अशोक तुपे

खरीप चांगला साधलेला असतानाच राज्यातील काही भागांत यंदा अतिवृष्टीने थैमान घातले. या संकटाचा सामना कसा करता येईल. पिकांना कसे वाचवता येईल, शेतीत काय बदल करावे लागतील आणि सरकारी पातळीवरील अपेक्षित बदलांबाबत तज्ज्ञांशी बोलून घेतलेला हा धांडोळा.

राज्यात यंदा वेळेवर पाऊस पडायला सुरुवात झाली. त्यामुळे विक्रमी पेरणी झाली. खरीप पिकाच्या पेरणीचा उच्चांक झाला. पाऊस सारखा पडत राहिला. पिके जोमात आली पण पाऊस थांबायला तयार नव्हता.ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये काही भागात पडलेल्या पावसाने नुकसान झाले. त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले होते. ते काम अपूर्ण असताना आता पुन्हा पावसाने फटका दिला. कमी दाबाच्या पट्टय़ामुळे नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, सोलापूर, पुणे, सातारा तसेच सातारा ,सांगली, कोल्हापूर व नगरच्या काही भागांत पिकांचे नुकसान झाले. पिके काढणीच्या अवस्थेत असताना शेतकऱ्यांना काही उपाययोजना करणे शक्य झाले नाही. करोनानंतर शेतकरी सावरत असताना त्यांच्यावर दुसरी आपत्ती आली. या आपत्तीनंतर अनेक प्रश्न शेती क्षेत्रात निर्माण झाले आहेत.

मराठवाडय़ातील लातूर, बीड, नांदेड तसेच सोलापूर या भागात सोयाबीनचे क्षेत्र वाढलेले आहे. या भागात खरिपात मुख्यत्वे सोयाबीन, कापूस, तूर, मूग व मका ही पिके केली जातात. सोयाबीन पिकाची काढणी करून त्याच्या गंजी लावल्या जातात. मराठवाडय़ात पिकांची कापणी झाली की मग रब्बीच्या तयारीला शेतकरी लागतात. शेतात हे सोयाबीनचे ढीग किंवा गंजी दिसतात. नंतर आरामशीर मळणी मशिनमधून काढणी केली जाते. त्यामुळे गेल्या आठवडय़ात झालेल्या पावसाने सोयाबीनचे शेतात लावलेले ढीग वाहून गेले. तर शेतात तळे साचलेले दिसले. सोयाबीनची पेरणी जेथे लवकर झाली. तेथे काढणी झाली पण उशिरा पेरणी झालेल्या भागात सोयाबीनची काढणी बाकी होती. कापसाच्या वेचणीला सुरुवात झाली. पण शिवारात फुटलेल्या कापसाच्या वाती झाल्या. तुरीचे खूप मोठे नुकसान झाले. मका, मूग, उडीद, कपाशी, सोयाबीन, ऊस, द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, मोसंबी, भाजीपाला आदी सर्वच पिकांचे नुकसान झाले.

अतिवृष्टीचा इशारा दोन ते तीन दिवस आधी हवामान खात्याने दिला होता. या अल्प कालावधीत काही उपाययोजना करणे अशक्य होते. हवामानशास्त्र विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग यांनी एकत्र येऊ न हवामानावर आधारित सल्ला समिती स्थापन केली आहे. ही समिती सल्ला देण्याचे काम करते. दर मंगळवारी व शुक्रवारी हा सल्ला दिला जातो. पण अतिवृष्टी एवढय़ा प्रमाणात होणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आला नव्हता. ही समिती प्रत्येक दिवस किती पाऊस पडेल याचा अंदाज व्यक्त करते. जिल्हानिहाय हा अंदाज असतो पण प्रत्यक्षात या अंदाजापेक्षा कितीतरी जास्त पाऊस पडला. हा अंदाज किमान आठ ते दहा दिवस आधी मिळाला असता तर शेतकरी काही सावधगिरी बाळगू शकले असते. एक व दोन दिवस आधी व्यक्त केलेला अंदाज शेतीसाठी फारसा उपयोगी ठरत नाही. त्यामुळे या धोरणाचा विचार करणे गरजेचे आहे. हे झाले हवामान खात्याच्या अंदाजाचे. पण अतिवृष्टीमुळे संकट उद्भवले तर उपाययोजना काय करायची याचा सल्ला देणारी यंत्रणा ही कुचकामी असल्याचे निष्पन्न झाले.

परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाने तातडीने शेतकऱ्यांना उपाययोजना सुचविल्या. शेतातून चर काढून पाणी काढून द्या. सोयाबीन उशिरा पेरला असेल व शिवारात तो उभा असेल तर बुरशी नाशकाची फवारणी करा आदी सूचना त्यांनी केल्या होत्या. पण महात्मा फुले कृषी विद्यापीठ व बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाला तातडीने काय करता येईल हे अद्यापही ठरविता आलेले नाही. एकूणच आपत्तीत कृषी विद्यापीठाच्या मर्यादा यानिमित्ताने पुढे आल्या. द्राक्ष, डाळिंब, आंबा, सीताफळ, केळी यांना कसे वाचविता येईल, याचे मार्गदर्शन त्यांना करता आले नाही. राजकीय नेते दौरे करत आहेत, पाहणी सुरू आहे, कृषी विभाग पंचनामा करत आहे. पण पशुसंवर्धन विभाग, पशुवैद्यकीय विद्यापीठ तसेच कृषी विद्यापीठाची पथके या भागात अद्याप गेलेली नाहीत. आपत्कालीन उपाययोजना करणारी, सुचविणारी, मार्गदर्शन करणारी यंत्रणा या संस्थांकडे नाही. सरकारी यंत्रणा पंचनामे करताना गतिमान होते तसे अन्य शेती क्षेत्रातील संस्था कमी पडताना दिसत आहेत. त्याकरिता आपत्कालीन उपाययोजना करणारा एक विभागच कृषी संशोधन संस्थांमध्ये तयार करणे गरजेचे आहे.

