राधिका कुंटे

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीसाठी तयार करायचं तर असलेल्या चौकटीतच काम करावं लागतं. त्यांना वाचायला शिकवण्यासाठीच्या केलेल्या प्रयोगाविषयी सांगतो आहे ‘क्वेस्ट’चा प्रांजल कोरान्ने.

‘आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेनुसार वाचन करता येत नाही’, अशी ‘पाहणी’ झाली असल्याच्या आशयाची बातमी अधूनमधून झळकते. त्यावर एक उपाय म्हणून पालघर जिल्ह्यातल्या दोन आश्रमशाळांमध्ये  ‘क्वेस्ट’ या संस्थेतर्फे ‘अनुपद’ हा उपक्रम पाचवी, सहावी, सातवी आणि आठवीच्या वर्गासाठी घेण्यात येतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेप्रमाणे ज्या गोष्टी येणं गरजेचं आहे; त्या कशा शिकवायच्या, त्यात गती कशी आणायची, याविषयीचा ‘अनुपद’ कार्यक्रम बराच यशस्वी ठरला आहे. त्याखेरीज ‘पालवी’, ‘गोष्टरंग’, ‘शिक्षक’, ‘शिक्षण समृद्धी केंद्र’ हे उपक्रम आहेतच. गेली १२ वर्ष शैक्षणिक पातळीवर विविध स्तरांवर नीलेश निमकर यांच्या  ‘क्वेस्ट’चं ‘क्वॉलिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट’ (QUEST) काम सुरू आहे. त्यापैकी पालघरमधल्या आश्रमशाळेत गेले वर्षभर सुरू असलेल्या ‘विद्यार्थ्यांचे विवरणात्मक उताऱ्यांचे आकलन’ या संशोधनपर उपक्रमात संस्थेत अ‍ॅकॅडमिक कन्सल्टन्ट असणारा प्रांजल कोरान्ने सहभागी झाला.

‘अनुपद’मध्ये वेळोवेळी अनेक गोष्टींची भर पडते; बदल होतात. आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना योग्य पातळीवर आणायचं काम कोण आणि कसं करणार हा प्रश्न होता. विद्यार्थी त्या पातळीवर येऊन थांबून चालण्यासारखं नव्हतं. कारण पुढच्या शिक्षणात वाचनामुळे खूप फरक पडतो. उदाहरणार्थ – एखादा उतारा वाचून त्यातील माहितीचं आकलन होऊन त्यांना माहितीचा पुरवठा होणं खूप गरजेचं असतं. ते कसं शिकवता येईल यावर हे संशोधन होतं. प्रांजल सांगतो की, निमकरसरांची ही मूळ कल्पना. या कल्पनेला त्यांच्यासह मी, रोशना काठोले, समीर म्हसकर यांनी आकार दिला. पाच प्रकारच्या शब्दपातळीनुसार मराठीत चांगले उतारे लिहून काढले. हे मॉडेल (नमुना) आम्ही तयार केलं. बाहेर तयार नमुना मिळाला असता, तरी तो इंग्रजीत असता आणि त्याचं भाषांतर करावं लागलं असतं. ते टाळलं; कारण या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या आकलनशक्तीनुसार योग्य आणि चांगले असे उतारे लिहावे लागतात. वर्षभरात असे २० उतारे लिहिले गेले. त्यावर प्रश्न काढले. ते कसे शिकवायचे याची पद्धत ठरवली. त्या पद्धतीने शिकवून त्यांचं आकलन वाढतं आहे का, हे पडताळून पाहिलं. किती प्रश्न सोडवले ते पाहिलं.

एकानुसार माहिती उताऱ्यांमध्ये दिलेली आहे ती शोधून उत्तर लिहायचं. दुसरा होता की, उताऱ्यात थेट माहिती नाही, पण २ ते ३ मुद्दय़ांचा एकत्र विचार केल्यावर माहिती कळते. तिसरा होता की त्यात एखादा अवघड शब्द असतो; पण बाकीच्या संदर्भाने त्याचा अर्थ कळतो. ओळखता येतो. तर चौथ्यामध्ये विद्यार्थी स्वत:च्या अनुभवाला उताऱ्यासोबत जोडू शकतो का, हे बघायचं होतं’.

