मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे यांच्यासह ११८ उमेदवारांच्या नावांची यादी काँग्रेसने बुधवारी रात्री जाहीर केली. राष्ट्रवादीने दावा केलेल्या नवापूर आणि मालेगाव मध्य मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जाहीर करून काँग्रेसने राष्ट्रवादीवर पहिल्याच यादीत कुरघोडी केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण (दक्षिण कराड), नारायण राणे (कुडाळ) यांच्यासह सर्वच मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांनी कणकवली मतदारसंघातून उमेदवारी मागितली असली तरी पहिल्या यादीत त्यांना स्थान मिळू शकलेले नाही. दोनच दिवसांपूर्वी शरद पवार यांनी जाहीर सभा घेऊन मालेगावच्या जागेवर दावा केला होता, पण काँग्रेसने तेथील उमेदवाराचे नाव जाहीर केले. नव्वदीच्या घरातील सा. रे. पाटील यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे.
मुंबईतील पक्षाच्या सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. वादग्रस्त कृपाशंकर सिंग यांनाही पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. नारायण पवार (ठाणे), प्रभात प्रकाश पाटील (ओवळा-माजिवडा), शितल म्हात्रे (दहिसर), मायकल फुटय़ाडो (वसई), गुड्डू खान (भिवंडी)आदींचा यादीत समावेश आहे. राष्ट्रवादीने गेल्या वेळी लढलेल्या मतदारसंघातील उमेदवारांची नावे मात्र जाहीर केलेली नाहीत.