|| डॉ. मिलिंद पराडकर

प्राचीन व्यापारी वाटांच्या संरक्षणासाठी म्हणून सह्यद्रीच्या पर्वतरांगांमधील दुर्गरचना सातवाहनांच्या राज्यकाळापासून सुरू झाली. त्यानंतर भारतीय द्वीपकल्पाची धुरा समर्थपणे सांभाळलेल्या वाकाटक, त्रकूटक, आभीर, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव या साऱ्याच राजवटींनी सह्यद्रीतील गिरिदुर्गामध्ये मोलाची भरच घातली. नवनवीन दुर्गाची निर्मिती केली. या साऱ्या राजवटी एतद्देशीय होत्या. इथल्याच मातीच्या पुतांनी रक्त िशपडून उभ्या केलेल्या होत्या. सह्यद्रीच्या अंगाखांद्यावर असलेले सारेच दुर्ग केवळ याच राजवटींनी निर्मिले होते. तेराव्या शतकात मुसलमानी राज्यकत्रे महाराष्ट्रदेशी प्रवेशले अन् नंतरच्या शे-शंभर वर्षांत दक्षिणभर पसरले. बहमनी आणि नंतर त्यांच्या शकलांपासून निर्माण झालेल्या दक्षिणच्या पाच शाह्यंनी दख्खनच्या पठारापासून ते पश्चिम समुद्राच्या लाटांपर्यंत आपला पाशवी अंमल प्रस्थापित केला. या सगळ्या गदारोळात सह्यद्रीतले दुर्गही त्यांच्या ताब्यात आले. या मुसलमानी सत्तांचा इतिहास पाहिला तर प्रथमदर्शनीच जाणवून जाते की, यांनी कधी सह्यद्रीच्या विक्राळ मुलखात पाय रोवायचे प्रामाणिकपणे प्रयत्न केले नाहीत. काही शिवकालीन लिखाणामध्ये याचे प्रतििबब उमटलेले आहे. एक गोष्ट निर्वविाद की, या मुसलमानी सत्ता गिरिदुर्ग बांधण्याच्या भानगडीत कधीच पडल्या नाहीत. एक तर हा भौगोलिक प्रदेश त्यांच्या मानसिकतेला पोषक नव्हता. दुसरे म्हणजे, असलेले दुर्ग त्यांच्या हाती इतके सहजपणे पडले की, नवीन बांधायची गरजही त्यांना वाटली नाही. त्यामुळे सह्यद्रीतील सारेच गिरिदुर्ग दक्षिणेतील मुसलमानी शाह्यंच्या अगोदर, म्हणजे यादव साम्राज्याच्या अंतापर्यंत बांधले गेले असे खात्रीलायकरीत्या म्हणता येते. या शाह्यंनी उत्तम मदानी दुर्ग बांधले. मागील काही लेखांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे अहमदनगर, बीदर, कल्याणी, पिरडा, नळदुर्ग, सौंदत्ती, विजापूर, गोवळकोंडा अशा अनेकानेक उत्तमोत्तम भूदुर्गाच्या रचना त्यांनी केल्या. दुर्गस्थापत्याचा विचार करता ही त्यांची मौलिक भरच म्हणायला हवी. मात्र दुर्गामध्ये गिरिदुर्गच सर्वोत्तम हा आचार्यप्रणीत पूर्वसूरींचा वारसा केवळ शिवछत्रपतींनी आजीवन सांभाळला. किंबहुना, नुसताच सांभाळला नाही तर त्यात नवनवीन अध्यायांची भरच घातली.

