राधिका कुंटे

‘ती’ भूतकाळाचा कानोसा घेते, वर्तमानात शालेय विद्यार्थ्यांसाठी ज्ञानभाषा इंग्रजीचा उपक्रम राबवते. भूतकाळ आणि वर्तमानकाळाच्या पायावर तर भविष्याचा डोलारा उभा राहतो. जाणून घेऊ या तिन्ही काळांत वावरणाऱ्या प्रज्ञा राणेविषयी..

समजा, तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाला जात आहात. वाटेत एखादी पुरातन वास्तू दिसते. ती तुम्हाला खुणावते. पण बहुसंख्य लोक त्या वास्तूच्या खुणावण्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातात. कारण त्यांना काम महत्त्वाचं वाटतं. पण प्रज्ञा राणे टॅक्सी थांबवते. त्या वास्तूपाशी जाते. तिची वास्तपुस्त करते. स्थानिकांकडून त्या वास्तूची माहिती घेते आणि पुढच्या क्षणी कामाचं महत्त्व ओळखून त्या वास्तूचा निरोप घेते; ती पुन्हा कधीतरी निवांत येईन असं मनाशी ठरवून. अनेकांच्या लेखी हे वागणं वेडेपणाचं ठरू शकतं, तरीही तो ती करतेच. हाच वेगळेपणाचा धागा प्रज्ञाच्या संशोधनातही दिसतो.

तिने सेंट झेव्हिअर्स महाविद्यालयातून ‘एन्शंट इंडियन हिस्ट्री, कल्चर अ‍ॅण्ड आर्कियॉलॉजी’ या विषयात पदव्युत्तर (मास्टर्स) शिक्षण घेतलं. या दोन वर्षांत विद्यार्थ्यांना संशोधन करायला वाव मिळतो. त्या अंतर्गत तिने दोन पेपर्स लिहिले. त्यापैकी ‘बॉम्बे टॉकीज ऑफ मालाड : द हिस्ट्री ऑफ द स्टुडिओ. इट्स फॉर्मेटिव्ह इअर्स अ‍ॅण्ड इट्स डिक्लाइन’ हा पेपर ‘द बॉम्बे एक्सप्लोरर’ या बॉम्बे लोकल हिस्ट्री सोसायटीच्या अंकात प्रसिद्ध झाला होता. या अभ्यासात स्टुडिओच्या इतिहासाच्या आढाव्यासह त्याची सद्य:स्थिती काय आहे, तेही सांगितलं आहे. डॉ. जोआन डायस यांनी या विषयाला मंजुरी देऊन त्याचा ड्राफ्ट तयार करण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन केलं होतं, असं प्रज्ञा सांगते. प्रज्ञा मालाडला राहणारी असल्याने ‘बॉम्बे टॉकीज स्टुडिओ’ची जुजबी माहिती तिला होती. या चित्रपटांसाठी ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या स्टुडिओचा अभ्यास करायचा असं तिनं ठरवलं. प्रज्ञा सांगते की, ‘आता त्या वास्तूचे फार थोडे अवशेष शिल्लक आहेत. हिमांशु राय आणि देविकाराणी यांनी सुरू केलेल्या या स्टुडिओमध्ये अनेक दिग्गज कलाकारांच्या कारकीर्दीचा श्रीगणेशा झालेला दिसतो. ही सगळी माहिती लोकांपुढे यायला हवी असं मला वाटलं’. या संशोधनासाठी तिला ज्येष्ठ कलाकार अशोककुमार यांची रेडिओवरची एक मुलाखत संदर्भ म्हणून मिळाली. ‘बॉम्बे टॉकीज स्टुडिओ’मध्येही ती गेली. तिथे अनेक वर्ष राहणाऱ्या रहिवासी भाडेकरू हेमंत गोगरी यांच्याशी आणि स्टुडिओच्या सध्याच्या मालकांच्या वकिलांशी तिचं बोलणं झालं. शिवाय महाविद्यायलाच्या ग्रंथालयातल्या पुस्तकांतून काही संदर्भ मिळाले. पुढे साधारण तीन महिन्यांत तिचं हे संशोधन पूर्ण झालं.

प्रज्ञाचा दुसरा विषय होता ‘हिस्ट्री ऑफ हॅण्डपेण्टेड बॉलीवूड पोस्टर्स’. हा विषय फक्त तिच्या डोक्यात होता. हातात काहीच धागादोरा नव्हता. फक्त इतकंच माहिती होतं की अशी एक कला होती आणि ती अस्तंगत झाली. ही कला अवगत असणाऱ्या कलाकारांपैकी कुणी हयात असण्याची शक्यता धूसर होती. प्रज्ञा सांगते की, ‘बरीच धडपड केल्यावर दादरच्या समर्थ आर्ट्सच्या गुरुजी बंधूंचा संपर्क मिळाला. त्यांच्या मुलाखतीत त्यांनी या कलेविषयी फारच चांगली माहिती सांगितली. उदाहरणार्थ- ‘चित्रीकरण होताना पोस्टर्स चितारणाऱ्या कलाकांरांनाही स्टुडिओत बोलावलं जायचं. त्या त्या पात्रांचा आणि कलावंतांचा विचार रंगसंगती करताना केला जायचा. त्या काळात या कलाकारांना खूपच मेहनत आणि कष्ट करावे लागले’.  त्याशिवाय ‘इंडियन हिप्पी’ या वेबसाइटशी मी संपर्क साधला होता, असं प्रज्ञा सांगते. या वेबसाइटच्या माध्यमातून ही मंडळी या पोस्टर्सचे जतन, संवर्धन आणि विक्री करतात. त्यांच्याकडूनही काही संदर्भ समजल्याचे तिने सांगितले. या सगळ्या अभ्यास आणि संशोधनासाठी तिला जवळपास वर्ष लागलं.

