|| अरुण मळेकर
अनेक साम्राज्य, राजसत्तेच्या काळातील त्यांची संस्कृती आणि धार्मिक अधिष्ठान असलेल्या ज्या अनेक प्रकारच्या वास्तू निर्माण झाल्या त्यात विविधतेबरोबर कलात्मकताही आहे. त्यात अभेद्य तटबंदीच्या अनेक गडकोटांचा हिस्सा फार मोठा आहे. हे गडकोट म्हणजे त्यावेळच्या संरक्षण व्यवस्थेचा कणाच आहे. पण या अधिसत्तेच्या नियंत्रणाखालील स्थानिक प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याकरता निर्माण झालेल्या ‘गढी’ या वास्तू प्रकाराची हवी तशी दखल घेतलेली दिसत नाही.
खरं तर गढी वास्तू म्हणजे सपाट भूमी आणि पहाडावरील स्थानिक प्रशासन व्यवस्था सांभाळणारे सत्ताकेंद्र. सत्तेच्या विकेंद्रीकरणाची ही प्राथमिक अवस्थाच होती. महाराष्ट्रातील मराठवाडा, खानदेश, इ. प्रदेशांत ज्या गढय़ा आपले अस्तित्व टिकवून आहेत तशा स्वरूपाच्या गढय़ा राजस्थानात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरातमधील सौराष्ट्र-कच्छ, इ. प्रांतांत आढळतात.
काही वर्षांपूर्वी ‘मिर्च मसाला’ हा जो चित्रपट प्रदíशत झाला होता त्यात गढी वास्तूमधील समाजजीवनाचे चित्रण होतच.
आपल्या अखत्यारितील परिक्षेत्राच्या संरक्षणासाठी निर्माण केलेली गडकोटाची प्रतीक असलेली वास्तू म्हणजे गढी. ‘वंशपरंपरेनी मर्यादित प्रशासकीय अधिकार प्राप्त झालेल्या काही परिवारांच्या ‘गढय़ा’ म्हणजे प्राचीन संरंजामी व्यवस्थेचे केंद्र होय. याच वास्तुकेंद्रातून मुलकी-महसूल जमा करण्याच्या व्यवस्थेसह संरक्षणाची जबाबदारी सांभाणाऱ्या मंडळींत पाटील, इनामदार जहागीरदार, देशमुख यांच्या नावानी गढी वास्तू ओळखली जाते. गढीद्वारे स्थानिक प्रशासन सांभाळणाऱ्या गढीवासीयांना मानाचे स्थान असायचे, तर काही सांस्कृतिक, धार्मिक कार्यात परंपरेने त्यांचा यथोचित गौरव – सन्मान केला जायचा. गढी म्हणजे सुरक्षेचे कवच असलेला, दैनंदिन गरजा भागवणारा ऐसपैस वाडाच होता. काही गढी प्रशासनानी मोलाची ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे.
आपल्या प्रदेशातील संरक्षणासह प्रशासन व्यवस्थेसाठी उभारलेली वास्तू म्हणजे किल्ले. इंग्रजीत कॅसल, फोर्ट, बर्ग, इ. नावे या स्वरूपाच्या वास्तूंना आहेत. तर मराठीमध्ये भुईकोट, गिरीदुर्ग, जंजीरा, बाले किल्ला वगैरे संज्ञांनी या वास्तंचेू प्रकार ओळखले जातात. परंतु ज्ञात वास्तुशास्त्राप्रमाणे भुईकोट पहाडावरील गिरीदुर्ग आणि जंजीरा (द्विपदुर्ग) हे प्रमुख प्रकार सर्वश्रुत आहेत.
