‘विकासा’ची चिकित्सा केलीच पाहिजे. परंतु चिकित्सा म्हणजे दोषैवदर्शिता(सिनिसिझम) नव्हे. सिनिसिझम पसरला तर अयोग्य—विकास रोखण्यासाठीसुद्धा ऊर्जा मिळणार नाही. म्हणूनच विकासाला होणाऱ्या विविध विरोधांचीदेखील चिकित्सा केली पाहिजे. भौतिक प्रगती होऊनही (किंवा झाल्यामुळेच!) नैतिक—आत्मिक अवनती होत आहे अशी भावना सहज पसरते. पूर्वी सगळे मंगलमय होते असे मानणाऱ्या धारणा, वैज्ञानिक संशोधनावरून कितपत खऱ्या ठरतात? मनुष्याने ज्या अवस्थेतून सुरुवात केली त्याहून तो प्रगतच नव्हे तर उन्नतही झाला नाही काय? द्वंद्वात्मक भौतिकवाद म्हणजे नेमके काय? त्यातील विरोध—विकास—वाद (डायलेक्टिक्स) हा विकास—विरोध—वादात का परिणत झाला? तसेच, आज इष्टतम असे काय करणे शक्य आहे? याचा घेतलेला हा शोधमनुष्यस्वभाव हा सद्गुणांनी आणि दुर्गुणांनी युक्त आहे. पण तो बदलत जाणारादेखील आहे. मनुष्यस्वभाव असे सामान्यत: म्हटले तरी व्यक्तीगणिक वेगळेपण असतेच. एका आयुष्यातही व्यक्ती बदलत जाते. स्वभावात जनुकीय घटक असतात यात शंका नाही. पण पूर्णपणे जनुकनियतता असते हे अजिबात खरे नाही. सुरुवातीला इतरांनी केलेल्या आणि नंतर स्वत:च स्वत:वर केलेल्या संस्कारांचा घटक खूपच लक्षणीय प्रमाणात असतो. कशा प्रकारच्या अनुभवातून व्यक्ती जाते आणि ते अनुभव ती कशा दृष्टीने घेते यातून तिचा स्वभाव बदलू शकत असतो. मानवी आचरण हे पूर्णत: जनुकनियत तर नाहीच पण मेंदूनियतसुद्धा नाही. जनुके, संस्कार, कायदे पाळण्याची सक्ती, काय प्रतिष्ठेचे ठरेल याचा दबाव, हे सर्व जमेस धरूनही, आपल्याला स्व-घडवणूक शक्य असते. ह्यूमन्स आर प्रोग्रॅम्ड टू बी सेल्फ-प्रोग्रॅमेबल!

त्याच वेळी हे स्व-घडवणुकीचे स्वातंत्र्य अमर्याद नसते हेही आवर्जून ध्यानात घ्यायला हवे. कारण न झेपणारे निर्धार टिकत नाहीत. मानसिक ऊर्जा जितकी खर्ची पडते त्या मानाने आपण ‘सुधारत’ नाही. नेहमी अगोदरच्या विकासावरच पुढचा विकास अवलंबून असत आलेला आहे. कृतींना असलेला वाव अगदीच कुंठित असण्यापासून ते तो अधिकाधिक विस्तारत जाणे हे प्रगतीचे स्वरूप आहे. नैतिक व आत्मिक उन्नतीचे कोणते प्रकार प्रगतीच्या कोणत्या टप्प्यावर शक्य होतात? हे लक्षात घेऊनच उन्नती साधावी लागते. उदाहरणार्थ आरपार दुर्भिक्ष असताना औदार्य तर सोडाच पण कर्तव्यनिष्ठाही उरत नाही आणि हिंसेवर उतरावे लागते, एवढे तरी मान्य केलेच पाहिजे.

upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
japan, a peaceful country, export weapons of mass destruction
विश्लेषण: शांत, युद्धविरोधी जपानकडून विध्वंसक शस्त्रे निर्यात पुन्हा का सुरू होतेय?

आदिमानव निर्माण होणे ही प्रक्रिया बराच काळ खर्ची पाडूनच झालेली आहे. म्हणूनच उत्क्रांती आणि (प्राक्)इतिहास यांच्यात एक समाईक प्रवास (ओव्हरलॅप) सुद्धा आहे. त्यात जनुकांचेसुद्धा काहीसे मानवीकरण झालेले आहे. टीमवर्क, फूड शेअरिंग आणि इतर टोळ्यांना भेटवस्तू ऑफर करून पाहणे, हे सद्गुण या संक्रमणात आपल्या जनुकांत पोहोचले आहेत. ही एक चांगली बातमी आहे. पण किती रानटीपणापासून सुरुवात झाली हे न पाहता, आपण फारसे सत्प्रवृत्त झालो नाही, असा निवाडा देणे हे स्वत:वरच अन्याय करणारे ठरेल.

