24 September 2020

News Flash

गोष्टी सांगणारा प्रणव

क्षण एक पुरे!

|| वेदवती चिपळूणकर

‘एक होता काऊ’पासून आपल्या सगळ्यांचा प्रवास सुरू होतो. ‘ससा-कासव’ करत करत आपण हळूहळू इसापनीती आणि पंचतंत्र कळण्याच्या वयात येतो. तेव्हा प्राणी आपल्याला त्यांच्या वागण्यातून नीतिमत्तेचे धडे देतात. त्याच वेळी ‘हिमगौरीच्या सात बुटक्यां’पासून ते ‘अलीबाबा आणि चाळीस चोरां’पर्यंत सगळ्या कल्पना आणि जादूवरही आपण विश्वास ठेवत असतो. शाळेतल्या अनेक विषयांची सुरुवात बाई आपल्याला गोष्टी सांगून करतात. अनेकदा मूल्यशिक्षणाच्या तासालाही वेगवेगळ्या गोष्टींमधून मूल्यं रुजवायचा प्रयत्न केला जातो. मराठीचे धडे, इतिहासाच्या घटना, विज्ञानातले शोध या सगळ्यांतून वेगवेगळ्या स्वरूपात कथा किंवा गोष्टीच आपल्यासमोर येत राहतात. वयाने कितीही मोठे झालो तरी मनात कुठेतरी दडलेल्या आपल्यातल्या बालकाला गोष्टी ऐकायला नेहमीच आवडतात. काहीजणांकडे या गोष्टी मोठय़ा रंजकपणे सांगण्याची हातोटी असते. काहीजणांकडे मात्र स्वत:च्या गोष्टी रचण्याची कला असते. असाच काल्पनिक गोष्टी रचण्याची प्रतिभा असलेला आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला कथाकार प्रणव सखदेव !

शाळेत असल्यापासूनच प्रणवला लिहिण्याची आवड होती. शाळेत कविता करणाऱ्या प्रणवला त्याच्या शिक्षकांनी आणखी ‘लिहितं’ केलं. त्याला आणि त्याच्या मित्रांना सोबत घेऊन सरांनी शाळेचा स्वत:चा दिवाळी अंक काढला. लिहिणं, वाचणं या सगळ्यात त्याला रस होता. मात्र दहावीला सत्याऐंशी टक्के मिळाल्यामुळे त्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. सायन्स घेतलेल्या वर्षांबद्दल प्रणव म्हणतो, ‘‘मला सायन्स अगदीच आवडत नव्हतं असं नाही. मात्र त्यात मला फक्त फिजिक्स, म्हणजे भौतिकशास्त्र आवडायचं. त्यामुळे सायन्सला मी अगदीच अनिच्छेने गेलो नव्हतो. पण त्यात एकदा पडल्यावर लक्षात यायला लागलं की मला फक्त फिजिक्स आवडतं आणि बाकी काहीच आवडत नाही. त्यापेक्षा मला भाषा, लेखन, कविता अशाच गोष्टी आवडतात. अकरावीचं वर्ष सायन्समध्ये काढल्यानंतर मी बारावीला कला शाखेत प्रवेश घ्यायचा निर्णय घेतला.’’ त्याच्या या निर्णयानंतरची त्याच्या घरच्यांची, मित्रांची, आजूबाजूच्या लोकांची प्रतिक्रिया सांगताना तो म्हणतो, ‘‘माझ्या या विचाराने आई-बाबाही जरासे गोंधळले होते. पुढे यातून काय करणार, असा प्रश्नही त्यांना पडला होता. पण अगदी कमी वेळात त्यांनी मला समजून घेतलं. मात्र आसपासच्या लोकांना माझं नक्की काय चाललंय हा प्रश्न पडलाच होता. दहावीला चांगले मार्क मिळवलेला, सायन्स घेतलेला आणि बारावीलाही बोर्डात येऊ  शकणारा मुलगा आता अचानक आर्ट्स घेऊन काय करणार आणि मुळात हा वेडेपणा कशासाठी, असे अनेक प्रश्न त्यांना पडले होते. सायन्समधून आर्ट्सला आला म्हणजे मुलगा वाया गेला असं म्हणून आसपासच्या लोकांनी माझ्या घरच्यांशी बोलणंही बंद केलं. माझ्या तेव्हापर्यंतच्या मित्रांनीही मला जवळजवळ वेडय़ात काढलं आणि माझ्याशी मैत्रीसुद्धा तोडून टाकली. पण माझा आर्ट्सला जायचा निर्णय पक्का होता. या सगळ्या आसपासच्या परिस्थितीमुळे मी हे मात्र नक्की केलं की मला त्याच कॉलेजमध्ये राहायचं नाही. त्यामुळे मी कॉलेज बदललं आणि रुईयाला बारावी आर्ट्सला प्रवेश घेतला.’’

अकरावी सायन्स करून बारावीला आर्ट्स घेणं आणि तेही रुईयाला अ‍ॅडमिशन घेणं यानेच प्रणवच्या लेखन आणि वाचनाच्या आवडीला घडवलं असं तो म्हणतो. लेखनाच्या आवडीला भरकटू न देता माणूस म्हणून आपल्या लेखनात आणखी काय यायला हवं यासाठीचे अनुभव रुईयाने दिल्याचं प्रणव सांगतो. ‘‘मी कल्याणमध्ये लहानाचा मोठा झालो. तिथल्याच शाळेत आणि नंतर कॉलेजमध्येही गेलो,’’ प्रणव रुईयाबद्दल बोलताना म्हणतो, ‘‘रुईयामध्ये गेल्यानंतर मला मुंबई कळायला लागली. तिथल्या अ‍ॅक्टिव्हिटीज, तिथली इतर मुलं, त्यांना माहिती असलेल्या आणि मला कल्पनाही नसलेल्या अनेक गोष्टी, वाड्मय मंडळ अशा अनेक गोष्टींनी मला बरंच काही दिलं. साध्या कट्टय़ावरच्या गप्पांनीसुद्धा अनेक गोष्टींची मला ओळख करून दिली. तत्त्वज्ञानाचा मी विद्यार्थी होतो, मराठी साहित्य मी शिकत होतो. कल्याणमध्ये राहून मला जे मिळालं नसतं ते एक्स्पोजर मला रुईयामध्ये मिळालं. स्वत:च्या विषयांव्यतिरिक्तही सगळं वाचायची सवय आमच्या मराठीच्या मॅडमनी आम्हाला लावली. तेव्हाही मी कविता करत होतो, काहीबाही लिहीत होतो. रुईयाने मला माणूस म्हणून अधिक समृद्ध केलं आणि लेखक होण्याच्या प्रवासासाठी अनेक अनुभव दिले. सायन्स सोडून आर्ट्स घेणं आणि कल्याण सोडून, प्रवासाचा त्रास घेऊ नसुद्धा रुईयामध्ये येणं हे माझ्यासाठी खूप मोठे टìनग पॉइंट्स होते.’’

मराठी साहित्याची डिग्री घेतल्यानंतर प्रणवने जर्नलिझमचा कोर्स केला. लिहित्या हाताला वेगळा अनुभव देण्याची त्याची इच्छा होती. त्यानंतर त्याने सहा महिने ‘लोकसत्ता’ वृत्तपत्रासाठी काम केलं. रिपोर्टिगच्या अनुभवाबद्दल प्रणवने सांगितलं, ‘‘खरी मुंबई या रिपोर्टिगमधून कळली. मुंबईच्या प्रश्नांपासून ते तिच्या संस्कृतीपर्यंत सगळं काही या रिपोर्टिंगच्या काळात पाहायला मिळालं. त्या काळात स्वत:ला सगळे अनुभव घेऊ द्यायचे असं ठरवून मी दिवस दिवस काम करत असायचो. सकाळी दहा ते रात्री दहा असंही मी काम केलं आहे. अशा प्रकारचे अनुभव घेण्यात एक वेगळीच गंमत असते. हे लेखन खूप वेगळ्या प्रकारचं होतं. त्यात काही काळ मला छान वाटलं. त्यामुळे मी नंतर अजून एका वृत्तपत्रासोबत काम केलं. मात्र त्यावेळी ट्रेनने कल्याण ते सीएसटी प्रवास करताना स्वत:च्या लेखनासाठी वेळ आणि ऊ र्जा दोन्ही शिल्लक राहिनासे झाले. मग मात्र मी ती नोकरी सोडून पुण्याला जायचा निर्णय घेतला. तोपर्यंत माझं हे ठरलेलं होतं की मला रिपोर्टिग करायचं नाही, तर मला लिहायचं आहे.’’ पुण्याला मी पब्लिकेशन हाऊसमध्ये भाषांतरकार आणि संपादक म्हणून काम करायचं ठरवलं होतं. त्यातून मला लेखनाला भरपूर वेळ मिळणार होता. पुण्यात आल्यानंतर माझ्या कथालेखनाला व्यवस्थितपणे सुरुवात झाली, असं तो सांगतो.

पहिली कथा प्रसिद्ध झाली त्यावेळी लोकांच्या येणाऱ्या प्रतिक्रियांचं काहीसं दडपण येणं अगदी साहजिक होतं, असं प्रणव सांगतो. मात्र एखादी कथा लिहिताना त्यांच्यावर आपली मालकी दाखवायची नाही; तर त्या कथेतील पात्रं त्यांच्या स्वभावानुसार, मतानुसार जशी वागतील तसं त्यांना स्वीकारायचं, हे अनुभवाने प्रणवला शिकवलं. कथा रचण्यापेक्षा ती घडू देण्यात गंमत असते हे त्याचं साधं सूत्र आहे. केवळ बुद्धिवादी लिहिणारे, राजकीय लिहिणारे, ललित आणि कविता यातला फरक न कळता दोन्हीची भेसळ करून लिहिणारे असे अनेक तथाकथित तरुण लेखक असताना कथा लिहिणारा, प्रत्येक कथेसाठी नव्याने जगणारा, स्वत:च्या एकाच व्यक्तिमत्त्वात अनेक पात्रं घडवण्याची क्षमता बाळगून असलेला प्रणव सखदेव याचमुळे इतरांपेक्षा वेगळा ठरतो. आपल्या आत आपली पॅशन आपल्याला काहीतरी सांगत असते. तिचं ऐकलं तर आपण आनंदी राहण्याकडे वाटचाल करू शकतो. जगण्याच्या आपल्या गरजा आपण आधीच इतक्या वाढवून ठेवलेल्या असतात की त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला ज्यात ‘पडलो’ आहोत ते प्रोफेशन सोडता येत नाही आणि त्या प्रोफेशनमध्ये आपलं मनही रमत नाही. अशा वेळी आपलं मन कशात रमतं ते आधी पाहावं म्हणजे आपल्या गरजा आपोआप त्या पद्धतीनेच आकार घेतात. आपल्या गरजा आपल्या आवडीला पूरक ठरल्या की मग कॉम्प्रमाईज करण्याची गरज पडत नाही. रिस्क घ्या, धोका पत्करायला शिका. सारखा सेफ गेम खेळू नका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 12:08 am

Web Title: article on storyteller pranav sakhdev
Next Stories
1 ‘टिकटॉक’ची घोडदौड
2 पीयूष रानडे
3 आरोग्यक्षेत्रातील सहकारी
Just Now!
X