वसई: नालासोपारा ते कामण अशी विद्युत यंत्रणा सुरळीत करण्यासाठी नवीन ११० मोनोपोल उभारण्याचे नियोजन केले आहे. मात्र हे पोल उभारण्यासाठी आता महावितरणला वनविभागाची परवानगी यासह अन्य अडथळ्यांना सामोरे जावे जावे लागत आहे.

वसई पूर्वेच्या भागात कामण चिंचोटी भागात महावितरणच्या नालासोपारा उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. मात्र या भागात टाकण्यात आलेली २२ किलोमीटरची विद्युत वाहिनी जुनी झाली आहे तर दुसरीकडे वीज ग्राहकांच्या वाढत्या संख्येमुळे ती अतिभारीत झाली आहे. त्यामुळे या भागात सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडू लागले आहे.

या उपाययोजना म्हणून आता महावीतरणाने नवीन उपकेंद्र निर्मिती यासह या भागात ११० मोनोपोल उभारण्याचे काम सुरू केले आहे. यापैकी आता ३५ ठिकाणी हे पोल उभारणीची काम सुरू झाले आहे. मात्र अजूनही ७५ पोल उभारण्याचे काम प्रलंबित आहे. यातील काही पोल हे वनविभाग व तुंगारेश्वर अभयारण्याच्या जागेतून जात आहेत. यात वनविभागातून २० पोल तर १८ तुंगारेश्वर अभयारण्याच्या भागातून जात आहेत. त्यामुळे महावितरणला आता वनविभागाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठीची प्रक्रिया ही महावितरणने सुरू केली असल्याची माहिती दिली आहे. मात्र जो पर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत पुढील काम करण्यात अडचणी येत आहेत.

आता महावितरणने ते क्षेत्र वगळून उर्वरित जे पोल आहेत तिथेही जागा निश्चित करून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातही काही ठिकाणी हरकती व विरोध येत असल्याचे ठेकेदारांकडून सांगण्यात येत आहे. या मोनोपोल उभारण्याच्या कामातील अडथळ्यांच्या शर्यतीमुळे हे काम लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न

मोनोपोल उभारणीचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी महावितरण कडून प्रयत्न सुरू झाले आहेत ज्या काही आवश्यक परवानगी आहेत त्यासाठी वनविभाग व त्याचे संबंधित अधिकारी यांची भेट घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी सांगितले आहे. वनविभागाच्या जागेतील पोल वगळून अन्य भागातील पोल येत्या एका महिन्यात आत मध्ये लावण्यात यावे अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. याशिवाय गरज पडल्यास पोलीस बंदोबस्त घेऊन कामे पूर्ण करा असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेची ही मदत घेऊ

सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याची घटना घडत असल्याने आता या मार्गावरील काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेची हद्द आहे जिथे अतिक्रमण आहे तिथे ही महापालिकेची मदत घेतली जाणार असल्याचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे. याबाबत नुकताच महापालिका आयुक्तांची भेट घेतली त्यांनी ही मदत करण्याचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.