गढी वास्तू प्रकाराला अनेक शतकांचा किल्ल्यासारखा इतिहास आहे. आपले सत्ताकेंद्र शत्रूपासून सुरक्षित राहण्यासाठी गढीचे बांधकाम करताना परिसरातील उपलब्ध दगड, माती, चुना या साहित्याचा उपयोग केल्याचे जाणवते. गढीची तटबंदी ही सुमारे चार-पाच फूट रुंदीची असायची. गढी वास्तूला बहुधा एकच प्रवेशद्वार तर काही गढी वास्तूंना गरजेनुसार अनेक प्रवेशद्वारे ठेवण्याचा उद्देश असायचा. या प्रवेशद्वारांची भव्यता हे गढीचे विशेष होते. पाहताक्षणीच एखाद्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची आठवण व्हावी.
गढीच्या आतील भागातील छोटय़ा-मोठय़ा इमारतींसाठी विटांबरोबर लाकूड-दगडांचा वापर करण्यावर भर होता. गढीच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच प्रथमत: लागते ती ‘देवडी.’ हे ठिकाण म्हणजे आजच्या काळातील ‘चेकपोस्ट’. येथूनच गढीमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवले जायचे. गढीत वास्तव्य असलेल्या प्रजेसाठी आपत्कालीन
व्यवस्था म्हणून प्रचंड मोठे धान्य कोठार असायचे. युद्ध, दुष्काळी परिस्थितीत याद्वारे रयतेला धान्यसाठा पुरवण्याची व्यवस्था होती. गढय़ातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी या धान्य कोठाराइतक्याच महत्त्वाच्या होत्या.
या दोन्ही वास्तूंद्वारे त्यावेळच्या अत्यावश्यक सुरक्षित वास्तू बांधकामाची सहज कल्पना येते.
काळाच्या ओघात आणि नैसर्गिक आपत्तींनी आता अनेक गढी वास्तूंची पडझड झाली आहे, तर काहींची नवीन निशाणीही राहिली नाही. गडकोटांप्रमाणे या गढय़ा म्हणजे इतिहासाचे साक्षीदार असून, त्यातून गत वैभवाचेही दर्शन घडते.
महाराष्ट्रातील सांस्कृतिक, धार्मिक शिल्पवैभवात अग्रेसर असलेल्या मराठवाडय़ात प्राचीन गढी प्रकार मोठय़ा प्रमाणात आढळतो. त्यातील काही गढय़ांचे क्षेत्र हे आजच्या एखाद्या नगराच्या आकारामानाइतके आढळते. यावरून गढी क्षेत्राची व्याप्ती जाणवते. या ‘गढी’ वास्तूंमध्ये ज्या कुटुंबाच्या हाती प्रशासन व्यवस्था होती यांच्या निवासस्थानी प्रशस्त विहिरीबरोबर मोठे देवघर, माजघर, मुदपाक खाना, व्हरांडा, तुळशी वृंदावन यांनी मोठी जागा व्यापलेली होती.
मराठवाडय़ातील काही विशाल गढय़ांच्या अखत्यारित सभोवतालच्या बऱ्याच गावांचे प्रशासन सांभाळले जायचे. दळणवळणाची प्रभावी साधनं उपलब्ध नसतानाही याच गढय़ांवरून अनेक गावांचे कायदा सुव्यवस्था सांभाळली जायची. आजमितीस या ऐतिहासिक गढी वास्तूंचे संवर्धन नसल्यानी त्यांची बरीच पडझड झाली आहे. मात्र पुणे जिल्ह्यतील ‘इंदुरी’ किल्लागढी, पेशेवकालीन सरदार बाबूजी बारामतीकरांची गढी तसेच सोलापूर जिल्ह्यतील धोत्री ही किल्लास्वरूप गढी पाहता येणे शक्य आहे. यांपैकी काही गढी आणि त्यांचा परिसर दर्शनातून गिर्यारोहण आणि वनपर्यटनाचा लाभ घेता येतो. भारताचा शेजारी देश नेपाळमध्येही प्राचीन, इतिहासकालीन गढी वास्तूप्रकार आहे.
