Viral Video: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या इन्स्टाग्राम ॲपवर जेव्हापासून ‘रील’ (Reel) हा फीचर आला आहे, तेव्हापासून डान्स, मेकअप हॅक, नवनवीन पदार्थ बनविण्याचे कौशल्य रिल्समार्फत अनेकांपर्यंत सहज पोहचवले जात आहेत. यामध्ये एकीकडे कौशल्य दाखवणारे व्हिडीओ तर दुसरीकडे प्रसिद्ध होण्यासाठी विचित्र स्टंट करणारे व्हिडीओही व्हायरल होत असतात. तर आज असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत एक तरुणी हातात बंदूक घेऊन रस्त्याच्या मधोमध नाचताना दिसली आहे.
व्हायरल व्हिडीओ लखनऊचा आहे. यूट्यूबर सिमरन यादव ही तरुणी लखनऊच्या एका महामार्गावर रील शूट करताना दिसली आहे. रस्त्यावरून वाहनांची, नागरिकांची ये-जा सुरू असते; तरीदेखील यादरम्यान एका प्रसिद्ध भोजपुरी गाण्यावर तरुणी नाचताना दिसत आहे. पण, एवढंच नाही तर या तरुणीने महामार्गाच्या मधोमध उभं राहून, हातात बंदूकदेखील घेतली आहे. तरुणी सर्रास हातात बंदूक घेऊन कायद्याचे उल्लंघन करताना दिसून आली आहे. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, रस्त्याच्या मधोमध उभं राहून, बंदूक हातात घेऊन तरुणी महामार्गावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच ॲड. कल्याणजी चौधरी या युजरने @DeewaneHindust1 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून हा व्हिडीओ रिपोस्ट करून ‘कायदा आणि आचारसंहितेचे खुलेआम उल्लंघन करत आहे’ ; अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच लखनऊ पोलिसांनी याची दखल घेतली आहे. पोलिसांनी व्हिडीओखाली प्रतिक्रिया दिली की, ‘या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.’
सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून नेटकरीही संताप व्यक्त करताना दिसले आहेत. अनेक युजर्स अधिकाऱ्यांना त्वरित कारवाई करण्याचे आवाहन करताना दिसले, तर एका युजरने ‘रस्त्याच्या मधोमध आजूबाजूच्या लोकांसह बंदूक दाखवणं योग्य आहे का?’ असा सवाल केला आहे. तर काही युजर्स प्रसिद्धीसाठी लोकं कायपण करतात, असे कमेंटमध्ये सांगत आम्हाला आशा आहे की अधिकारी रील बनवणाऱ्या तरुणीवर नक्कीच कारवाई करतील; अशा विविध प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. याआधीसुद्धा दिल्लीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये व्यक्ती रस्त्याच्या मधोमध खुर्चीवर बसून रील शूट करताना दिसली होती. व्हिडीओ व्हायरल होताच दिल्ली पोलिसांनी २६ वर्षीय व्यक्तीवर निर्णायक कारवाई केली होती व त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला होता.
