भाईंदर : मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयाची स्थापना होऊन जवळपास पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला आहे.मात्र अद्याप आयुक्तालयासाठी आवश्यक असलेले बॉम्ब शोधक आणि निष्क्रियकरण (बीडीडीएस) आणि श्वान पथक स्थापन झालेले नाही. परिणामी, संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना अनुभव नसताना जीव धोक्यात घालून कारवाई करावी लागत आहे.
मिरा भाईंदर व वसई विरार शहराची वाढती लोकसंख्या व येथील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ठाणे व पालघर ग्रामीण पोलिस विभागाचे विभाजन करून २०२० साली स्वतंत्र आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली आहे. स्थापनेनंतर मनुष्यबळात वाढ, पोलिस ठाण्यात वाढ, सायबर पोलीस ठाणे आणि इतर आधुनिक गोष्टीची उभारणी प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.मात्र अदयापही अनेक महत्वाच्या गोष्टीचा समावेश यात झालेला नाही.
विशेषतः बीडीडीएस व श्वान पथकाची अनुपस्थिती ही पोलिस यंत्रणेच्या दृष्टीने मोठी अडचण ठरत आहे. मिरा-भाईंदर व वसई-विरार हे क्षेत्र मुंबई व ठाणे या संवेदनशील शहरालगत असून, याआधी येथे दहशतवादी कारवायांशी संबंधित संशयितांना अटक करण्यात आली आहे.तसेच, देशभरातून गुन्हा करून आलेले आरोपी येथे लपून बसल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. काही वर्षांपूर्वी शहरात बॉम्बस्फोटाच्या धमक्या देखील प्राप्त झाल्या होत्या.तर नुकताच विविध ठिकाणी शाळेत बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचे ईमेल येत आहेत.
अशा पार्श्वभूमीवर, स्वतंत्र बीडीडीएस आणि श्वान पथक असणे अत्यावश्यक आहे.मात्र हे पथक नसल्यामुळे एखादी संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना जीव धोक्यात घालून त्याची पाहणी करावी लागत आहे. किंवा दुसऱ्या ठिकाणाहून बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करावे लागते.
अन्य आयुक्तालयांची मदत
मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकडे बीडीडीएस व श्वान पथक नसल्यामुळे, कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास येथील पोलिसांना ठाणे किंवा पालघर ग्रामीण पोलिसांच्या पथकांवर अवलंबून राहावे लागते. अनेक वेळा हे पथक पोहोचण्यास उशीर होतो, परिणामी तातडीच्या परिस्थितीत वेळेवर प्रतिसाद देण्यात अडचणी निर्माण होतात.
पथक उभारणीस मंजुरी
मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी बीडीडीएस व श्वान पथक उभारण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी शासनाकडे पाठवण्यात आला होता. शासनाकडून याला मंजुरी मिळाली आहे. मात्र त्याआधी आवश्यक साहित्य खरेदी व यंत्रणा उभारण्याचे काम स्थानिक प्रशासनाला करावे लागणार आहे. त्या दृष्टीने काम सुरू झाले असून, ही उणीव लवकरच भरून निघेल, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली आहे.