वसई : पोलीस भरतीमध्ये अनुत्तीर्ण झालेला एक तरुण चक्क सोनसाखळी चोर बनला आहे. विशेष म्हणजे केवळ दुचाकीवरून जाण्याऱ्या महिलांच्याच गळ्यातील सोनसाखळी चोरण्याची जोखमीची चोरी तो करत होता. गुन्हे शाखा ३ च्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळ्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. २५ जानेवारी रोजी विरारमध्ये दुचाकीवरून जाणार्‍या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरण्यात आले होते. विशेष म्हणजे दुचाकीवरून आलेल्या इसमानेच धावत्या दुचाकीवरून ही चोरी केली होती. सोनसाखळी चोरीचा हा जोखमीचा आणि नवा प्रकार होता. याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखा ३ कडे सोपविण्यात आला होता.

पोलिसांच्या पथकाने सीसीटिव्ही चित्रण आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून तलासरी येथून अमित शनवार (२८) या तरुणाला अटक केली. त्याने विरार, नालासोपारा तसेच अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून केलेले सोनसाखळी चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हे शाखा ३ च्या पथकाचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत आदींच्या पथकाने आरोपीला पकडण्यात यश मिळवले.

हेही वाचा : वसई: नैसर्गिक नाल्यावर माती भराव करणाऱ्याची शोध मोहीम; आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत करणार गुन्हे दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस बनू शकला नाही म्हणून बनला चोर

आरोपी अमित शनवार याला पोलीस बनायचे होते. मुंबई पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत त्याने परीक्षाही दिली होती. मात्र तो अनुत्तीर्ण झाला होता. या अपयशामुळे तो वैफल्यग्रस्त बनला होता. त्यामुळे व्यसन आणि कर्जबाजारी झाल्याने त्याने चोरीचा मार्ग पत्करला. डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांत त्याने सोनसाखळी चोरीचे ४ गुन्हे केले होते. दुचाकीवरून जाणार्‍या महिलांच्या गळ्यातील मंगळसू्त्र आणि सोनसाखळी चोरणे हे खूप कठीण आणि धोकादायक काम होते. यामुळे संबंधित महिलेचा दुचाकीवरून पडून मृत्यूदेखील होऊ शकला असता, असे पोलिसांनी सांगितले.