वसई: चिंचोटी -कामण -भिवंडी रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. याबाबत गुरुवारी श्रमजीवी संघटनेने चिंचोटी येथे रास्ता रोको आंदोलन केले.  या आंदोलनकर्त्यांनी हा राज्य मार्गाचा रस्ता रोखून धरल्याने दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली आहे.

चिंचोटी कामण भिवंडी रस्त्याची मागील अनेक वर्षांपासून अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे अपघातही घडतात. पावसाळा सुरू झाल्याने रस्त्याची आणखीनच बिकट अवस्था बनली आहे. या रस्त्यावर दीड ते दोन फूट इतके खोल खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे येथून ये जा करताना शाळकरी विद्यार्थी, कामगार वर्ग, मालवाहतूकदार यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पावसाळ्यात जेव्हा खड्डे पाण्याने भरतात तेव्हा त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. तर उंच सखल असा रस्ता असल्याने काही वेळा अवजड मालाचे वाहने कोसळू लागली आहेत.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही योग्यरीत्या उपाययोजना आखल्या जात नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चिंचोटी- कामण व भिवंडी रस्त्यासाठी गुरुवारी सकाळी भजनलाल डेअरीच्या समोरील रस्त्यावर बसून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.

चिंचोटी-कामण-भिवंडी हा दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा महामार्ग असून मागील अनेक वर्षांपासून तो नादुरुस्त आहे. या रस्त्यावरुन वाहन चालविणे फार धोकादायक बनले असून यापूर्वीसुद्धा अनेक अपघात रस्त्यावर घडले आहेत. तरीही प्रशासनाला जाग येत नाही. काँक्रिटीकरण केले जात आहे ते पण योग्य केले जात नाही, असे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आले होते मात्र आश्वासन खोटे ठरले असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. आजही येथील नागरिक व येथून ये जा करणारे नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करतात. रस्त्यांची दुरुस्ती, पाणी निचरा होण्याचे मार्ग मोकळे करावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. यात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह नागरिक ही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. मुख्य ये जा करण्याचा रस्ता रोखून धरल्याने वाहतूक सेवा ठप्प झाल्याने कोंडी निर्माण झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.