनत घेत मुंबई पोलिस होण्याचे स्वप्न सत्यात उतरवले. यावेळी घरी पेढे नेत तिने आपल्या आई-वडिलांना ही आनंदाची बातमी सांगितली. यावर वडिलांनी अशी काही रिअ‍ॅक्शन दिली, जे पाहून तुम्हीही खूप भावनिक व्हाल.

वडिलांच्या डोळ्यातून वाहू लागले घळाघळा आनंदाश्रू

प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. स्वत:ची चप्पल पार झिजली तरी दुसरी न घेता, पैसे साठवत मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात. विशेषत: वडील आपल्या लेकीच्या भविष्याची खूप स्वप्न पाहतात. अशाचप्रकारे एका आई-वडिलांनी आपली लेक मुंबई पोलिसात भरती व्हावी असे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न तिने पूर्णही केले. यानंतर तिच्या आई-वडिलांना जो काही आनंद झाला तो शब्दात व्यक्त करता येणे केवळ अशक्य आहे.

मुंबई पोलिस दलात भरती झालेली तरुणी पेढे घेऊन रिझल्ट सांगण्यासाठी गुपचूप घरी आली, तेव्हा तिचे वडील फोनवर आरामात बोलत होते. त्यांना मुलगी काय सांगण्यासाठी आलीय याची कसलीही कल्पना नव्हती. अचानक ती वडिलांना पेढा भरवत मी मुंबई पोलिस झाले असे म्हणते. यावेळी वडील लेकीला घट्ट मिठी मारतात व त्यांच्या डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रू वाहू लागतात. लेकही वडिलांना पाहून रडते, तर दारावर उभी असलेली आईही आनंदात दोघांकडे पाहत असते. हा अतिशय भावनिक व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यातून आपसूक पाणी येईल.

पोरीने आई- वडिलांच्या कष्टाचं केलं चीज

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आई-वडील आपल्या मुलीचे यश पाहून किती आनंदी झालेत, हे शब्दात व्यक्त करता येऊ शकत नाही. यावेळी वडिलांच्या डोळ्यातलं पाणी आणि कौतुक पाहून तुम्हाला या तरुणीचा अभिमान वाटेल. व्हिडीओमध्ये एक तरुणी हातात पेढ्याचा बॉक्स घेऊन लपतछपत घरात येते आणि वडिलांसमोर जाऊन उभी राहते. यावेळी वडील फोनवर बोलत असतात, त्यामुळे ते तिच्याकडे तितकेसे लक्ष देत नाहीत. यावेळी ती वडिलांना फोन ठेवण्यास सांगते आणि जोरात ओरडून माझं सिलेक्शन झालं असं सांगते. यावर वडील जोरजोरात हसत तिची पाठ थोपटत आनंदाने रडू लागतात. यावर वडिलांना ती आता आपले रडायचे दिवस गेले म्हणत मिठी मारून जोरजोरात रडते. यावेळी आई घराबाहेर येऊन काय झालं म्हणून विचारते, तेव्हा त्या मुलीचा व्हिडीओ काढणारा तरुण झाली ना पोलिस असे सांगतो. यावेळी आपल्या लेकीने आपल्या मेहनतीचं चीज करून स्वप्न पूर्ण केले हे पाहून आई-वडिलांनाही समाधानी वाटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

mh_police_harshu_1324 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, आयुष्यातील खूप महत्त्वाचा क्षण मुंबई पोलिस रिझल्ट, ज्या दिवशी आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यात आपण घेतलेल्या मेहनतीचे फळ दिसते आणि त्यानंतर जे आनंदाश्रू वाहतात त्यापेक्षा दुसरे काही सुख नाही. हा भावनिक व्हिडीओ आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर अनेकांनी कमेंट्समध्ये पोलिसात भरती झालेल्या तरुणीचे कौतुक केले आहे.