शिवछत्रपतींनी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न पाहिले त्या काळात समाजाची सर्वसाधारण अवस्था ही अतिशय बिकट होती. इ. स. १६३०च्या सुमारास पडलेल्या भयाण दुष्काळाने महाराष्ट्राची विधुळवाट लागली होती. तत्कालीन पत्रांमध्ये, लिखाणांमध्ये, संतसाहित्यामध्ये या भयाण परिस्थितीची नेटकी प्रतििबबे उमटलेली दिसतात. या दुष्काळाचे ‘थोरला दुष्काळ’ असे नामकरण झाले होते. डचांनी या दुष्काळाची नोंद केली आहे. ‘बादशहानाम्या’त म्हटले आहे- ‘‘..भाकरीच्या तुकडय़ासाठी लोक स्वत:ला विकून घ्यायला तयार होते, पण विकत घेणाराच कुणी नव्हता. ..शेवटी दारिद्रय़ इतके शिगेला पोहोचले की माणसे माणसांना खाऊ लागली. आणि पुत्रप्रेमापेक्षा पित्याला त्याचे मांस प्रिय वाटू लागले. ..ज्यांना यातनांनी मरण येत नव्हते आणि हालचाल करण्याचे त्राण अद्याप ज्यांच्यात होते, ते परप्रांतात भटकेगिरी करण्यासाठी निघून गेले.’’ शिवभारताचा कर्ता परमानंद कवी म्हणतो- ‘.. श्रीमंत लोक शेरभर रत्ने देऊन मोठय़ा प्रयासाने शेरभर कुळीथ घेत. खाण्यास काही न मिळाल्यामुळे एकच हाहाकार उडून पशू पशूंस आणि माणसे माणसांस अशी परस्परांस खाऊ लागली.’

या दुष्काळामुळे सारे ग्रामीण जीवन उद्ध्वस्त झाले होते. लोक देशोधडीला लागल्यामुळे आíथक व्यवहार खुंटले होते. गुरेढोरे दुष्काळाच्या भक्ष्यस्थानी पडली होती. गुलामगिरी, पराकोटीचे दारिद्रय़, शेती अन् कारागिरी दोहोंची धूळधाण, महागाई, उपासमार या पंचमहाभूतांच्या दावणीला बांधलेला महाराष्ट्र विपन्नावस्थेच्या उंबरठय़ावर उभा होता. जोडीला सुलतानीचा कहर होताच!

या अकाळवर्षांतच इ.स. १६३० मध्ये शिवछत्रपतींचा जन्म झाला.

अतिशय अस्थिर सामाजिक परिस्थिती अन् त्या समाजस्थितीचा दुर्गम भूगोल या अजब रसायनातूनच िहदवी स्वराज्याची संकल्पना जन्माला आली. काळाच्या गरजेतून शिवछत्रपतींच्या असीम भासणाऱ्या कर्तृत्वाचा सह्यद्रीच्या कुशीत जन्म झाला. अनादिकाळापासून हा पर्वत आपली उत्तुंग शिखरे अन् विक्राळ दऱ्या घेऊन उभा होता. प्रगल्भ होत जाणाऱ्या संस्कृतीने मग याच्या अंगावर लेण्यांचे अलंकार अन् दुर्गम दुर्गाची अंगडीटोपडी घातली. विचारवंतांनी प्रतिपादन केलेल्या राज्यशास्त्राच्या विचारधारांच्या दोहो काठांवर या देशीच्या पुत्रांनी रचलेली साम्राज्ये दिगंत कीर्ती प्राप्तकरती झाली. संस्कृतीचे प्रवाह निरंतर वाहते राहिले. आधीच्या पिढय़ांनी घेतलेले वसे, न सांडता न सुटता पुढल्या पिढय़ांच्या हाती येत राहिले. दैववशात सह्यद्री अन् तिथल्या दुर्गाचा वसा शिवछत्रपतींच्या हाती आला.

एका विशिष्ट अशा सामाजिक परिस्थितीमुळे या सत्तेचे केंद्रीकरण डोंगराळ अन् दुर्गम अशा प्रदेशात झाले. अन् मग मध्ययुगीन लष्करी संकल्पनेप्रमाणे दुर्गाचा अन् त्यातही दुर्गाच्या प्रकारांमध्ये सर्वोत्तम म्हणून गणल्या गेलेल्या गिरिदुर्गाचा वापर अनिवार्य ठरला. आक्रमणांपासून स्वत:चा बचाव करण्याच्या दृष्टीने अन् प्रतिहल्ले चढवण्याच्याही दृष्टीने हे गिरिदुर्ग अतिशय उपयुक्त ठरले.