शक्तिसंतुलने : स्थिर आणि संक्रमणशील

उत्क्रांतीच्या प्रक्रियेविषयी पुरेशी स्पष्टता आपल्या मनात असायला हवी. जास्तीतजास्त काळ टिकून राहणारी जनुकेच आज जनुकसंचात उपस्थित आहेत. जनुके म्हणजे रसायने निर्माण करणारे छापे. जिवात योग्य वेळी योग्य रसायन निर्माण झाले तरच तो जीव टिकतो आणि पुनरुत्पादन करू शकतो आणि ते करणारी जनुके टिकतात.  टिकून राहणाऱ्या जनुकांनी जिवाचे वर्तन नियत असते. यातूनच विविध जिवांमध्ये जीवनसंघर्ष चालू राहतो. भक्ष्य-भक्षक, भक्षक-स्पर्धकभक्षक, भक्ष्य-निसटणारे भक्ष्य, नर-नर, मादी-मादी, नर-मादी, पालक-अपत्ये, भावंडे-भावंडे, आतून हल्ला करणारे परोपजीवी- शरीराची रोगप्रतिकारशक्ती, अशा अनेक जोडय़ा एकमेकींत अटीतटीने झुंजत असतात.(सहकार्य असलेच तरी तेही ‘स्वार्थी जनुकां’नी प्रोग्रॅम्ड असते) किंबहुना या झुंजीतूनच त्यांच्यात परिष्कृतता(सोफेस्टिकेशन) वाढत जाते. मेंदू निर्माण होतात. जनुके आता थेटपणे निर्णायक ठरण्याऐवजी जणू मेंदूंशी करार करतात की कसेही करा पण आम्हाला जनुक म्हणून चालू ठेवा. नंतर मेंदू जणू जाणिवांशी करार करतात की मला जे प्रतिक्षिप्तपणे करता येत नाही ते तुम्ही भावना-विचार या रूपात पुढे न्या.

या सगळ्या प्रक्रियेत एक तत्त्व कायम असते. जे काय जनुकीय बदल (कायाकल्प वा म्युटेशन्स) व्हायचे ते यादृच्छिकपणे (रँडमली) होतात. त्यातले कोणते बदल टिकून राहतील हे संघर्षांतून ठरते. जर एखाद्या जीवजातीत असे वैशिष्टय़ निर्माण झाले की ज्यामुळे तिला तिच्या भोवतालात तग धरणे अशक्य होईल तर ती प्रजाती नष्ट पावते. ज्या बचावतात त्यांचे जीवन कितपत तापदायक असेल हे सांगता येणार नाही. विविध जिवांत शक्तिसंतुलने स्थिरावतात. ही काहींच्या फायद्याची असतील व काहींच्या तोटय़ाची. पण संतुलने (इक्विलिब्रियम्स) ही ‘संतुलने’ असतात म्हणून टिकतात. संतुलन म्हणजे सुसंवाद (हार्मनी) असेलच असे नाही. जसे म्युटेशन्सचे धक्के बसतात तशी ही संतुलने ढळतात, गतिशील होतात आणि नव्या स्थिर-संतुलनात स्थिरावतात. अचानक म्युटेशन होऊन (तगण्याबाबत) कोणाचा काय फायदा वा तोटा होईल हे पूर्णपणे यादृच्छिक असते. आणि टिकून राहणे हे नको इतके क्रूर संघर्षांत्मक असते. एक पाय जुगारावर आणि एक पाय क्रौर्यावर ठेवून उत्क्रांतीदेवी उभी आहे.

मनुष्य निर्माण होताना जरी उत्क्रांतीतून झाला असला तरी त्याने स्वत:च्या हिकमतीने उत्क्रांतीच्या अपरिहार्यता ओलांडल्या. अर्थात अत्यंत दुर्भिक्षाच्या, भरपूर संकटांच्या परिस्थितीत या ‘बुद्धिमान’ जिवाचा कारभारही उत्क्रांतीइतकाच बेभरवशाचा वा क्रूर असाच चालू राहिला. कित्येक काळ तो इतर टोळ्यांना खात वा मारून टाकत राहिला. सतत जीवनमरणाच्या अटीतटीच्या प्रसंगात अडकलेला राहिला. जेव्हा मनुष्याने, आज आपण जिला उत्पादकता म्हणतो ती, अगदी अल्प प्रमाणात साधून, स्वत:ला उसंत निर्माण केली तेव्हाच त्याला ‘काहीसे चांगले वागणे’ परवडू लागले!

