पाच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी उत्साहात मतदान करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीसाठीही बुधवारी उत्साहाने आपला हक्क बजावला. कुठे उन्हाचा तडाखा, तर कुठे पावसाचा शिडकावा यांची तमा न बाळगता राज्यातील सरासरी ६४ टक्के मतदारांनी आगामी विधानसभेचे चित्र ईव्हीएम मशिनमध्ये बंद केले. नेहमीप्रमाणे ग्रामीण भागात मतदारांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. तेथे सकाळपासूनच मतदारांच्या रांगा केंद्राबाहेर लागल्या होत्या. विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने मतदारांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही मतदारांनी आपला अधिकार बजावला. मुंबई, ठाण्यासारख्या शहरी भागांत सकाळी निरुत्साहाचे वातावरण होते. मात्र, दिवस सरता सरता मुंबई-ठाण्याचा मतदानाचा टक्काही पन्नाशीपार पोहोचला. प्रसारमाध्यमे, सोशल नेटवर्किंग साइट्सवरून केली जाणारी आवाहने आणि निवडणूक आयोगाने केलेली मतदारजागृती मोहीम याचा चांगला परिणाम बुधवारी दिसून आला. राज्यभरातील चार हजार ११९ उमेदवारांचे भवितव्य मशिनमध्ये बंद करणाऱ्या मतदारराजाला आता प्रतीक्षा असेल ती रविवार, १९ ऑक्टोबरची!
विदर्भात मुसळधार पाऊस, विजा कोसळून तीन ठार
गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा गोळीबार, जीवितहानी नाही
‘व्हीव्हीपॅट’ यंत्रणेचा प्रायोगित तत्वावर वापर प्रभावी
मराठवाडय़ात ठिकठिकाणी पैसेवाटपाच्या तक्रारी
महाडमध्ये निवडणूक कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
ठाण्यात मेंदूत रक्तस्राव झाल्याने निवडणूक कर्मचाऱ्याचा मृत्यू
मुंबईत नाकाबंदीत २४ लाखांची रोकड जप्त

मुंबईतील गुजराती टक्का घसरला
भाजपची स्वबळावर सत्ता मिळवण्याची हाक आणि नरेंद्र मोदींची साथ या पाश्र्वभूमीवर मुंबईत गुजराती समाजातील मतदानाचा टक्का वाढण्याचा अंदाज असताना प्रत्यक्षात त्याच्या उलट चित्र बुधवारी पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीत मुंबईसह शहरी भागात ज्या ताकदीने ‘जय श्रीकृष्ण’ म्हणत गुजराती मतदार मतदानासाठी ‘उतरला’ होता ते चित्र यावेळी दिसले नाही. काही ठरावीक मतदारसंघ वगळता गुजराती बांधवांचा मतदानाबद्दलचा उत्साह लोकसभा निवडणुकीसारखा उरला नसल्याचे चित्र दिसत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंजावाती प्रचारानंतरही गुजराती मतदारांनी विधानसभा निवडणुकीत मतदानाकडे पाठ फिरवल्याचेच दिसून आले.