|| दयानंद लिपारे

नेहमी मर्यादेत वाहणारी कृपासिंधू पंचगंगा आणि ‘संथ वाहते कृष्णामाई..’ या उक्तीने रमतगमत वाहणारी कृष्णा या दोन्ही नद्यांनी अक्राळविक्राळ रूप धारण केल्यानंतर कोल्हापूर आणि सांगली परिसर महापुराच्या कराल दाढेत लोटला गेला. ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधींच्या नजरेतून महापूर..

यंदा जूनमध्ये पावसाने ओढ दिली. जलसंपन्न कोल्हापुरातील धरणांनी तळ गाठला. मृग कोरडा गेल्यावर लगोलग पाऊस कोल्हापूरच्या परंपरेप्रमाणे धो-धो बरसत राहिला. पाऊस-पीकपाण्याच्या, वर्षांसहलींच्या आठवणी रुंजी घालत असतानाच हवामान-ऋतुचक्र पालटले. ऐन पावसाळ्यात उकाडय़ाने हैराण केले. जुलै मध्यास कोल्हापूर विभागात निम्म्याच रानामाळात पेरणी झालेली. आकडय़ांत सांगायचे, तर ८.१६ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ४.५ लाख हेक्टर क्षेत्र पेर झालेले. आषाढ कोरडा गेल्याने तगमग वाढली असताना नभी काळ्या ढगांनी गर्दी केली. कोणी त्याचीही खिल्ली उडवत राहिला. ‘उडवलं चार शिंतोडं आणि लागलं आपल्या वाटेला’ असा तर्क मांडत मंडळी कामात व्यग्र झाली. पण गडय़ाच्या मनात काय वेगळेच चालू होते.

श्रावण बरसायला लागला नि सारा नूर पालटला. भिरमिटल्यागत पाऊस पडू लागला. ‘धुवाधार’, ‘संततधार’, ‘मुसळधार’ या पुस्तकी व ‘रप्पारप्प’, ‘काटा किर्र्र’, ‘नाद्या बाद’ असा खास कोल्हापुरी ढंगाच्या शब्दांचा वर्षांव होऊ  लागला. पहिले दोन दिवस साहवणारा गारवा पुलकित करीत राहिला. पण हा आनंद अल्पकाळच टिकला. झिम्माड पावसाने साऱ्यांचेच अंदाज पंचगंगेतून वाहून नेले.

मग त्याची अभ्यासपूर्ण, शास्त्रीय वगैरे कारणे शोधली जाऊ  लागली. मध्य भारतापासून महाराष्ट्रापर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे निर्माण झालेली मान्सूनची लाट तीव्र झाल्याने रंगाचा बेरंग झाला. कृष्णा, वारणा, पंचगंगेकाठी अभूतपूर्व पाऊस कोसळत राहिला. २००६ मध्ये झालेला ४२५ मिमी पावसाचा विक्रम अवघ्या पाचच दिवसांत झालेल्या ५१९ मिमी पावसाने मोडला. पुढच्या संकटाची चाहूल देणारा हा इशारा होता. पाहता पाहता दुथडी भरून वाहू लागलेल्या पंचगंगेच्या महापुराचे संकट घोंघावू लागले. त्यात अवघा गावगाडा मुळासकट कोलमडून पडला. आठवडा व्हायच्या आतच विक्रमी महापूर नोंदला गेला. त्याची कृष्णछाया करवीरनगरीच्या गल्लीबोळासह जिल्ह्यतील २५० गावांवर उमटली.

महापुराची भयावहता किती व्यापक होती, याचा अगदी झपाटय़ाने अंदाज येत गेला. पंचगंगा धोक्याच्या पातळीवरून वाहू लागली. नदीकाठच्या महापुराने निम्मे शहर पाण्यात आकंठ बुडाले. शहराच्या मध्यभागातून वाहणारा जयंती नाला मर्यादा ओलांडून वाहू लागला. पाहता पाहता जिल्हाधिकारी कार्यालय, व्हीनस कॉर्नर, शाहूपुरी.. शहराचा केंद्रबिंदू असणारा हा भाग महापुराने गिळंकृत केला. महापूर पावसात अडकलेल्यांना मदत करूयात असे ठरवून लक्ष्मीपुरीतील तरुण मंडळाची पोरं रात्री झोपी गेली आणि पहाटे-पहाटे गल्लीत पाणी शिरल्याचा गलका उडाला. दिवस उजाडेपर्यंत सगळी गल्लीच पाण्याखाली बुडाली.

पाहावे तिकडे महापुराच्या जबडय़ात गावेच्या गावे सापडत गेली. राज्याचे ‘मँचेस्टर’ असलेल्या इचलकरंजीत यंत्रमाग कारखाने पूर्णत: पाण्यात बुडाल्याने सूत, कापड, यंत्रसामग्री सारेच पाण्यात गेले. कृष्णकाठच्या नृसिंहवाडीतील गावकऱ्यांना स्थलांतर करावे लागले. एक-दोन करता करता कोल्हापुरातील दोन लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर करावे लागले.