पराभूत टोळीला गुलाम बनवणे हेही सुरुवातीला परवडत नव्हते. जेव्हा गुलामांना, तसेच त्यांना गुलाम राखण्यासाठी नेमलेल्या सैनिकांना पोसण्यातील खर्च वजा जाऊनही, गुलामांच्या कामातून, जेत्या टोळीसाठी लाभ उरू लागला तेव्हाच ते शक्य झाले. ही उत्पादकताच, गुलामगिरी शक्य करण्याच्या अवस्थेतून, गुलामगिरी सौम्य करत नेण्याच्या पातळीपर्यंत कशी पोहोचली हे आपण पुढे पाहणार आहोत.

माणसाचा पूर्वज असणाऱ्या एपमध्ये (एप म्हणजे बिनशेपटीचे माकड, जसे की चिंपांझी, गोरिला, ओरांगउटांग, बबून) असे काय बदल झाले की पुढे जाऊन त्याचा माणूस झाला?

एकतर मेंदू वाढला. अंगठा इतर बोटांच्या समोर आणता येऊ  लागला. हा फार मोठा हस्तकौशल्य-ब्रेकथ्रू होता. हत्यारे बनविण्याची ती सुरुवात होती. दुसरे असे की माणसाला बहुविध ध्वनिचिन्हके (फोनिम्स) बनवता येण्यासाठीचे स्वरयंत्र आणि जिभेचे कौशल्य लाभले. ही भाषेची सुरुवात होती. पण सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ असे की मनुष्य श्रमविभागणी आणि विनिमय करू शकला. निअँडरथाल हा आपल्याहून दणकट आणि हत्यारे बनविणारा असला, तरी श्रमविभागणी करणे आणि भाषा बनविणे याबाबत तो कमी पडल्याने, तगू शकला नाही.

श्रमविभागणीने श्रमांचा गुणाकार होतो. उदाहरणार्थ एकजण जागा राहिला तरी अख्खी टोळी जागी असल्यासारखेच ठरते. स्त्रियांनी एका जागी थांबून व्हेजिटेरियन अन्न जमवायचे आणि बालसंगोपन करायचे तर पुरुषांनी दूरवर शिकारीला जाऊन नॉनव्हेज अन्न मिळवायचे ही श्रमविभागणी अत्यंत यशस्वी ठरली. (‘आम्ही बुवा व्हेजच’ असे जवळपास लाख वर्षे परवडले नव्हते.) सस्तन प्राण्यांत माद्यांना डिसअडव्हांटेज असतोच. मनुष्यातले पुरुष-वर्चस्व मनुष्य बनण्याच्या आधीपासून होते. काही जण समजतात तसे खासगी मालमत्ता आल्यानंतर नव्हे. उलट औद्य्ोगिक क्रांतीनंतरच स्त्रियांना हळूहळू स्वातंत्र्य मिळण्याला सुरुवात झाली. त्या जसजशा बलदंड नराऐवजी सज्जन नराला निवडतील तसतशी ‘सभ्य’ता जनुकांतही शिरत जाईल.

टोळीत सहकार्याचे सद्गुण होतेही, पण त्याच वेळी परक्यांना शत्रू समजून मारून टाकणे असा वेडेपणाही चालू होता. व्यक्तीने स्वत:च्या टोळीला धरून राहणे ही निष्ठाही होती. पण टोळीप्रमुखांची दादागिरीही होती. आणि कोण प्रमुख हा प्रश्न युद्धानेच सोडविला जाई.

अगदी आत्ता आत्ता, तीन औद्य्ोगिक क्रांत्या झाल्यानंतर, काहीजणांना ‘निसर्ग म्हणजे अंगभूत सुसंवादच’ असा भ्रम होऊ  लागला आहे. मानवी मूल्ये निसर्गाकडून घ्यायची तर नित्शेच पत्करावा लागेल. ‘आपण दुबळ्यांना मरू दिले/ मारले असते तर आपण एव्हाना अतिमानवात उत्क्रांत झालो असतो. पण हा ख्रिस्त मध्ये तडमडला आणि त्याने करुणेची भानगड आणली.’ असे नित्शेचे ‘थोर’ विचार आहेत. निसर्गात फक्त शक्तिसंतुलन असते. चांगुलपणा हा ‘मूलत: कृत्रिम आणि म्हणूनच मानवीय’ आहे.

 लेखक कामगार संघटनांचे उत्पादकता सल्लागार, तसेच तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्यशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल : rajeevsane@gmail.com