कावळा काव काव करतो, चिमणी चिव चिव करते, कुत्रा भुंकतो, मांजर म्याँव म्याँव करते वगैरे ओळी लहानपणापासून आपल्या सगळ्यांकडून पाठ करून घेतल्या जातात.

तर यापैकी मांजर म्याँव म्याँव करते ना? आता पुढचा व्हिडिओ पहा

सौजन्य- यूट्यूब

या व्हिडिओमधली ही मांजर चक्क मेंढीसारखा आवाज काढतेय. एरव्ही मांजरी काढत असलेल्या कुठल्याही आवाजाशी ही मांजर काढत असलेला आवाज साधर्म्य दाखवत नाही. हा व्हिडिओ बनावट आहे आणि खऱ्याखुऱ्या मेंढीचा आवाज या मांजरीच्या व्हिडिओला जोडला आहे अशी शंका आपल्याला येते खरी. पण हा व्हिडिओ बनावट नाहीये. ही मांजर खरंच असा आवाज काढतेय. नेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमधली ही मांजर समोर कुठेतरी बघत हा आवाज काढत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतेय. भिंतीवर असलेल्या एका किड्याकडे पाहून ही मांजर असा विचित्र आवाज काढत असल्याची माहिती नेटवर प्रसिध्द झाली आहे.

मांजरीच्या असा आवाज काढण्याला ‘चॅटरिंग’ म्हणतात. हा असा आवाज मांजरी नेहमी काढत नसल्या तरी रानटी मांजरी आणि पाळीव मांजरी या दोन्ही अशा प्रकारचा आवाज काढू शकतात. प्राणिशास्त्रज्ञांच्या मते जेव्हा या मांजरींना ‘फ्रस्ट्रेशन’ येतं त्यावेळी त्या असा आवाज काढतात!

आता या व्हिडिओमधल्या मांजरीला असं फ्रस्ट्रेशन वगैरे आल्याचं वाटत नाहीये. मग ती असा आवाज का काढतेय?

जेव्हा एखादी शिकार आपल्या नजरेच्या टप्प्यात असूनही तिच्यावर झडप घालता येत नाही त्यावेळी निराश होत मांजरी असा आवाज काढत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. पण आता भिंतीवरचा किडा हे काय मांजरीचं खाणं आहे का?

पण प्राणिजगतामध्ये आणि आपल्यामध्येही ‘कंडिशनल रिफ्लेक्स’ नावाचा प्रकार असतो. आठवा इव्हान पॅव्हलोव्ह आणि घंटा वाजवल्यावर भूक लागणारा त्याच्या कुत्र्याचा प्रयोग.

आता या वरच्या व्हिडिओमध्येही तसंच होतंय. आपल्या नजरेच्या टप्प्यात काहीतरी हलतंय आणि आपल्याला ते काय आहे त्याचा नक्की अंदाज बांधता येत नसल्याने ही मांजर जाम निराश झाली आहे. मांजरींमध्ये जात्याच उत्सुकता असते. त्यामुळे आपल्याला काही कळत नसल्याचं लक्षात आल्यावर ‘फ्रस्ट्रेट’ होणं साहजिक आहे.

पण त्यानंतर त्या मांजरीने काढलेला आवाज जाम भारी आहे भाऊ!