वसई: विरारच्या गोकुळ टाऊनशिप येथे राहणाऱ्या अमृता गुरव या विद्यार्थ्यीनीने दहावीच्या परीक्षेत कर्करोगाशी झुंज देत अभूतपूर्व यश मिळवले आहे. तिला ८०.२० टक्के इतके गुण मिळाले आहेत.जॉन २३ वे मराठी शाळा आगाशी येथील शाळेत इयत्ता पाचवीला असताना अमृताला कर्करोग आजाराचे निदान झाले होते. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू झाले.
यामुळे तिला अर्ध्यावरच शाळा सोडावी लागली. मात्र अमृताला शिकण्याची प्रबळ इच्छा शक्ती असल्याने तिने तिचे शिक्षण सुरूच ठेवले. आईवडिलांचा पाठिंबा आणि आपल्या बहिणी सोनाली व अंकिता यांच्या मार्गदर्शनाखाली तिने आपले शिक्षण चालू ठेवले. डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगूनही अमृता नेटाने, सातत्याने अभ्यास सुरूच ठेवला होता. दहावीची परीक्षा द्यायची असल्याचा हट्ट तिने आपल्या घरात आई वडिलांसमोर धरला होता. त्यानंतर तिने विरारच्या उत्कर्ष महाविद्यालय येथे १७ नंबरचा फॉर्म भरून अभ्यास सुरू केला. आणि दहावीच्या परीक्षेत तिला ८०.२० % गुण मिळाले आहेत. आपल्या या यशात आपले वडील अमोल गुरव, आई अनिता गुरव, दोन्ही बहिणी, मार्गदर्शन करणारे उत्कर्ष महाविद्यालाचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच इयत्ता पाचवीपासून सातत्याने पाठपुरावा, सहकार्य करणारे जॉन २३ वे मराठी शाळा, आगाशी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचा मोलाचा वाटा असल्याचे अमृताने सांगितले.
तिची जिद्द पाहून आम्ही सुद्धा खूपच आनंदी आहोत. यापुढे ही महाविद्यालयात प्रवेश घेऊन शिक्षण सुरू ठेवणार आहे असे अमृताची बहीण सोनाली गुरव हिने सांगितले आहे.या मिळालेल्या यशाबद्दल अमृता हिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
शिक्षकांची साथ मोलाची
आगाशी येथील जॉन २३ या शाळेत शिकत असताना तिला कर्करोगाचे निदान झाले होते. त्यामुळे तिने शाळा सोडली मात्र शाळा जरी सोडली असली तरी तिचे वर्गशिक्षक फेलिक्स डिसोझा हे तिच्या सातत्याने संपर्कात होते. अमृता ही सुरवातीपासूच अभ्यासात हुशार विद्यार्थीनी होती. तीच जिद्द तिने आजारपणात ही कायम ठेवली म्हणून तिला हे यश मिळाले असल्याचे डिसोझा यांनी सांगितले आहे.