संगीतकार खय्याम यांच्या आयुष्यातील सोनेरी पान कोणते असेल तर ते ‘उमराव जान’. त्यातील ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए.’, ‘ये क्या जगह है दोस्तो.’ आणि ‘इन आँखों की मस्ती के परवाने हजारो हैं’ ही शहरयार यांनी लिहिलेली गाणी खय्याम यांनी संगीताच्या आगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहेत.

संगीतबद्ध केलेल्या प्रत्येक गाण्यावर आपली अमीट छाप पाडणारे संगीतकार खय्याम यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२७ रोजी पंजाबमध्ये झाला. मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी हे त्यांचे पूर्ण नाव. ते अगदी बालवयापासूनच संगीताकडे आकर्षित झाले. त्यांनी मोहम्मद चिश्ती, पं. हुस्नलाल भगतराम आणि त्यांचे बंधू पं. अमरनाथ यांच्याकडे संगीत शिक्षण घेतलं. हिंदी चित्रपटसृष्टीत ते आले ते गायक म्हणून. पं. हुस्नलाल भगतराम यांनी ‘रोमिओ ज्युलिएट’मध्ये त्यांना गाण्याची संधी दिली.

सुरुवातीला खय्याम यांनी संगीतकार पं. हुस्नलाल भगतराम यांच्याकडेच साहाय्यक म्हणून काम केले. देशाची फाळणी झाल्याने सर्वत्र अविश्वासाचे वातावरण होता. अशा वेळी त्यांच्या गुरुजींनी त्यांना काही दिवस ‘मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी’ हे नाव विसरून जाण्यास सांगितले आणि त्यांनी त्यांना शर्माजी असे संबोधन दिले. तेव्हापासून ‘शर्माजी वर्माजी’ या टोपणनावाने खय्याम यांनी त्यांच्या गुरुजींच्या साथीने अनेक चित्रपटांना संगीत दिलं. खय्याम यांना १९५३ मध्ये ‘फूटपाथ’ हा चित्रपट मिळाला. त्यावेळी लेखक झिया सरहदी यांनी त्यांना ‘खय्याम’ या नावाने कारकीर्दीला नव्याने सुरुवात करण्यास सुचविले. फूटपाथमधील गाण्यांमुळे ते सर्वपरिचित झाले. त्यातील दिलीपकुमारवर चित्रित केलेले ‘शाम ए गम की कसम.’ हे तलत महमूद यांनी गायलेले गीत लोकप्रिय झाले.

त्यानंतर खय्याम यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी संगीतबद्ध केलेली राज कपूर- माला सिन्हा अभिनित ‘फिर सुबह होगी’मधील पाचही गाणी रसिकांना भावली. चित्रपट लोकांना आवडला नाही, पण गाणी हिट झाली. त्यातील ‘वो सुबह कभी तो आएगी.’ हे गीत हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले. डाकूंच्या जीवनावर आधारित ‘चंबल की कसम’ सिनेमा पडला, पण मोहम्मद रफीसाहेबांनी गायलेलं ‘सिमटी हुई ये घडियाँ. फिर से न बिखर जाये.’ या गाण्याने सर्वाना भुरळ घातली.

‘बहारों मेरा जीवन भी संवारो.’ (‘आखरी खत’), ‘कभी कभी मेरे दिल में.’ (‘कभी कभी’), ‘‘ऐ दिलें नादाँ.’ (‘रझिया सुलतान’), ‘हजार राहें मूड के देखी.’ (‘थोडीसी बेवफाई’), ‘ये मुलाकात इक बहाना है.’ (‘खानदान’), ‘फिर छिडी बात बात फूलों की.’ (‘बाजार’) ही खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली गाणी रसिकांना अतिशय आवडली.

गायिका जगजीत कौर या खय्याम यांच्या जीवनसाथी. ‘शगून’मधील ‘तुम अपना रंजोगम, अपनी परेशानी मुझे दे दो..हे खय्याम यांनी संगीतबद्ध केलेले गीत जगजीत कौर यांनी आपल्या स्वरसाजाने अजरामर करून ठेवले आहे.

खय्याम यांनी ७१ चित्रपट आणि नऊ दूरदर्शन मालिकांना संगीत दिलं. त्यांनी संगीतसाज चढवलेल्या गाण्यांची संख्या ६४२ आहे. त्यांनी बेगम अख्तर, रफी, मुकेश, तलत, आशा, महेन्द्र कपूर, सुधा मल्होत्रा, सुलक्षणा पंडित, भूपिंदर सिंग आणि हेमलता यांच्याकडून गाऊ न घेतली. खय्याम यांना १९७७ मध्ये ‘कभी कभी’ आणि १९८२ मध्ये ‘उमराव जान’मधील संगीतासाठी फिल्मफेअर पुरस्काराने, २००७ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने आणि २०११ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच २०१० मध्ये फिल्मफेअरच्या जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. ‘उमराव जान’च्या संगीताने खय्याम यांना उत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळवून दिला होता.

खय्याम तत्वनिष्ठ होते. त्यांनी जे संगीत दिले ते अस्सल त्यांच्या प्रतिभेतून उतरलेले आहे. ‘कुणाच्या तरी चालीवरून मी माझी गाणी बनवीत नाही,’ असे त्यांनी एका निर्मात्याला बजावले होते.