परकीय सत्ताधीशांची अन् त्यांच्या हुकमतीखालील माजोऱ्या एतद्देशीयांची जुलूम-जबरदस्ती मुकाट सहन करीत मावळ खोऱ्यांमधले सर्वसामान्य जन आयुष्य कंठत होते. या जुलम्यांस प्रतिजाप करावा अशी त्यांच्या मनी सुप्त इच्छा दडलेली असणे काही अगदीच असंभव नाही. मात्र शस्त्रबळ, सन्यबळ अन् अर्थबळ हे सारेच स्थानिक देशमुख देशपांडय़ांच्या हाती एकवटलेले होते. ही सारी पुंड मंडळी गढय़ा, कोट बांधून त्यात मोठय़ा बंदोबस्ताने राहत. गावचा वसूलसारा जमा करत. दिवाणामध्ये काही भाग भरला न भरला, अन्यथा अवघाच वसूल गिळंकृत करीत.  हे गबरगंड देशमुख म्हणजे कुशीत काटा सलावा ती गत होती.

रामचंद्रपंत अमात्य म्हणतात : ‘..राज्यातील वतनदार, देशमुख, देशकुलकर्णी, पाटील आदिकरोन यांसी वतनदार म्हणोन म्हणावे. ते स्वल्पच, परंतु स्वतंत्र देशनायकच आहेत. .. हे लोक म्हणजे राज्याचे दायादच. आहे वतन इतकियावरी कालक्रमणा करावी, सर्व देशाचा स्वामी म्हणजे राजा, त्यासी निष्टेने वर्तावे, कोण्हाचा आन्याय न करावा, हे यांची बुद्धि नाही. नूतन संपादावे, बलकट व्हावे, बलकट जाले म्हणजे येकाचे घ्यावे, दावेदरवाडे करावे, हा यांचा सहज हव्यास. राजशासन होईल हे जाणोन आगोधर दुसिऱ्याचा आश्रय करितात; स्थले बांधितात; त्या बले वाटा पाडितात; देश मारितात; समई जिवाचीहि तमा धरीत नाहीत. परचक्र आले म्हणजे वतनाचे आशेने आगोधर सलूख करितात, स्वता भेटतात; तिकडील भेद इकडे, इकडील भेद तिकडे करून राज्यात शत्रूचा प्रवेश करितात. मग तेच राज्याचे आपायभूत होऊन दु:साध्य होऊन जातात. याकरिता या लोकांचे संरक्षण परमयुक्तिजन्य आहे. .. यांस श्नेह आणि दंड या दोहोंमध्ये संरक्षून ठेवावे लागतात. .. वतनदारांस वाडेहुडे बांधू न द्यावे. ..’

अमात्य रामचंद्रपंतांनी हे असे म्हटले, तर शिवछत्रपतींचा चरित्रकार कृष्णाजी अनंत सभासद म्हणतो : ‘इदलशाही, निजामशाही, मोगलाई देशात मुलकांचे पाटील कुलकर्णी यांचे हाती व देशमुखांचे हाती कुल रयत. यांणी कमाविसी करावी व मोघम टक्का द्यावा. हजार दोन हजार जे गावी मिरासदारांनी घ्यावे ते गावी दोनशे तीनशे दिवाणांत खंडमक्ता द्यावा. त्यामुळे मिरासदार पकेकरी होऊन गांवास हुडे, वाडे, कोट बांधून प्यादे बंदुखी ठेवून बळावले. दिवाणास भेटणे नाही. दिवाणाने गुंजाईस अधिक सांगितल्याने भांडावयास उभे राहतात. ये जातीने पुंड होऊन देश बळावले.. त्यांस राजियाने देश काबीज करून वाडे, हुडे कोट पाडिले. नामांकित कोट जाहला तेथे आपले ठाणे ठेविले. आणि मिरासदाराचे हाती नाहीसे ठेविले ..जमीदारांनी वाडा बुरूजांचा बांधू नये. घर बांधून राहावे. ऐसा मुलकाचा बंद केला.’