गढीच्या आश्रयांनी काही धार्मिक – सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या अधिकार क्षेत्रातील समाज एकसंध ठेवण्यात गढीचे प्रशासक दूरदृष्टीचे होते. गढीमार्फत प्रशासन व्यवस्था अस्तित्वात होती. त्याच्या व्यवस्थापनासाठी जी पत्रव्यवहाराची कागदपत्रे उपलब्ध आहेत त्याद्वारे त्याकाळच्या इतिहाससह समाज व्यवस्थेवरही प्रकाश पडतोय. गढय़ांप्रमाणेच काही प्रशस्त वाडे आणि त्यांची निवास वास्तुरचनाही काही शतकांपूर्वीच्या समाजरचनेसह प्रशासन व्यवस्थेसंबंधांत खूप काही मुकेपणानी सांगणारे आहेत. या वाडय़ांना गढीची भव्यता नसेल. पण त्यांची सुरक्षित वास्तुरचना, त्यांचे खानदानी सौंदर्य, ऐतिहासिक मोल हेसुद्धा काही शतकांपूर्वीच्या कालखंडाचे जिते जागते पुरावे आहेत. गेल्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत पुणे, नाशिक, कोल्हापूर, मराठवाडा येथे वाडा वस्ती अस्तित्वात होती. काळाच्या ओघात काही कुटुंबांच्या नावानी ओळखल्या जाणाऱ्या वाडय़ांच्या जागी आता मनोरेसदृश सिमेंटच्या इमारती उभ्या राहाताहेत.
गढय़ा आणि वाडे यांची उभारणी मराठवाडा, विदर्भ, खानदेश प्रदेशात जास्त आढळते तर कोकण प्रांतात हिरवाईच्या वाडय़ांची संख्या मोठी आहे. आणि या वाडय़ांमध्ये उभारलेल्या वास्तूत स्थानिक उपलब्ध जांभा दगड आणि टिकाऊ लाकडांचा वापर करून पारंपरिक काष्ठ शिल्पाकृतीनी त्यांचे सौंदर्य खुलवले.
सिंधू नदीच्या खोऱ्यातील हडप्पामधील प्राचीन नगर रचनेचे स्वरूपही गढी वास्तू प्रकाराशी साधम्र्य दाखवणारे आहे.
महाराष्ट्रातील इतिहासाचे साक्षीदार, मापदंड ठरलेल्या किल्ल्यांचे संवर्धनासाठी प्रसारमाध्यमातून आवाज उठवला जातो. त्यामानानी ‘गढी’ वास्तूंच्या संवर्धनासाठी आम्ही फारसे जागरूक आहोत असे नव्हे. गढी वास्तू, पुरातन वाडे यांनाही इतिहास आहे. सांस्कृतिक मोल आहे. त्यांचेही जतन, संवर्धन व्हायलाच हवे. गडकोट, भुईकोट, जंजिरे ही जशी
आमची प्रेरणास्थाने आहेत तेच आदरयुक्त स्थान ‘गढी’ वास्तूंना आहे. ही ठिकाणे आपल्या इतिहासाची जाणीव करून देणारी आणि अस्मिताही आहे.
आपण जरी वर्तमानकाळात वावरत असलो तरी विद्यमान घडामोडींना इतिहासाचा संदर्भ असतो. इतिहासकालीन घटना, त्यातील स्थित्यंतरे, त्यांचे साक्षीदार वारसा वास्तू यांचा अभ्यास उज्ज्वल भवितव्यासाठी निश्चित उपयोगी आणि मार्गदर्शक ठरतो. ही राष्ट्रप्रेमाच्या जाणिवेची उणीव आपल्याकडे असल्यानी गढी-वाडा वस्तीस्थळं पर्यटनस्थळ दर्शनासाठी ओळखली जाताहेत, हे दुर्दैव आहे.
arun.malekar10@gmail.com