लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून प्रवास करताना, आपण त्याच गाडीमध्ये मिळणारे जेवण जेवत असतो. अशात सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओची चांगलीच चर्चा होत आहे. त्याला कारणदेखील तसेच आहे. वंदे भारत या रेल्वेमधील प्रवाश्यांना जे जेवण दिले गेले होते ते खराब असल्याचे या व्हिडीओमधून समजते. आपल्याला आलेला अनुभव आकाश केशरी यांनी एक्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसोबत शेअर केला असून; भारतीय रेल्वे, वंदे भारत आणि भारतीय रेल्वे मंत्र्यांच्या अधिकृत अकाउंटलादेखील टॅग केले आहे. जेणेकरून सर्व प्रकार त्यांच्या पर्यंत पोहोचेल आणि या प्रकरणाची दखल घेतली जाईल.
तर आकाश यांनी आपल्या @akash24188 एक्स हॅण्डलवरून दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामधील पहिल्या व्हिडीओमध्ये, सर्व प्रवाश्यांनी मिळालेल्या जेवणाचे भरलेले डबे तसेच खाली, जमिनीवर ठेवले असून रेल्वेचा एक कर्मचारी ते उचलून घेऊन जात आहे. असे दृश्य पाहायला मिळते. दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेल्या जेवणाचे डबे दिसत असून, डाळ भातामधून वास येत आहे असे समजते. “नमस्कार सर, मी सध्या २२४१६ NDLS ते BSB असा प्रवास, वंदे भारत या रेल्वेमधून करत आहे. आम्हाला दिलेल्या जेवणाला घाणेरडा वास येत असून, त्याची चवदेखील विचित्र लागत आहे. असे असल्याने, कृपया मला माझे पैसे परत [रिफंड] करावे. अशा पद्धतीचे अन्न देऊन हे विक्रेते वंदे भारत रेल्वेचे नाव खराब करत आहेत.” अशा आशयाचे कॅप्शन लिहिले आहे.
हेही वाचा : रेल्वेचे कन्फर्म तिकीट असूनही ‘दोन तास’ करावा लागला संपूर्णत: उभ्याने प्रवास! पाहा सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट….
हा व्हिडीओ शेअर होताच, रेल्वे सेवाने याची दखल घेतली आणि या संपूर्ण प्रकाराबद्दल रेल मदत वर कायदेशीर कारवाई नोंदवण्यात आलेली आहे,असेही सांगितले आहे. “रेल मदतवर या प्रकाराबद्दल तक्रार नोंदवण्यात आलेली असून, तक्रार क्रमांक तुमच्या फोनवर एसेमेसने पाठवण्यात आलेला आहे. तरी आपला पीएनआर [PNR] आणि फोन क्रमांक पुढील कारवाईसाठी आम्हाला मेसेजद्वारे पाठवून ठेवावा.” अशी प्रतिक्रिया रेल सेवाने दिलेली आहे.
“तुम्हाला अशा पद्धतीचा अनुभव आल्याबद्दल आम्हाला खेद आहे. मात्र या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जाईल. विक्रेत्यांला योग्य तो दंड ठोठावण्यात आला असून, उपस्थित कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. तसेच कुणालाही कामावर ठेवताना त्यांच्यावर काटेकोरपणे लक्ष ठेवले जाईल.” अशी प्रतिक्रिया आयआरसीटीसी [IRCTC] अधिकृत अकाउंटने दिलेली आहे.
यावर नेटकऱ्यांनीदेखील काही कमेंट्स या व्हायरल पोस्टखाली केलेल्या आहेत, पाहा.
हेही वाचा : IRCTC चा घोटाळा तरुणीने केला उघड; रेल्वेत प्रवाशांची जेवणाच्या नावाखाली केली जात होती लूट, पाहा…
“राजधानी गाड्यांचीही हीच गत आहे. खरंतर तुम्ही फलाटावर उभे असताना जर राजधानी किंवा वंदे भारत यांसारख्या गाड्या समोरून गेल्या, तरीही त्यांच्या अत्यंत घाणेरडा वास येतो. अजिबात स्वच्छता नसते आणि आपण इतरांना शिकवत आहोत, साफसफाई बद्दल” अशी एकाने चांगलीच खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. “आयआरसीटीसीने अन्नपदार्थ शिजवून देणे बंद करायला हवे. आपण जे खातो ते जर बराच वेळापासून बनवून तयार असेल तर नक्कीच ते खराब होईल. ही काळजी विशेषतः ऑमलेट खाताना घ्यायला हवी, कारण खूपकाळ शिजून तसेच राहिलेले ऑमलेट खाण्यास हानिकारक असते. त्यामुळे, या गाड्यांमधून कोरडे पदार्थ, चिवडा, चहा, कॉफी देणे जास्त सोईचे ठरेल” असे दुसऱ्याने सुचवले आहे.
या पोस्टला आत्तापर्यंत ५०.६K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.