या दोन्ही साधनांमध्ये अगदी योगायोग मानावा इतपत एकवाक्यता आहे. एक विचार स्पष्ट आहे की, शिवछत्रपतींनी या उपद्रवी वतनदारांस नेमकी जागा दाखवली. त्यांस वरचढ होऊ दिले नाही. ज्यांनी असा प्रयत्न केला, त्यांना त्यांनी पार धुळीस मिळवले. या उद्दाम वतनदारांस शिस्त लावताना त्यांनी कसलाही अन् कोणाचाही मुलाहिजा राखला नाही. अशा आगळ्या नेत्याच्या पाठीशी जनता सर्वशक्तीनिशी उभी न राहती तरच नवल! दुर्ग याच देशीचे होते अन् माणसेही याच मातीतली. मग ‘जेथे योगेश्वर कृष्ण, जेथे धनुर्धर पार्थ तेथे जय अन् श्री यांचा निवास असणार’, या गीतावचनाचा पुन:प्रत्यय इतिहासाने अनुभवला.!

शिवछत्रपतींमुळे प्रसिद्धीस आलेल्या गनिमी काव्याचा थरारही याअगोदरच्या कालखंडात इतिहासाने अनुभवला होता. तसे पाहायला गेले तर गनिमी काव्याची ही कल्पना जुनीच. शिर्के अन् मोऱ्यांनी या पद्धतीची झलक चौदाव्या शतकात दाखवताना खिलजीचा सेनापती मलिक उत्तुजारला विशाळगडाच्या गर्द रानात त्याच्या अफाट सन्यानिशी उभाआडवा कापून काढला होता. शिवछत्रपतींचे तीर्थरूप शहाजीराजे, हे या विद्य्ोतले तज्ज्ञ. लाखालाखाच्या मुघल फौजांना त्यांनी मराठवाडय़ातल्या पिरडय़ापासून ते कोकणातील आसनगावच्या माहुलीपर्यंत पाठीवर झुलवत चोपून काढलेले. असे हे बाळकडू मिळालेले होतेच. मग याच्या जोडीला आली भविष्याचा वेध घेणारी जन्मजात वृत्ती अन् पोक्त कारभाऱ्यांच्या अनुभवसिद्ध मसलती. भूतकाळातील चुका यागुणे सुधारल्या गेल्या. स्वत:चे काही सिद्धांत यास जोडले गेले अन् एका तंत्रशुद्ध युद्धपद्धतीचा जन्म झाला. राजगड, तोरणा, सिंहगडांसारखे बळिवंत दुर्ग भराभरा पदरी आले अन् पुरंदराच्या हातघाईच्या लढाईत विजापूरचा मातब्बर सरदार फत्तेखान चढय़ा घोडय़ानिशी पाडाव होऊन, तोबा तोबा करीत विजापूरला परतला. दुर्गाच्या आश्रयी राहून शत्रूंस खडे चारण्याच्या संकल्पित युद्धपद्धतीस पहिले गोमटे फळ धरले होते!

राज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने, तत्कालीन परिस्थितीत दुर्गाना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. अन् राज्याचे संरक्षण अन् सर्वच प्रकारच्या अभिवृद्धीत, भविष्यात या दुर्गानी आपले कार्य चोखपणे बजावले. शिवछत्रपतींनी राज्यविस्तार दृष्टीसमोर ठेवून जी युद्धपद्धती अंगीकारली त्या युद्धपद्धतीमध्ये या दुर्गाना प्रधान महत्त्व होते. किंबहुना काहीशा वेगळ्या दृष्टीने याकडे पाहिले तर दुर्गाच्या अन् त्यांच्या दुर्गम भौगोलिक रचनेचे महत्त्व अचूक ओळखून त्यांनी त्यानुसार आपल्या युद्धपद्धतीची आखणी केली अन् त्यामध्ये ते अतिशय यशस्वी झाले.