कोल्हापूर महापुराच्या विळख्यात इतक्या भयानक परिस्थितीत अडकून पडेल याचा अंदाज ना शासनाला होता, ना प्रशासनाला, ना आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला. जनसामान्यांना तर या दु:स्वप्नाचा अदमासही नव्हता. पावसाच्या दणक्यासमोर माणसेही कोलमडून पडली. कोणालाच कळेना, नेमके काय करावे, कोणाला मदत करावी. हाहाकार उडाल्याने चहूबाजूंनी संदेश धडकत होते. सारेच संभ्रमात. आभाळच फाटलेले, ठिगळ लावायचे तरी कोठे? सहा लाख लोकसंख्येच्या निम्म्या शहराला जलसमाधी मिळालेली. तिकडे पंचगंगा नदीपल्याड गावेच्या गावे महापुराच्या कराल दाढेत अडकलेली. तोकडी यंत्रणा निष्ठेने अहोरात्र राबत राहिली. मदतीचा हात देता देता त्यांचे हातही थकू लागले. तिकडे महापुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यात मदत मागूनही यंत्रणा फिरकत नसल्याने हवालदिल झालेल्या ग्रामस्थांच्या डोळ्यांतील अश्रूही थिजले होते.

नियोजनाचे गणित महापुरात वाहून गेले असल्याचे एकूण परिस्थिती दर्शवत राहिली. धरण क्षेत्रात तसेच विसर्ग क्षेत्रात अतोनात पाऊस पडत होता. उशिरा जाग आलेल्या प्रशासनाने सतर्कतेचे इशारे द्यायला सुरुवात केली खरी, पण तोवर उशीरच झाला होता.

संकटकाळात मानवी प्रवृत्तीचे नाना रंग दिसत होते. काही उमेद वाढवणारे, काही मनस्ताप देणारे. आडमुठी भूमिका घेणारे एकेक महावस्ताद दिसू लागले. २००५ च्या पूररेषेच्या अनुभवाच्या भ्रमात घर बुडू लागले तरी बहाद्दर घराबाहेर पडायचे नाव काढेनात. एका घराचा पहिला मजला पूर्ण पाण्याखाली गेलेला, घरात तान्ह्या बाळासह आई आणि आणखी काही लोक. गळ्याशी पाणी आले, तेव्हा बचाव अधिकाऱ्यांनी ‘घराबाहेर पडा, अन्यथा कायदेशीर कारवाई करू’ असा निर्वाणीचा इशारा दिला. तरी हे कुटुंब हट्टाने त्याच जलमय घरात राहिले.. कोणाला अशा परिस्थितीत चोरी करण्याची नामी संधी मिळाली.. परंतु अशाही स्थितीत तोकडय़ा सामग्रीनिशी विक्राळ महापुराचा सामना शासकीय यंत्रणा करीत राहिली.

गेल्या १४ वर्षांपासून नियमांना पंचगंगेत बुडवून नदीच्या दुतर्फा टोलेजंग इमारती, कित्येक वसाहती उभ्या राहिलेल्या. पाण्याचे नैसर्गिक प्रवाह रोखले गेले होते. धो धो पावसात मृत प्रवाहांना गती मिळून ते चौफेर आवेगाने उधळू लागले. निसर्गावर केलेले अतिक्रमण अंगाशी आले. अमर्याद पसरणाऱ्या मानवी हव्यासाला महापुराने उद्ध्वस्त केले.

महापुराच्या अभूतपूर्व संकटातही ‘अनंत आमुची ध्येयासक्ती..’चा प्रत्यय अवघ्या शहर आणि जिल्ह्यत दिसून आला. वेग पावसाचा होता; तद्वत त्याला लाजवणाऱ्या गतिमान मदतीचाही. हजारो शिलेदारांचे हात अखंडपणे राबत राहिले. आपल्या घरात पुराचे पाणी शिरले असतानाही, आपले बांधव संकटात आहेत म्हटल्यावर धावत येणारे कोल्हापूरकर. राजकारणी, डॉक्टर्स, पत्रकार, हॉटेल मालक, इतर व्यावसायिक, तरुणाई ते सामान्य माणूस.. प्रत्येक जण फक्त धावत होता. महापुराची तीव्रता वाढत गेली तसतशी मदतकार्याची गती वाढली. नगरसेवक, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते ‘अहर्निश सेवामहे’ या तत्त्वाने राबत राहिले. शेकडो मंडळे, तालीम संस्था आणि तरुणी-महिला जिवाची पर्वा न करता महापुरात झोकून देऊन कर्तव्य निभावत होते. हे सारे जण नौदल, सैन्यदल, वायुदल, स्थानिक आपत्ती निवारण दल, जिल्हा प्रशासन यांना मोलाची साथ करीत राहिले. स्वत: अध्र्याहून अधिक पाण्यात भिजत तासन्तास काम करणाऱ्या तरुणाईसाठी ‘कोल्हापूरकर बांधवांना मानाचा मुजरा’ असा उल्लेख करणारे शेकडो संदेश ऊर्मी वाढवत होते.

आठवडाभर मानवी संयमाची, आव्हाने पेलण्याच्या ताकदीची जीवघेणी परीक्षा घेऊन महापूर आता ओसरला आहे. पुन्हा संसार थाटण्याचे कडवे आव्हान सर्वासमोर आहे. लढाऊ  बाण्याचा कोल्हापूरकर हेही आव्हान पेलण्यासाठी चिखलाने माखलेल्या घरात परतला आहे. नेहमी मर्यादेत वाहणारी कृपासिंधू पंचगंगा व ‘संथ वाहते कृष्णामाई’ या उक्तीने रमतगमत वाहणारी कृष्णा या दोन्ही नद्यांनी अक्राळविक्राळ रूप धारण केल्याने निर्माण झालेल्या आव्हानाची बिकट वाट दीर्घकाळ चालायची आहे..

dayanand.lipare@expressindia.com