तिच्या संशोधनाचा आणखी एक विषय होता तो म्हणजे, ‘कृष्णा इन डिफरन्ट इंडियन आर्ट फॉम्र्स’. हे संशोधन छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातून ‘म्युझिऑलॉजी आणि कॉन्झव्‍‌र्हेशन’चा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना तिने केलं होतं. मास्टर्स करतानाच हा अभ्यासक्रम ती करत होती. संग्रहालयाच्या ज्ञानसमृद्ध ग्रंथालयातील पुस्तकांच्या संदर्भामुळे हे संशोधन पूर्ण करता आलं, असं ती म्हणते. या संशोधनाविषयी सविस्तर बोलताना प्रज्ञा सांगते की, ‘कृष्ण हा विविध कलामाध्यमांमध्ये दिसतो. मुघल, राजपूत, मधुबनी, पहाडी, कलमकारी आदी चित्रप्रकारांमधून दिसणाऱ्या कृष्णापासून ते रोजच्या वापरातल्या वस्तू मग त्या पर्स असो, साडय़ा वा ओढण्या असोत. त्यामागची कारणं काय, त्यात वेळोवेळी झालेले बदल आणि रंगसंगतीतला विचार, कृष्णाच्या लहानपणापासून ते गीता सांगणाऱ्या कृष्णाच्या जीवनातले विविध टप्पे, भारतीय आणि अन्य चित्रकारांच्या कृष्णाबद्दलच्या दृष्टिकोनाचा अभ्यास या निमित्ताने के ला’. या संशोधनासाठीही तिला साधारण २ महिन्यांचा कालावधी लागला.

इतिहास – संशोधन हा तिच्या आवडीचा विषय असला आणि त्यात तिने मास्टरी मिळवली असली तरी सामाजिक कार्याचीही तिला आवड होती. त्यात काम करण्याची संधी तिला मिळाली. अर्थात वाचन, फिरस्ती या माध्यमातून ती इतिहासाशी दोस्ती टिकवून आहे. गेले वर्षभर ती ‘पहले अक्षर फाउंडेशन’ या संस्थेत शिक्षण क्षेत्राशी संबंधित काम करते. शालेय शिक्षकांना भेटून संस्थेच्या फंक्शनल इंग्लिश डेव्हलपमेंट या त्यांच्या उपक्रमाविषयी माहिती देते. कन्टेन्ट रायटिंगसाठी आजवरच्या अभ्यासाचा उपयोग होतोच, असे ती आवर्जून सांगते.

संशोधनाच्या क्षेत्रात यायचा विचार करत असाल तर आपल्या विचार आणि दृष्टिकोनाखेरीज जगात अनेकानेक विचारधारा आणि दृष्टिकोन असतात, हे लक्षात घ्यायला हवं. त्या असण्याची शक्यता स्वीकारून त्यांचाही विचार करणं आणि प्रसंगी आपल्या विचार आणि दृष्टिकोनात आवश्यक तो बदल करणं योग्य ठरतं. संशोधन-अभ्यासासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा, असंही ती आग्रहाने सांगते. संशोधन क्षेत्राचा करिअरच्या दृष्टीने जरूर विचार करा. त्यामुळे अधिकाधिक आपण ज्ञानसमृद्ध होतो, असा सल्ला प्रज्ञा देते. काळाचे विविधरंगी धागेदोरे अधिकाधिक संशोधनाच्या माध्यमातून अभ्यास करत विचारांच्या धाग्यांत गुंफण्यासाठी प्रज्ञाला शुभेच्छा.

असं म्हणतात, शोधलं की सापडतंच. मग त्या शोधाचा, संशोधनाचा विषय हा भाषा, विज्ञान, कला, पर्यावरण, इतिहास आणि अन्य कोणत्याही क्षेत्रातला असू शकतो. तरुण पिढीतील अनेक जण सध्या संशोधन क्षेत्रात रमले आहेत. काही अभ्यास म्हणून, तर काही पूर्णपणे संशोधक म्हणूनच कार्यरत आहेत. हे तरुण संशोधक, त्यांच्या अभ्यासाचा विषय आणि त्या संशोधनातले टप्पे या सदरातून उलगडतील.

viva@expressindia.com