सह्यद्रीच्या पर्वतरांगांच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून अन् त्याचा पूर्ण उपयोग करून राज्यविस्तार करण्याचे लक्ष्य दृष्टीसमोर ठेवताना शिवछत्रपतींनी स्वराज्यावर होणाऱ्या संभाव्य आक्रमणांचाही विचार केला होता ही गोष्ट अगदी स्पष्टपणे जाणवते. तत्कालीन युद्धसाधनांचा विचार करता, त्यांनी बांधलेले दुर्ग हे त्यांच्या राज्ययंत्रणेचे अन् राज्यसंरक्षणाचे एक अतिशय प्रभावी असे हत्यार ठरले. सह्यद्रीची दुर्गम दरीखोरी, अतिगर्द अरण्ये अन् या साऱ्यांच्या वर मस्तके उंच उभवून असलेले गिरिशिखरावरील ते बळकट दुर्ग यांचा अतिशय कुशल उपयोग शिवछत्रपतींनी आपल्या रणनीतीत केला. केवळ अगोदरच्या काळापासून अस्तित्वात असलेले दुर्गच नव्हेत तर त्यांनी जे नवीन दुर्ग रचले, त्यांमध्येसुद्धा स्थळे निवडताना त्यांनी कृत्रिम अभेद्यतेपेक्षा नसíगक अभेद्यतेवर भर दिला अन् मगच कृत्रिम लेणी लेववून ती अगोदरच दुर्घट असलेली स्थळे त्यांनी पार दुर्जेय करून टाकली. स्वये शिवछत्रपतींनी जातीने लक्ष घालून नव्याने रचलेले प्रतापगड व सिंधुदुर्ग हे दुर्ग आणि जुनी बांधकामे पाडून पूर्णपणे नव्याने रचलेले राजगड, अन् रायगड हे चारही दुर्ग म्हणजे त्या दुर्गपतीच्या असाधारण अशा प्रज्ञेचा केवळ चमत्कार होता!

जगाच्या पाठीवरील कोणताही दुर्ग हे निखळपणे संरक्षणात्मक बांधकाम असते. आपल्या देशातील सारेच दुर्ग ही प्राथमिकता समोर ठेवूनच रचले गेले आहेत. मध्ययुगात रचलेल्या दुर्गामध्ये बचावात्मक विशेषांवर भर देतानाच प्रतिकार करण्याच्या किंवा प्रसंगी आक्रमणाच्या धोरणांस अनुकूल ठरणारी रचनाही उभारण्यात आल्या. महाराष्ट्रातील सारेच दुर्ग निरपवादपणे याच पद्धतीने रचले गेले. मात्र हे करीत असतानाही तो दुर्ग आक्रमण करू शकण्याच्या संभाव्यताही पडताळून पाहिल्या गेल्या. त्याही दृष्टीने रचना झाल्या. दुर्गाचे काही भाग आक्रमण करू शकण्याच्या दृष्टीने युद्धसज्ज केले गेले. राजगडाच्या सुवेळा व संजीवनी या माच्या, रायगडावरील खूबलढा बुरूज, हिरकणी बुरूज  व मदारमोर्चा ही ठिकाणे ही या प्रकारच्या रचनेची उत्तम उदाहरणे आहेत. शत्रूचा हल्ला आल्यास बचावाची संधीही मिळावी, मात्र शक्य झाल्यास तटाबुरुजांच्या साहाय्याने अन् आश्रयाने आक्रमकांवर तिखट प्रतिहल्लाही करता यावा अशाच पद्धतीची ही सारी रचना केली गेली आहे. तटाच्या प्रत्येक वळणावर बांधला गेलेला बुरूज, हा त्या बुरूजाच्या डाव्या-उजव्या बगलांवर असणाऱ्या तटबंदीवर होणाऱ्या आक्रमणावर प्रतिहल्ला चढवण्याच्या दृष्टीनेच बांधला गेला आहे. तोफा, बंदुका, बाण, इत्यादी तत्कालीन शस्त्रास्त्रे व त्यांचे पल्ले विचारात घेऊनच त्यातील जंग्यांची रचना केली गेली आहे. ही पद्धत साऱ्याच मध्ययुगीन व शिवकालीन दुर्गाच्या स्थापत्यामध्ये आढळते. यामध्ये केवळ बचावाच्या हेतूपेक्षाही आक्रमणात्मक बचावाचा हेतू प्रामुख्याने जाणवतो. संभाव्य आक्रमणाच्या दृष्टीने कमकुवत जागा हेरून, त्या जागा तटाबुरुजांनी बंदिस्त करून केलेले बांधकाम, हे शिवछत्रपतींच्या आक्रमणात्मक बचावाची मनोवृत्ती अधिक उत्तम प्रकारे दाखवून देते.