विद्यार्थ्यांना साधारण महिन्याभरात एका पातळीचे चार उतारे शिकवले जात होते. मात्र मध्ये मध्ये सुट्टय़ांचा अडथळा येत होता. पुढच्या महिन्यात नवीन उतारे लागणार असतील तर ते आधीच्या महिन्यात लिहिले जायचे. पहिल्या प्रयत्नासाठी अवलंबलेली शिकवण्याची पद्धत चार-पाच पद्धतींचा अभ्यास करून तयार झाली आहे. सहावी-सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी लिहिताना फरक उतारा किती मोठा आहे, यात केला आहे. काही विषय मुलांना माहिती असलेले होते. उदाहरणार्थ – कधी खंडय़ा, मुंगुस. तर कधी टपाल तिकिटं, नाणी – नोटा असे काही वेगळे विषय होते. काही उतारे विज्ञान, इतिहास, भूगोलाचेही होते. या उताऱ्यांमध्ये खूप अवघड – तांत्रिक माहिती न देता त्यांना समजेल अशा भाषेत आणि वाचताना त्यात मन रमेल अशी लिहिली गेली. प्रांजल म्हणतो की, आकलनाच्या डावपेचांचा आम्ही अभ्यास केला. त्यावर नोंदी काढल्या. त्यात आपल्याला वर्गात करता येतील अशा गोष्टी निवडल्या. उदाहरणार्थ – चार प्रकारच्या प्रश्नांचा विचार विद्यार्थ्यांना करायला लावण्यासाठी वर्गात काही उपक्रम करता येतात. एक उतारा शिकवायचा असल्यास एक वर्कशीट दिली जाते. उताऱ्याबद्दल अंदाज बांधायला सांगितलं जातं. तो चाळून बघून त्यात काही चौकटी वगैरे आहेत का ते पाहायला सांगितलं जातं. त्यानंतर एकेक परिच्छेद वाचून त्याचा सारांश विद्यार्थ्यांचा गट सांगतो. त्यातून होणाऱ्या चर्चेतून ‘वाचायचं कसं’ हे मुलं शिकतात. अडलेल्या शब्दाचा अर्थ शोधला जातो. माहितीपर मजकूर समोर आल्यावर तो कसा वाचायचा याची सवय लागते. ‘चांगला वाचक’ वाचतो त्याप्रमाणे हे उतारे आणि एकूणच वाचन कसं करता येईल, ते या विद्यार्थ्यांना कळतं,’ असं तो सांगतो. ‘स्ट्रॅटेजीज ऑफ क्रॉम्प्रिहेन्शन’मधल्या तांत्रिक गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवायच्या हा त्यामागचा उद्देश. एक उतारा होता ‘क्ष किरणां’वर. योगायोगाने हा तांत्रिक उतारा शिकवण्याच्या सुमारास शिक्षक समीरचा पाय फ्रॅक्चर झाला. त्याने पायाचा एक्सरे वर्गात नेऊन आणि शिकवायच्या आधी तो दाखवायचं ठरलं. विद्यार्थ्यांना एक्सरे माहिती होता. ती त्याबद्दल लगेच चर्चा करायला लागली. स्वत:चे अनुभव सांगू लागली. त्यानंतर ‘क्ष किरणां’चा उतारा वाचला गेला. एक उतारा चंद्र – सूर्य ग्रहणावर होता. त्याचं नाव होतं ‘खेळ सावल्यांचा’. तो नुसता वाचून कळणं अवघड होतं. मग तिघांना वर्गापुढे बोलावून त्यांना चंद्र, सूर्य, पृथ्वीच्या भूमिका देत शास्त्रीय माहिती शक्य तितक्या सोप्या पद्धतीनं सांगितल्याचे प्रांजल म्हणतो.

हे उतारे लिहिताना त्यांना शब्द निवडीचं पथ्य काही प्रमाणात पाळावं लागलं आणि काही प्रमाणात ते मुद्दाम पाळलं गेलं नाही. काही संकल्पना एरवी मराठीत वापरतो त्याच वापरल्या. पण अशा खुबीनं वापरल्या की, त्या परिच्छेदातल्या इतर शब्दांमुळे तो शब्द समजेल. उदाहरणार्थ – सापांचे प्रकार सांगताना विषारी, निमविषारी आणि बिनविषारी. यात ‘निमविषारी’ ऐवजी ‘कमी विषारी’ हा शब्द नव्हे तर ‘निमविषारी’ असंच लिहिलं. उपक्रम राबवताना प्रत्येक टप्प्यावर काही ना काही छोटय़ा-मोठय़ा अडचणी आल्या. तो सांगतो की, ‘अगदी शेवटच्या टप्प्यावर वाटलं की, वर्षभर आपण खूप कष्ट केले; पण म्हणावं तितकं यश नाही मिळालं. आम्ही शिकवतो त्या दोन्ही आश्रमशाळा आमच्या संस्थेपासून खूप लांब आहेत. शिवाय विविध प्रकारच्या शालेय सुट्टय़ांमुळे, परीक्षांच्या कालावधीत शिकवण्यात खंड पडत होता. सलग शिकवता येत नाही ही मोठी अडचण जाणवते आहे. आश्रमशाळेतल्या मुलांना सुट्टीत घरी जावंसं वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण त्यांना पुढच्या वाटचालीसाठी तयार करायचं तर असलेल्या चौकटीतच काम करावं लागतं. एरवी प्रयोगशाळेत काम करताना बऱ्याच गोष्टी आपल्या हातात असतात. इथे काम करताना बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. चांगलं शिकवणं, प्रसंगी त्याची पद्धत बदलून पाहाणं या गोष्टी हातात असतात फक्त’. शेवटचा उतारा शिकवून झाल्यावर समीरने प्रांजलला सांगितलं की, ‘आज मुलांनी मला रडवलं. ती मला म्हणायला लागली की आता तू येणारच नाहीस का? आम्हाला शिकताना खूप मजा आली वगैरे वगैरे..’ एकूण विद्यार्थ्यांचा प्रतिसाद खूपच चांगला होता. त्यांना हा उपक्रम बराच आवडला. ठरावीक चौकटीपेक्षा मुलांना व्यक्त व्हायला मिळालेला वाव, साधलेला संवाद त्यामुळे त्यांना निश्चित हा उपक्रम भावला.

