..केंद्र सरकारच्या गृहखात्याबाबत वर्तमानपत्रांत, तसेच काही वृत्तवाहिन्यांवर ज्या काही विपर्यस्त बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्याबाबत येणेप्रमाणे पत्रखुलासा करीत आहोत. आपले गृहखाते माननीय राजनाथ रामवदन सिंह हे सद्गृहस्थ सांभाळत आहेत. देशाचे गृहखाते सांभाळायचे म्हणजे असेच गृहस्थ पाहिजेत. तब्येतीने सणसणीत. हिंदीवर उत्तम प्रभुत्व. राष्ट्रवाद नसांनसांतून वाहतो त्यांच्या. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत असतात ते सदैव. शिक्षण भौतिकशास्त्रातील द्विपदवीधर. म्हणजेच विज्ञानाचा चांगला व्यासंग. अशी सारी वैशिष्टय़े असताना आणखी काय पाहिजे? त्यांच्या या खात्याच्या संकेतस्थळावर काही जणांनी म्हणे हल्ला केला. दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली गेल्यावर ही बाब उघड झाली म्हणे. आता हे सारे वर्तमानपत्रांच्या, तसेच वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना कुठून कळले, ते कळावयास मार्ग नाही. पण या बातमीत काहीही तथ्य नाही. राजनाथ ज्या खात्याचे प्रमुख आहेत, त्या खात्याचे संकेतस्थळ इतके लेचेपेचे असेल असे वाटले काय कुणाला? की कुणीही यावे आणि टपली मारल्यासारखे  त्यावर हल्ला करावा. अरे, ज्या संकेतस्थळाभोवती जाज्वल्य राष्ट्राभिमानाचा कोट आहे, त्यावर असा हल्ला होईलच कसा. हल्ला करणाऱ्यांची शस्त्रे मोडून पडतील या अभेद्य कोटाला टक्कर दिल्यास. यातील खरी बाब अशी आहे की, गृहखात्याच्या संकेतस्थळाची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. आपल्या साध्या घराची दुरुस्ती हाती घेतली तर किती गोंधळ असतो, याची कल्पना असेलच सगळ्यांना. हे तर आपल्या सगळ्या घरांचे रक्षण करणाऱ्या गृहखात्याचे संकेतस्थळ. त्याच्या दुरुस्तीसाठी वेळ लागणारच. त्यामुळेच हे संकेतस्थळ काही काळ दिसेनासे झाले होते. त्यावरून उगाचच आवई उठवली गेली की संकेतस्थळावर हल्ला झाला म्हणून. प्रसिद्धीमाध्यमांना अनुचित सवयच जडली आहे, अशा प्रकारच्या बातम्या देण्याची. फार मागे कशाला जायचे. नोटाबंदीचे उदाहरण अगदी ताजे आहे. केवढा मोठा आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आमच्या सरकारने. देशातील काळ्या पैशाला चाप लावण्यासाठीचा जालीम उपाय होता तो. त्यावरून किती गदारोळ केला प्रसिद्धीमाध्यमांनी. ‘सामान्यांचे हाल झाले, ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था हादरली, बेरोजगारीत वाढ झाली..’ असे काय काय शोध लावले त्यांनी. तशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. प्रत्यक्षात तसे काहीही झालेले नाही, हे सगळे बघतच आहेत. देशातील सगळे काळे धन नष्ट झाले असून, सर्वत्र धवलधनाच्या तेजाची प्रभा पसरलेली आहे. आता ही प्रभाच प्रसिद्धीमाध्यमांना दिसत नसेल, तर त्यास सरकार तरी काय करणार? गृहखात्याच्या संकेतस्थळावर हल्ला झाल्याचे कथित वृत्तही याच प्रकारचे आहे. त्याकडे अजिबात गांभीर्याने पाहू नये, ही तमाम राष्ट्राभिमानी भारतीयांना आमची विनंती.