कौटिल्याने म्हटल्याप्रमाणे दुर्ग हे राज्याचे एक अंग. राज्याच्या सप्तांगांपकी एक. त्यामुळे दुर्ग हे राज्यसाधनेचे एक प्रभावी साधन या दृष्टीनेच शिवछत्रपतींनी दुर्गाकडे पाहिले. अन् मग या राज्यसाधनेस म्हणजेच पर्यायाने दुर्गास आक्रमणाची तोशीस लागू नये वा लागलीच तर त्यांनी प्रतिआक्रमणास सिद्ध असायला हवे या दृष्टीनेच शिवछत्रपतींनी नवीन दुर्गाची बांधकामे केली वा जुने दुर्ग पाडून त्या जागी स्वतच्या असाधारण प्रज्ञेने त्यांची नवनिर्मिती केली.  राज्यसंरक्षण अन् राज्यसंवर्धन हा शिवछत्रपतींचा दुर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लक्षात घेतला, तर त्यासाठी त्यांनी सह्यद्रीच्या अतिदुर्गम भौगोलिक परिसराचा वा सागराच्या दरुलघ्य परिसराचाच अधिक अन् अचूक असा उपयोग करून घेतल्याचे आपणास आढळते. सह्यद्रीचे रौद्रभीषण कडे, उत्तुंग शिखरे, पाताळाचा आभास देणाऱ्या दऱ्या, ती घनगर्द अरण्ये, या साऱ्याच घटकांचा त्यांनी आपल्या युद्धशास्त्रामध्ये अतिशय चाणाक्षपणे अन् न भूतो न भविष्यति असा उपयोग करून घेतला. शत्रूचे आक्रमण होऊ शकेल हे गृहीत धरून त्यांनी आपल्या दुर्गाच्या परिसरातली भौगोलिक परिस्थिती जोपासली. स्वसंरक्षण वा राज्यसंरक्षणाच्या दृष्टीने जिथे भौगोलिक घटकांची कमतरता वाटली तिथे कृत्रिम साधनांचा वापर करून ती अवघड बनविली गेली.

सह्यद्रीचा दुर्गम डोंगराळ प्रदेश, तेथली गहन वने, या साऱ्याचाच उपयोग शिवछत्रपतींनी आपल्या राजकारणात अतिशय कुशलतेने करून घेतला. त्यांच्या कारकीर्दीतल्या सुरुवातीच्या साऱ्या लढाया ते सह्यद्रीच्या दुर्गम प्रदेशात दुर्गाना पाठीशी घेऊनच लढले अन् बहुतेक साऱ्याच लढायांमध्ये ते यशवंत ठरले. मोकळ्या मदानातही त्यांनी बऱ्याच लढाया जिंकल्या. मात्र त्या उत्तरकाळात. राजसत्ता थोडीशी स्थिरस्थावर झाल्यावर. त्यामुळे सुरुवातीच्या काहीशा अस्थिर व बेभरवशाच्या कालखंडात, आक्रमक दृष्टिकोनाचा विचार केल्यास नव्या राज्याच्या उभारणीसाठी त्यांनी केलेली प्रदेशाची – त्यातही सह्यद्रीच्या अतिदुर्गम भागाची निवड अचूक ठरली, अन् या प्रदेशातल्या उत्तुंग दुर्गानी अन् गहन अरण्यांनी त्यांच्या आक्रमणात्मक बचावाच्या युद्धपद्धतीस अभूतपूर्व अशी साथ दिली. भारतीय इतिहासात आजवर कुणाही राज्यकर्त्यांने न चोखाळलेली दुर्गकेंद्रित राज्यपद्धती म्हणूनच त्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत घेऊन गेली.

त्यांचा हा हेतू कितपत सफल झाला हे त्यानंतर घडलेल्या लखलखीत इतिहासाने दाखवून दिलेच आहे!

discover.horizon@gmail.com