ऊस, डाळिंब व द्राक्ष ही पिके वाचविण्यासाठी शेतीतून पाणी काढून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण आता शिवारात ओढे, चर राहिलेले नाहीत. जेसीबीसारखी यंत्रे आल्यावर ते सपाट करून तेथे शेती सुरू करण्यात आली. आता अतिवृष्टीमुळे शेतात तळे तयार झाले, ते पाणी बाहेर कसे काढायचे असा प्रश्न आहे. सरकारचा जलनिस्सारण विभाग आहे. त्याचे काम केवळ कागदावर आहे. जे नाले आहेत ते बुजविणाऱ्यांना केवळ नोटीस दिली जाते. आता हे ओढे, नाले हे कागदावर राहिले आहेत. शेतातील विहिरी व कूपनलिका वाहत आहेत. त्यांचे पाणी कोठे काढून द्यायचे असा प्रश्न काही भागात आहे. सोलापूर भागात उसाचे पीक पाण्यात आहे. तेथे तोडणी कशी करणार हा प्रश्न आहे. त्यामुळे उसाचा हंगाम लांबणीवर पडेल.

आपत्तीच्या काळात पीक विमा फायदेशीर ठरतो, राज्यात ७० टक्के शेतकरी पीक विमा उतरवितात. मराठवाडय़ात पीक विमा बहुतेक शेतकरी उतरवितात. बीड जिल्ह्यला पीक विम्याचा लाभ यापूर्वी मोठय़ा प्रमाणात झाला. पण पीक विम्याची काही मानके आहेत. ती विमा कंपन्या, शेतकरी प्रतिनिधी, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आदी एकत्र बसून मानके निश्चित करतात. डाळिंब, द्राक्ष या पिकाला मोठा खर्च येतो, त्यामुळे शेतकरी त्याचा विमा उतरवितात. महसूल मंडळातील उंबरठा उत्पन्न विचारात घेऊन विमा भरपाई दिली जाते. पीक कापणीत उत्पन्न काढले जाते. त्यावर भरपाई दिली जाते. त्यात राजकीय नेते आणेवारी कमी लागावी म्हणून तसेच दुष्काळ जाहीर करावा म्हणून पुढाकार घेतात. त्यामुळे पिकाची आपत्तीत भरपाई मिळायला अडचण येते. चार ते पाच वर्षांचे सरासरी उत्पन्न विचारात घेऊन भरपाई मिळते. काही विमा कंपन्या ही भरपाई देताना नेहमी अडचणी उभ्या करतात, असे या क्षेत्रातील अभ्यासक प्रकाश पाटील यांचे म्हणणे आहे. विमा मिळाला नाही तर सरकारने मदत करण्याची गरज आहे.

कोकणच्या बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे माजी  कुलगुरू डॉ. शंकरराव मगर म्हणाले, की असा पाऊस आपण कधी पाहिला नाही. १९५६ सालानंतर असा पाऊस कोसळला. त्याने होत्याचे नव्हते केले. दुष्काळी म्हणून ओळखला जाणाऱ्या अगदी सांगोला, जात, खटाव, बीडला धोधो पाऊस कोसळला. हवामानशास्त्र विभागाने आठ दिवस आधी अंदाज वर्तविला असता तर काही उपाययोजना करता आल्या असत्या.  सर्वच शेतकरी पिकाचा विमा उतरवत नाहीत. मूग, उडीद, ज्वारी आदी पिके घेणारे शेतकरी हे लहान असतात. त्यांनी विमा उतरविलेला नसतो. भाजीपाला पिकाचा विमा उतरविलेला नसतो. आता या आपत्तीत ओला दुष्काळ जाहीर करून मदत केली पाहिजे. तरच शेतकरी सावरू  शकेल. पंचनामे लवकर झाले पाहिजे, वरून आदेश आले नाही म्हणून पंचनामे सुरू झाले नाही, असे होता कामा नये, असे ते म्हणाले.

कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक दिलीप झेंडे म्हणाले, पुरंदर , बार्शी भागात सीताफळ, आटपाडी, मोहळ, सोलापूर भागात डाळिंब, द्राक्ष, तसेच भाजीपाला व खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. फयान वादळानंतर आता मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. भाजीपाला पिकाचे सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, नगर, कोल्हापूर भागांत मोठे नुकसान झाले. त्याने भाजीपाल्याच्या किमती वाढतील, असे सांगितले.

मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी सोयाबीन काढणीची राहिली असेल त्यावर बुरशी येईल. त्याकरिता पिकावर बुरशीनाशकांची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तूर पिकातून साचलेले पाणी काढून द्यावे, मूग, उडीद, ज्वारी ही पिके काळी पडली आहेत. फळबागांचे नुकसान झाले आहे. कांदा पीक आता वाया जाणार आहे. रब्बी हंगाम लांबणीवर पडू नये म्हणून आताच उपाययोजना करावी लागेल. काही भागांत एक हंगाम गेला आता किमान रब्बी हंगामात चांगले उत्पन्न घेण्याची संधी आहे. हंगाम थोडा लांबणीवर पडेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. त्याचा फटका हा फळबागांना दीर्घकालीन बसेल. सारीच पिके बाधित झाली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे. त्यांना रोगराई येईल. अशा अनेक संकटाचा मुकाबला शेतकऱ्यांना करावा लागेल. त्यामुळे आता ओला दुष्काळ जाहीर करूनच शेतकऱ्यांना आधार द्यावा लागेल.

ashok.tupe@expressindia.com