भाईंदर : महापालिकेच्या तरण तलावात बुडून मृत्य झालेल्या ग्रंथ मूथाच्या पालकांना आता मृत्यू दाखला मिळविण्यासाठी सतत पालिका दप्तरी फेऱ्या मारायची परिस्थिती ओढवली आहे. गुरुवारी मुलाच्या आईला कार्यालयात अश्रू अनावर झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाल्याचे दिसून आले.

भाईंदर पूर्व येथील महापालिकेच्या गोपीनाथ मुंडे या क्रीडा संकुलातील तरण तलावात बुडून ग्रंथ मूथा (९) या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास अदयापही सुरु आहे.तर महापालिका प्रशासनाने देखील या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केले असून समितीने आपला अहवाल महिन्याभरापूर्वीच प्रशासनाला दिला आहे. मात्र त्यानंतरही क्रीडा संकुलाच्या व्यवस्थापकावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

परिणामी मूथा याचे कुटुंबीय न्याय मिळवण्यासाठी शासन दरबारी सतत फेऱ्या मारत आहे.

दरम्यान आता ग्रंथ च्या मृत्यू दाखल्यासाठी देखील कुटुंबीयांची परवड होत असल्याची बाब समोर आली आहे. मागील काही दिवसापासून ग्रंथचे आजोबा( आईचे वडील) महापालिकेत ग्रंथ च्या मृत्यू दाखल्यासाठी जात होते. मात्र महापालिकेच्या नव्या नियमानुसार मृत्यू दाखले हे प्रभाग कार्यालयात देत असल्याचे त्यांना सांगण्यात येत होते. ही बाब नीट समजत नसल्यामुळे त्याची धावपळ होत होती.

ग्रंथचा दाखला घेण्यासाठी आईनेच महापालिकेचे प्रभाग कार्यालय ४ गाठले. त्यावरून त्यांना गुरुवारी दाखला घेण्यासाठी बोलावले होते. मात्र १० वाजता कार्यालयात हजर झाल्यानंतर त्यांना टोकन देण्यात आले.यात टोकन क्रमांक १८ असल्यामुळे त्यांना पुढील दोन तास बसून राहावे लागले. या दरम्यान आईला रडणे आवरले जात नव्हते. हे पाहून एका वरिष्ठ महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना विचारणा केली. यावेळी ही ग्रंथ ची आई असल्याचे समजताच प्रशासनाची धावपळ उडाली.आणि लगेचच त्यांना दाखला दिल्या जाणाऱ्या खोलीत नेण्यात आले.मात्र या संपूर्ण प्रसंगात तीन तास वाया गेल्यामुळे ग्रंथ च्या आईने प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. तर या प्रकरणी स्वतः माहिती घेत असल्याची प्रतिक्रिया उपायुक्त प्रसाद शिंगटे यांनी दिली आहे.

दाखला घेण्यास नकार

ग्रंथ मुथाचा मृत्यू हा महापालिकेच्या तरण तलावात बुडून झाला होता. त्यानंतर त्याला मिरा रोड येथील तुंगा रुग्णालयात नेण्यात आले होते.मात्र ग्रंथच्या मृत्यू दाखल्यात महापालिकेच्या तरुण तलावाचा उल्लेख करण्याऐवजी तुंगा रुग्णालयाचा उल्लेख करण्यात आला आहे. या कागदपत्राच्या आधारे महापालिका तसेच मृत्यूस जबाबदार असलेले वाचण्याची शक्यता असल्यामुळे मूथाच्या आईने दाखला घेण्यास नकार दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.