विद्यार्थ्यांकडून सराव करून घेताना वाटलं होतं की मुलांचा चांगला फायदा होतो आहे. पण शेवटी जाणवलं की, उपक्रमात सराव केलेले आणि सराव न केलेले विद्यार्थी यांची तुलना करता अपेक्षित परिणाम मिळाला नाही. अपेक्षित परिणाम साधायचा असेल तर शिकवण्याची पद्धत बदलायला हवी. आम्ही वर्षभर एकेक उतारा देत आणि शिकवत गेलो. मधल्या काळात वेळ खूप गेला. हा वेळ कमी केला तर मुलांना कमी काळात अधिक सराव होऊन वाचनाचं आकलन पटकन व्हायला मदत होईल. शिक्षकाला थोडं आणखी प्रशिक्षण देता येईल. असे काही उपाय शोधून, पद्धत बदलून काही करता येईल का, याचा विचार सुरू आहे, असं तो सांगतो.

उपक्रमाविषयी सांगितल्यानंतर फारच आढेवेढे घेत अगदी नाईलाजाने प्रांजलनं स्वत:विषयी सांगितलं. त्याने दोन वर्ष कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंग केलं; पण त्यात त्याचा जीव रमला नाही. कारण त्याला मुळात कला शाखेची आवड होती. त्या सुमारास त्याला आयआयटी मद्रासमधल्या अभ्यासक्रमाविषयी कळलं. तिथं भारतभरातून अर्ज आले होते आणि जागा होत्या फक्त ४०. तिथे त्याने इंग्रजी भाषा आणि साहित्यात एम.ए. केलं. घरच्यांना त्यांच्या करिअरविषयी थोडी काळजी वाटली; पण त्यांचा भक्कम पाठिंबा मिळाला. त्याला लहानपणापासून पुस्तकांची-वाचनाची खूप आवड. तो लिहायचाही. पण त्या लिखाणाचा कुणाला काही फायदा होत नाही, हे जाणवल्याने त्याला खंत वाटायची. पण वाचन-लेखन या आवडींसह आपल्याला लहान मुलांसोबत काम करता येईल, हा साक्षात्कार होण्यासाठी केवळ एक क्षण पुरला. पुढे तो गडचिरोलीला ‘निर्माण’च्या शिबिरात गेला. तिथे आसपासच्या गावात फिरताना त्याला शैक्षणिक परिस्थितीचा अंदाज आला आणि त्याने या संदर्भात काम करण्याचा निर्णय घेतला. तिथे त्याची निमकरसरांशी भेट झाली. त्यांच्या प्रेमळ आग्रहामुळे तो  ‘क्वेस्ट’मध्ये आला. सध्या तो कामानमिमित्त पुणे सोडून पालघरमध्ये राहत असून अलीकडेच त्याचं लग्न झालं आहे.

त्याला अंगणवाडीच्या मुलांच्या ‘पालवी’ उपक्रमासंदर्भात अधिक संशोधन करायचं आहे. मुलं गोष्टी लिहितात, त्या संदर्भातला एक उपक्रम पुढच्या वर्षांत आखायचा आहे. या सगळ्या कामासाठीचं औपचारिक शिक्षण त्यानं घेतलेलं नाही. काही कालावधीनंतर आपण आपल्या कामातूनच शिकतो, असं त्याला वाटतं. तो ‘सक्षम’च्या उपक्रमांतर्गत गडचिरोलीच्या रांगी या गावात पाचवी, सहावी, सातवीच्या वर्गाला शिकवायचा. एक प्रकारे ते त्याचं प्रशिक्षण ठरलं. वर्गात कसं शिकवायचं, कोणत्या अडचणी येतात याचा जणू गृहपाठ झाला.  ‘क्वेस्ट’मधल्या विविध उपक्रमांत सहभागी होताना, काम करताना अनेक कल्पना त्याच्या डोक्यात येतात. त्यांचा तो बारकाईने अभ्यास करतो. वर्गात शिकवताना स्वत:ही अपडेट होत जातो. पदव्यांच्या भेंडोळ्यांपेक्षा मुलांसाठी काम करण्याला प्राधान्य देणाऱ्या प्रांजलला आणि शैक्षणिक कुपोषण दूर सारण्यासाठी झटणाऱ्या  ‘क्वेस्ट’ला पुढच्या उपक्रमांसाठी भरभरून शुभेच्छा.

viva@expressindia.com