News Flash

बाल्कनीतील छोटुशी बाग 

आपल्या घरात एखादं तरी फुलझाड असावं अशी इच्छा बऱ्याच जणांना असते.

आपल्या घरात एखादं तरी फुलझाड असावं अशी इच्छा बऱ्याच जणांना असते. एखादं फुलझाड, कमीत कमी तुळस तरी घरी लावण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतोच. माझ्या वडिलांना फुलझाडांची खूप हौस होती आणि तीच बहुधा आम्हा भावंडांमध्ये आली असावी. माझं लहानपण सोलापुरात गेलं. तेथे आम्ही राहायचो त्या वाडय़ात वडिलांनी खूप झाडे लावली होती. जास्त करून गुलाब आणि शेवंती. मी आठवी, नववीत असताना आम्ही गावाबाहेरच्या स्वत:च्या घरात राहायला गेलो. शेतीची जमीन आणि भरपूर जागा त्यामुळे तेथे खूप झाडे लावून हौस भागवता आली. काहीही वेगळे न करता काळी माती भरभरून फुले द्यायची. तेथे बागेची हौस पुरेपूर भागली. कृष्णकमळ तऱ्हेतऱ्हेच्या कोरांटी, शेवंती अशी अनेक फुलझाडं मनाला तृप्त करायची. तेव्हापासूनच कृष्णकमळाच्या फुलाने आणि वासाने मनात घर केले. नंतर आम्ही मुंबईत आल्यावरही सोसायटीच्या जागेत फुलांची भरपूर हौस भागवता आली. कृष्णकमळ, गुलाब, सोनटक्का अशी विविध फुले अगदी मैत्रिणींना वाटण्याइतपत फुलायची. लग्नानंतर डोंबिवलीतही सोसायटीच्या जागेत घराच्या बाजूला झाडे लावून थोडीफार हौस भागविता आली. तेथे मन तृप्त केलं पिवळी, पांढरी कोरांटी आणि हिरव्या अबोलीने.

आता इकडे अंबर हार्मनीत राहायला आल्यावर आजुबाजूची शेते बघताना आणि घरात येणाऱ्या उन्हामुळे घरात झाडे लावायची इच्छा उफाळून आली. अंबर हार्मनीच्या आठव्या मजल्यावर ८७२ च्या बाल्कनीतल्या छोटय़ाशा जागेत माझी बाग आणि छोटासा मळा फुलला.

त्या छोटय़ाशा बागेची गंमत अशी झाली की, एक दिवस मुलीला सहज म्हटलं की या जागेत ऊन इतकं छान येतंय तर झाडं खूप चांगली होतील. कृष्णकमळ लावलं तर छान होईल असं म्हणायचा अवकाश एकदिवस ती आणि जावई कुंडय़ा, माती, खत आणि कृष्णकमळीचं झाड घेऊन दारात हजर. खरंच मी माझा आनंद आणि नवल लपवू शकले नाही. माझी लाडकी बकुळी मी जेथे जाते तेथे मला भेटतेच, पण कृष्णकमळ कधी अशी आकस्मिक भेटेल असं वाटलंच नाही. आता ती फुलं बघताना आनंद गगनात मावत नाही. हळूहळू एक दिवस तुळस आणि वृंदावन आलं. सध्या माझी लेक, जावई आणि नातू हे माझ्यासाठी इच्छिलेलं देणारा कल्पवृक्ष झाले आहेत. मी सहज काही बोलावं आणि त्यांनी ते झाड हजर करावं असं चाललं आहे. मध्यंतरी अमेरिकेतून मुलगा आला होता. तर बहीण भाऊ जाऊन दहा प्रकारचे चिनी गुलाब घेऊन आले. कारण त्यांना लागणारं ऊन भरपूर आहे. आता सगळ्या चिनी गुलाबांना कळी आली आहे.

छोटासा भाजीमळाही असाच अचानक झाला. डोंबिवलीला वनराईचं प्रदर्शन भरतं. त्यांतून लेकीने भेंडी, पालक, टोमॅटो, मिरचीचं बी आणलं. पालक, भेंडी, टोमॅटो घरी पिकवलेलं खाताना झालेला आनंद कधीच विसरता येणार नाही. आता छोटय़ाशा मळ्यात भाजीही थोडीच येणार ना! बाजारातून आणलेल्या भाजीत घरची भाजी चिरून टाकली तर त्याचा स्वाद, चव नक्कीच वेगळी असते. कारण घरच्या ताज्या तोडलेल्या भाजीची चव असते. आता पहिला मोसम झाला. पुन्हा टोमॅटो, भेंडी, पालक लावायची आहे. आता वाट बघतेय मिरचीच्या झाडांना मिरच्या लागायची.

हळूहळू बागेतली झाडं वाढत आहेत. कृष्णकमळाच्या जोडीला सदाफुली, अबोली, कुंद गोकर्ण, अशी सारी झाडं फुलत आहेत. जोडीला सुगंधी मरवाही आणला आहे. नवीनच आणलेला पिवळा गुलाब पिवळ्या रंगाची उणीव भरून काढतो. लाल रंगाचं असंच एक झाड अजून फुलायचं आहे. माझ्या या छोटय़ाशा बागेत १०/१२ प्रकारची फुलं फुलताहेत. देवाला आता घरची ताजी फुलं मिळतात. आणि छोटय़ाशा मळ्यात भेंडी, टोमॅटो बरोबर ओवा आणि मायाळूचंही आगमन झालं आहे. त्यामुळे काही दिवसांतच मायाळू आणि ओव्याची भजी खायला मिळणार आहे. सकाळी बागेत बसून चहा- नाश्ता करायला खूप मजा येते.

आम्ही तुमची हौस पुरवतो. फक्त कष्ट तुमचे अशी माझी माणसं म्हणतात. कष्ट करायला जोडीला यजमान आहेतच. त्यामुळे माझीही छोटुशी बाग आणि मळा दिवसेंदिवस जास्तच बहरणार आहेत. आणि त्याबरोबरच आमची मनंही फुलणार आहेत. सकाळी उठल्यावर झाडाला आलेला नवीन कोंब, आलेली नवीन कळी लागलेली भेंडी, टोमॅटो दिवस खूप मजेत घालवितात.

– राजश्री रामचंद्र खरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 11:19 pm

Web Title: garden in the balcony
Next Stories
1 विमानांनी उडावं ते प्रधानांकडे!
2 घरातली पडीक यंत्रे
3 आग प्रतिबंधक जीव संरक्षक उपाययोजना दुर्लक्षीतच
Just Now!
X