उमेदवारीच्या याद्या जाहीर झाल्या आणि सेना-भाजपच्या गडावर कधीपासून ताटकळून राहिलेल्या इच्छुकांच्या फौजांमधील काही चेहरे अपेक्षापूर्तीच्या समाधानाने उजळले. काहींच्या चेहऱ्यावर भविष्याच्या काळजीची काजळी पसरली, तर काहींनी स्वत:लाच समजावत असल्यासारखे चेहरे करून, उमेद कायम ठेवून, पुढच्या यादीची प्रतीक्षा सुरू केली. सुखदु:खांच्या त्या हिंदोळ्यावर सारे राजकारण झोके घेत असताना, काही चेहरे मात्र, तटस्थपणे आपापल्या नेमून दिलेल्या कामात इदं न मम भावनेने मग्न होते.. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून दिसणाऱ्या या वातावरणात, ज्यांची तिकिटे कापली गेली, त्यांच्या दु:खाला वाचाही फुटली होती आणि त्या दु:खाची चर्चाही सुरू होती.. अशा उदासवाण्या चेहऱ्यांच्याच गर्दीत, उमेदवारीच्या रिंगणातून बाहेर फेकला गेलेला एक मावळता चेहरा मात्र, कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने उजळलेला दिसत होता. उमेदवारी कापली गेल्याचे कोणतेही दु:ख दूरच, एका परमोच्च त्यागाचे पुण्य पदरी पडल्याची एक उदात्त भावना त्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटलेली दिसत होती. निवडणुकीच्या राजकारणात आजवर असे घडले नसेल.. याआधी कधीही, कुणालाच न दिसलेली ही घटना ज्या ठिकाणी घडली, ते ठिकाण म्हणजे, मुंबईचा वरळी विधानसभा मतदारसंघ आणि त्यागाच्या भावनेने स्वत:स धन्य समजणाऱ्या त्या चेहऱ्याचे नाव, सुनील शिंदे!.. सेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपस्थितांचा आशीर्वाद घेऊन, त्यांची परवानगी घेऊन, शिवरायांच्या व आजी-आजोबांच्या साक्षीने नवा महाराष्ट्र घडविण्याची शपथ घेऊन युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर केली, तेव्हा गर्दीने गच्च भरलेल्या सभागृहातील प्रत्येक मावळ्याच्या मनात जणू रोहिडेश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची शपथ घेणाऱ्या बाल शिवाजीची कथा रुंजी घालू लागली.. कुणी आदित्यउदयसमयी गावयाचे स्तोत्र मनोमन आळवू लागला, तर मंत्रालयाच्या प्रतिष्ठेच्या ‘सहाव्या मजल्या’वर ऐतिहासिक झेप घेण्यासाठी सज्ज झालेल्या आदित्यास्त्राचे तेजस्वी चित्र कुणाच्या मनात आकार घेऊ लागले. आपले तिकीट कापून अन्य उमेदवारास त्या ठिकाणी उमेदवारी दिल्याच्या वार्तेने आनंदाचे उधाण चेहऱ्यावर उमटविणाऱ्या मावळत्या इच्छुकाचे उदाहरण राजकारणाच्या इतिहासावर पहिल्यांदा वरळी मतदारसंघाने कोरले आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, महाराष्ट्राच्या राजकारणास बोटाच्या इशाऱ्यावर नाचविणाऱ्या ठाकरे घराण्याच्या तिसऱ्या पिढीने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. निवडणुकीच्या मार्गाने सत्ताकारणास सज्ज झालेला पहिला ठाकरे म्हणून आता आदित्य ठाकरे यांची नोंद होणार या जाणिवेने शिवसैनिकांत उत्साहाचे वारे वाहू लागले आहे. विधानसभेवर फडकणारा भगवा आणि मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेला ठाकरे घराण्याचा वारस ही दोन्ही स्वप्ने एकाच वेळी साकारणार अशी स्वप्नेही अनेकांना पडू लागली आहेत.. शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच या वचनाचा पक्षप्रमुखांनी पुनरुच्चार केला होता. या वचनातून एक नवा सामना सुरू झाला आहे आणि त्याच्या पूर्तीसाठी आपण बांधलेल्या मतदारसंघाची पुण्याई पणाला लावण्याची ‘हीच ती वेळ आहे’ या भावनेने सुनील शिंदे नावाचा एक मावळता आमदार, एक सच्चा सैनिक समाधानाने भारावला असेल, तर त्यात नवल नाहीच!