तसे आम्ही नियमांचे पालन करणारे लोक. कधीच कुणाशी खेटायचे नाही. आपले काम भले व आपण हीच आमची वृत्ती राहिलेली. एरवी देशात चाललेल्या घडामोडीकडेही आमचे लक्ष नसायचे. इंधनाचे दर वाढले की कमी झाले, डाळ व तेलाच्या भावात झालेले चढउतार, कांद्याची स्वस्ताई हेच आमच्या काळजीचे विषय. वर्षांला होणारी वेतनवाढ किंवा दोनदा मिळणारा महागाई भत्ता जाहीर झाला की तत्परतेने आकडेमोड करून हातात किती जादा पडेल हे समजून घेण्यातच आम्हाला रस. वर्षांतून एकदा येणाऱ्या अर्थसंकल्पातील आकडेमोड, त्यातला ‘आला व गेला रुपया’ , ‘हे स्वस्त हे महाग’ वाचण्यातच आमची गोडी. बाकी महागाईचे धक्के आमच्या पाचवीलाच पुजलेले. एकूणच या सगळ्याची सवय झाल्याने जगण्यत एक स्थितीवादीपणा आलेला. आता या टाळेबंदीने त्यालाच धक्के बसू लागलेत हो! आम्हाला ती कडेकोट होती तेव्हा झाला नाही इतका वात या महिन्याकाठी जाहीर होणाऱ्या सवलतींनी आणला. मध्यमवर्गाच्या अपेक्षा काय हेच या सरकारला कळत नसावे. करोनामुळे इतका झापडबंदपणा कसा काय येऊ शकतो हे अजून कळले नाही आम्हाला. आधी तुम्ही म्हणाले पंखे घ्या, पण कुलरकडे पाहू नका. नंतर परवानगी दिली दुचाकीवर एकटे जाण्याची. अहो, खरेदी म्हटले की पत्नीला न्यावेच लागते ना! तिच्या मान्यतेशिवाय घरातले पान हलत नाही आमच्या. आता म्हणता योगा करा, पण बंदिस्त व्यायाम नको. असेल योगा तुमच्या धोरणाचा भाग. आम्हाला तर शरीरातून घाम गाळण्यातच रस. त्यानेच माणूस तंदुरुस्त राहतो. या दोन्ही गोष्टी सामूहिकपणे होतात सगळीकडे. मग भेदाभेद कशाला? आता हे मॉलचेच बघा ना! महिन्यातून दोनदा तरी कुटुंबाला त्यात नेणे, थोडीफार खरेदी करणे, एखादा सिनेमा बघणे, बाहेरचे खाऊन परत येणे ही गेल्या कित्येक वर्षांची आमची सवय. त्याचेच तुकडे पाडता राव तुम्ही. मॉलमध्ये जा, तिथे रांगा लावा, पण स्वतंत्र खुर्चीवर बसून सिनेमा बघायचा नाही. तिथल्या हॉटेलच्या पार्सलसाठी रांगेत लागा, त्यासाठी रेटारेटी करा, पण स्वतंत्र टेबल बुक करून तिथे बसून खाऊ नका. लग्नाला जा, पण ५१वे ठरू नका आणि हे सगळे करताना शारीरिक अंतर पाळा. हे नियम  असे  की कळेनासेच होते.  रांगेत उभे राहायचे म्हणजे खेटूनच हीच सवय आम्हाला जडलेली. जोवर समोरचा खेकसत नाही तोवर अंतर निर्माण करायचे नाही हाच स्वभाव साऱ्यात भिनलेला. त्याला मोडता घालणे तसे कठीणच. त्यात तुमचे रोज बदलणारे नियम. आजकाल तर घरातून बाहेर पडण्याआधी भ्रमणध्वनीत जपून ठेवलेले तुमचे शेकडो आदेश पुन्हापुन्हा नजरेखालून घालावे लागतात. न जाणो  चुकून एखादा नियम मोडला गेला तर उगीच अडचण नको व्हायला!

एवढय़ा मार्गदर्शक सूचना काढण्यापेक्षा तो मेघवालांचा भाभीजीचा पापड घरोघरी वाटा की.. तो खाऊनच बाहेर पडले की साराच धोका टळेल आणि आम्हा सामान्यांना भटकण्याचा आनंदही घेता येईल. सोबतीला हनुमानचालिसा आहेच. ती तर आम्ही केव्हाही म्हणू शकतो. अगदी रांगेत उभे राहूनसुद्धा. तेव्हा आता नव्या सवलती जाहीर करताना या दोन गोष्टींचा विचार कराच. तुम्हालाही अडचण नको व आम्हालाही! करेाना काय आज आहे उद्या नाही. आमचे स्थितीवादी जगणे तेवढे सुस करा!