भाईंदर : मिरा भाईंदरमध्ये गणेश मूर्ती विसर्जनाचा गोंधळ सलग सातव्या दिवशीही समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे साडेचार फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावात पुरेसे पाणी नसल्यामुळे गणेशभक्तांनी नियोजना बाबत संताप व्यक्त केला आहे.

यंदा मिरा भाईंदर महापालिकेने सहा फुटांखालील सर्व गणेश मूर्तींचे सक्तीने कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरात विविध ठिकाणी तब्बल ३५ कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून, यावर जवळपास १ कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्यात आला आहे. मात्र तरीदेखील मूर्ती विसर्जनाबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. यापूर्वी कृत्रिम तलावांमध्ये होणारी गैरसोय आणि विसर्जनानंतर मूर्तींची होणारी विटंबना अशा तक्रारी समोर आल्या होत्या.

दरम्यान, बुधवारी भाईंदर पूर्व येथील कृत्रिम तलावात साडेचार फुटांपर्यंतच्या मूर्ती विसर्जनासाठी मुबलक पाणी उपलब्ध नसल्याचे समोर आले. त्यामुळे मूर्तीचे अर्धवट पाण्यात विसर्जन करण्यास गणेश भक्तांनी नकार दिला. तर, जवळपास तीन ठिकाणी फेरी मारल्यानंतरही अडीच फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींसाठी कोणत्याही तलावात पुरेसे पाणी नसल्याची तक्रार सुशांत शेट्टी यांनी केली. परिणामी, काही भक्तांना नाईलाजाने पीओपी मूर्ती उशिरा खाडीत विसर्जन करून प्रदूषण करावे लागल्याची खंत व्यक्त करण्यात आली.तर कृत्रिम तलावात जवळपास सहा फुटापर्यंतच्या मूर्ती विसर्जन करण्याची सोय करण्यात आली आहे. परंतु त्यात पाणी नसल्याची तक्रार येत असल्यास संबंधित कंत्राटदरावर कारवाई करणार असल्याची माहिती महापालिकेचे अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे

नियोजनातील घोळ

राज्य शासनाच्या आदेशामुळे सहा फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तींचे विसर्जन सक्तीने कृत्रिम तलावात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मिरा भाईंदर शहरात जवळपास २० हजार मूर्तींची प्रतिष्ठापना होत असल्याने पहिल्याच वर्षी काही ठिकाणी मोठा गोंधळ होईल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार अनेक तक्रारी समोर आल्या.मात्र, नागरिकांच्या तक्रारींना सामोरे जाण्यासाठी वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरले नाहीत, यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. तर प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यानेच हा गोंधळ झाल्याची कबुली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे.