29 March 2020

News Flash

‘अमृता’नुभव

मला पु. ल. देशपांडे आणि नाना पाटेकरांसारखं श्रीमंत व्हायचंय

नाटक, मालिका, चित्रपटातून आपल्या सशक्त अभिनयाने रसिकांची मनं तिने जिंकली होती, मनस्वी लेखिका आणि गायिका म्हणूनही ती परिचित होती. पण अमृता सुभाष नावाचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व भरभरून भेटलं ते गेल्या गुरुवारी मुंबईत झालेल्या व्हिवा लाउंज या कार्यक्रमामधून. केसरी प्रस्तुत लोकसत्ता व्हिवा लाउंजच्या निमित्ताने अमृताशी दिलखुलास गप्पा रंगल्या आणि या मनमोकळ्या आणि प्रवाही ‘अमृत’धारा दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात उपस्थित रसिकांवर अक्षरश: बरसल्या. अरुंधती जोशी आणि रोहन टिल्लू यांनी अमृताला बोलतं केलं. या गप्पांमधून टिपलेले काही ‘अमृता’नुभव..

श्रीमंतीची व्याख्या
माझी श्रीमंतीची व्याख्या अनुभवातून डेव्हलप होत गेलीय. सुरुवातीला वाटायचं, आपली गाडी आल्यावर आपण श्रीमंत, मग मोठी गाडी आल्यावर श्रीमंत.. पण आता लक्षात आलंय की, मला पु. ल. देशपांडे आणि नाना पाटेकरांसारखं श्रीमंत व्हायचंय. पैसा खूप लोक कमावतात पण नाना सर जो शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्याचा विनियोग करताहेत किंवा पु.ल. देशपांडेंनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रासारखी संस्था त्या पैशातून सुरू केली, हे खरंच ग्रेट आहे. मला हे खरे श्रीमंत लोक वाटतात आणि मला असं श्रीमंत व्हायला आवडेल.

यश म्हणजे काय?
एक व्यक्ती म्हणून माझा शोध सतत चालू असतो. तो शोध हाच ध्यास बनतो आणि त्यानुसार वाटचाल करत असताना आजूबाजूच्या गोष्टी आपोआप आपल्या ध्येयाला अनुकूल अशा घडत जातात. नासीरुद्दीन शहांनी मला भूमिकेविषयी एकदा सांगितलं होतं, ‘तुम बाहर से मत शुरुवात करो अंदर से करो’ ते वाक्य मी माणूस म्हणूनही जपलंय. बाहेरच्या यशापेक्षा आपलं आपल्याशी असणारं नातं, अंतर्गत संवाद महत्त्वाचा आहे. ‘ती फुलराणी’ होईल, ‘किल्ला’ होईल, पण स्वतशी संवाद वाढत जाणं हे खरं यश. कोणतीही गोष्ट न लपवता, माझ्यातल्या वैगुण्यासह स्वतला आनंदानं स्वीकारणं म्हणजे यश. एका चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी गेले तेव्हा अगदी थोडे प्रेक्षक आले होते. पण त्या थोडय़ांसमोर जाऊन थँक्यू म्हणणं हे माझं यशच आहे. हेदेखील सत्यदेव दुबेजींनी शिकवलं. आम्ही ४० जण कुसुमाग्रजांच्या कवितेवर एक कार्यक्रम करायचो. कधीतरी प्रेक्षक खूप कमी असायचे. दुबेजी म्हणायचे, ‘कोई बात नही.. हम लोग बहौत है’ मग आम्हीच प्रेक्षकांमध्ये बसून स्टेजवरच्या कवितांचा आनंद घ्यायचो. धिस इज द स्पिरिट.. आपल्याला हवं ते करता येणं हे यश.

पहिली गुरू
आई ज्योती सुभाष ही अर्थातच माझी पहिली गुरू. तसाच आईच्या आईचा म्हणजे माझ्या आजीचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. आपण काय करायचं हे स्पष्टपणे शोधणारी आणि तेच करणारी माणसं मी लहानपणापासूनच पहिली. त्यातूनच घडायला सुरुवात झाली. माझे मामा प्रख्यात नाटककार गो. पु. देशपांडे. लहानपणापासून मी या मामाबद्दल खूप सुरस गोष्टी ऐकत होते. तो कसा आणि किती वाचायचा आणि वाचताना जेवायचंही विसरून जायचा.. त्याच्या कामाविषयी, एकंदर व्यक्तिमत्त्वाविषयी मला आकर्षण होतं. आईला मी लहानपणापासून काम करताना पाहिलंय. माझे नाटकातले पहिले गुरू सत्यदेव दुबे यांचंच एक नाटक आई करत होती, तेव्हा अगदी लहानपणी मी तिचं काम पाहिलं. ‘तुघलक’ नाटकात आईने सौतेली माँची भूमिका साकारली होती. तेव्हा घरातली भाकऱ्या थापणारी आई रंगमचावर जाऊन दागिने काय घालते, किंचाळते काय.. मला त्याची तेव्हा खूप गंमत वाटली. त्या वेळीच वाटलं आपण असं करायला हवं.

कुसुमाग्रज, गुलजार आणि मी
एका कार्यक्रमाला मी कुसुमाग्रजांची कविता सादर केली होती, ती गुलजारजींनी ऐकली आणि त्यांनी मला कुसुमाग्रजांच्या कविता िहदीत भाषांतर करण्यासाठी मदत करशील का म्हणून विचारलं. मी गांगरलेच. एवढय़ा मोठय़ा कवीच्या कविता, दुसऱ्या ताकदीच्या कवीला समजवायच्या म्हणजे.. सुरुवातीला जमणार नाहीच म्हणाले होते. पण ते म्हणाले की, त्यांना कवितांचा भावार्थ हवाय. माझा प्रत्येक गोष्टीत शिरायचा मार्ग भावनेतून आहे त्यामुळे मग मी स्वीकारलं. मला कधीकधी कवितेचा अर्थ हिंदी शब्दांतून सांगताच यायचा नाही. तेव्हा मी हावभाव करून समजवायचे. कवितेचा अर्थ सांगताना योग्य शब्द सापडत नाही म्हणून अक्षरश नाचायचे. ते टक लावून ते सगळं बघत असायचे. त्यांना त्यातून बरोब्बर अर्थ उमगायचा आणि त्यांचं पेनानं कागदावर व्यक्त होणं सुरू झालं की, मग खोलीत गाढ, भारलेली शांतता पसरायची. मीदेखील त्या आसमंताबरोबर शांतावायचे. किती वेळ जायचा कळायचं नाही. वाचून दाखवल्यावर वाटायचं.. माझ्या या सगळ्या नाचातून किती चपखल अर्थ शोधलाय या माणसानं! मी आयुष्याची खूप ऋणी आहे की, मला गुलजारसारख्या माणसाला जवळून पाहता आलं. माझ्यासारख्या मुलीला प्रेमानं वागवणं, नवख्या मुलीनं सांगितलेले बदलसुद्धा त्यांनी ऐकले यातून त्यांचा मोठेपणा जाणवला.

आताशा असे हे..
कित्येकदा सगळं काही नीट असताना नराश्य वाटायचं. मनाच्या वाटा आपल्या परिचयाच्या असतात पण आपण स्वत:ला संपूर्ण कळलोय का, हा प्रश्न पडतो. या सगळ्या गदारोळात नक्की काय करायचं, हा प्रश्न येतो. तेव्हा मला विजय तेंडुलकरांनी एक मार्ग सुचवला होता. खूप चांगल्या मानसोपचारतज्ज्ञाकडे त्यांनी मला पाठवलं. ज्यातून मला माझ्या धडपडत्या काळात खूप साथ दिली. मी उपचार घेतेय, ज्यातून माझ्यातलं चांगलं अजून कसं बाहेर येईल हे मी पाहतेय. मानसोपचार वेड लागल्यावरच घेतात असं नसतं. माझ्यातलं माझं काही स्वीकारायला अवघड जातं. मित्र-मैत्रिणींपेक्षाही तेव्हा तटस्थपणे पाहणारं कोणी तरी हवं असतं. मानसोपचारतज्ज्ञ तुम्हाला आयुष्याकडे तटस्थपणे पाहायला मदत करतो. मानसोपचारतज्ज्ञ मार्ग दाखवणार नसतो तर तो मला माझा मार्ग शोधायला मदत करीत असतो. मला उद्विग्न व्हायला होतं, जेव्हा सुशिक्षित लोकही याकडे टॅबू म्हणून पाहतात. मानसिक प्रश्न न सोडवले गेल्यामुळे त्याचा समाजावर, नातेसंबंधावर परिणाम होतोय. आपल्या मनाला काबूत ठेवता आलं पाहिजे, हे सुजाण नागरिकाचं लक्षण आहे.

अपयशातून मार्ग
राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातून आल्यानंतरसुद्धा मनात एक भीती असते. ती कोणत्याही ग्रॅज्युएट्सच्या मनात असते. पुढच्या कामाबद्दलची.. माझ्यापुढेही दैनंदिन मालिका, प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, सिनेमा, जाहिरात असे अनेक मार्ग होते. आपल्याला भूमिकेतलं सत्य शोधायचंय अशी खूणगाठ मनाशी बांधून मी आले होते. आईच्या नावामुळे सुरुवात सोप्पी होती पण टिकून राहणं तितकंच महत्त्वाचं होतं. मलाही त्यासाठी संघर्ष करावा लागलाच. खूप ऑफिसेसमध्ये जाऊन फोटो देणं, त्यांनी ते डोळ्यासमोरच बाजूला टाकून देणं, दिवसाला ४- ४ स्क्रीन टेस्ट देणं आणि एवढं करूनही काम न मिळणं हा भागसुद्धा लक्षात आला. कुणीतरी तुमच्यावर पहिला विश्वास ठेवणं गरजेचं असतं. ‘झोका’च्या निमित्ताने प्रतिमा कुलकर्णीनी माझ्यावर तो ठेवला. ‘ती फुलराणी’ वामन केंद्रेमुळे मिळालं. तेव्हा लक्षात आलं आपल्या कामामुळेच काम मिळणार आहे. तुम्ही जेव्हा मनापासून मेहनत घेत असता ना, तेव्हा एक शक्ती आपल्या प्रयत्नांना यश देत असते, यावर माझा विश्वास आहे.

चित्रपटातली कलात्मकता
आपण अर्थपूर्ण करायला जावं आणि प्रेक्षकांनी ते उचलून धरावं यासारखं दुसरं सुख नाही. ते ‘किल्ला’ने मला भरभरून दिलं. कलात्मक चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट आता हातमिळवणी करू लागले आहेत. ‘किल्ला’च्या निमित्ताने नवीन प्रयोग करू इच्छिणाऱ्या तरुणांना बळ मिळालं आहे. कलात्मक आणि व्यायवसायिक चित्रपट असा फरक माझ्यालेखी नसतो. माझ्यासाठी एकतर चांगली संहिता असते, किंवा चांगली संहिता नसते. संहिता आवडली तर मी पसे विचारत नाही. ती मला करायची असते. माझ्यासाठी ‘किल्ला’ हा तसाच अमूल्य आहे.

निंदकाचे मोल
पूर्वी आईने, सरांनी कौतुक करावं असं वाटायचं. यशाचे काही ढोबळ निकष असतात ना.. टाळ्या मिळाल्या, पुरस्कार मिळाले की झालं. पण त्याच टप्प्यावर मला पुढचा रस्ता दाखवणारी माणसं भेटली. हल्ली अशा क्रिटिक्सची कमतरता आहे. ते सांगतात ते ऐकायलाही आपल्याला वेळ नसतो. सगळं छान छान ऐकूया, छान वाटून घेऊ या असं झालंय. पण खरोखर बावनकशी आणि त्याच्या आसपासचं काय यात एक सीमारेषा असते. ती आता धूसर होत चालीये. चुका पाहणारी आणि दाखवणारी माणसं आता फार कमी असतात. ती असायला हवीत असं वाटतं. त्या माणसांचं मोल माझ्या आयुष्यात खूप मोठं आहे.

‘अवघाचि’चं देणं
‘अवघाचि संसार’ या मालिकेमुळे मी घराघरात पोहोचले. दैनंदिन मालिका करायचं ठरवलं तेव्हा मुंबईत काहीतरी काम करत राहणं माझ्यासाठी गरजेचं होतं. थोडय़ा नकारात्मक विचारांतून याची सुरुवात झाली होती. पण त्यातही दुबे सरांनी मला एक वेगळा दृष्टिकोन दिला. तू एक अभिनेत्री आहेस नि तुला रोज कॅमेऱ्याला सामोरं जाण्याची संधी मिळतेय. १५ तास काम करताना १५ व्या तासालादेखील तितकाच सशक्त अभिनय केला गेला पाहिजे. हा किती सुंदर अॅक्टिंग एक्सरसाइज आहे. पुढे याच सकारात्मक विचारातून मी तद्दन व्यावसायिक सिनेमे केले. माझी भूमिका मी कशी उत्तम प्रकारे साकारेन हा माझा प्रयत्न असतो. दैनंदिन मालिका हा इझी मनी आहे. साडेचार र्वष मी या माध्यमाला दिली. यामुळे मला आíथक स्थर्य प्राप्त झालं. पण पसा मिळवण्याच्या पुढे जाऊन यश पाहायला हवं.

ती फुलराणी..!
मंजुळा साळुंखे ही माझ्या व्यावसायिक नाटकातील पहिली प्रमुख भूमिका होती. भक्ती बर्वे यांनी मंजूळा खूप उत्तम साकारली होती. त्याचं दडपण मला होतं. पण वामन केंद्रे यांनी मी ‘ती फुलराणी’ करताना त्याचा फॉर्म बदलला, त्यामुळे ती भूमिका करणं माझ्यासाठी खूप सोप्पं होतं. ‘ती फुलराणी’ सांगीतिक करायचं असं ठरत होतं तेव्हा खास वेगळी गाणी लिहिण्यासाठी सौमित्रला सांगण्यात आलं होतं. पण नंतर असं लक्षात आलं की पुलंच्या भाषेला एक गेयता आहे की संवादांना गाण्याचं रूप दिलं गेलं. ‘ती फुलराणी’मधल्या मंजुळाने आसपास हलाखीची परिस्थिती असूनसुद्धा खूप मोठी स्वप्नं बघणं हे मला शिकवलं.

न दिसणारा संघर्ष
आई अभिनय क्षेत्रातील असल्यामुळे आणि तिने केलेल्या अप्रतिम कामांमुळे लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा होत्या. त्यामुळे काम चांगलंच व्हायला हवं, नाही तर लोक काय म्हणतील असं दडपण यायचं. मी केलेल्या ‘सावली’ चित्रपटात जसं त्या मुलीला वेगळी ओळख हवी असते, तसं तेव्हा.. कॉलेजच्या वयात मला प्रकर्षांनं वाटायचं. राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात (एनएसडी)मध्ये प्रवेश घेतला तेव्हा इतक्या वर्षांनीही ज्योती सुभाषच्या भूमिका तिथे आठवल्या जात होत्या. आई आणि नासीरुद्दीन शाह ‘एनएसडी’च्या एका बॅचचे. त्यांच्यानंतर मी आणि नासीरसरांची मुलगी हिबा शहा आम्हीही एकाच बॅचला होतो. लोक कौतुकानं ‘अगली जनरेशन भी आ गयी’, असं म्हणत. आम्ही दोघी मात्र खट्टू व्हायचो, तेव्हा. वाटायचं.. लोग हमे हमारे नाम से कब जानेंगे? अर्थात हे त्या वयात. पुढे मला आईबरोबर काम करण्याची संधी मिळाली. पहिल्यांदा आईसोबत काम करताना भीती होती. ‘काळोखाच्या लेकी’ नावाचं नाटक आम्ही केलं तेव्हा आईने अभिनेत्री म्हणून माझं दडपण, माझी भीती समजून घेतली. नंतर आम्ही एकमेकींच्या मैत्रिणी होत गेलो.

नाटय़शास्त्रातलं अस्थेटिक्स
राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात पहिल्या वर्षी सुतारकाम, चित्रकला, सौंदर्यशास्त्र असे अनेक विषय असतात तेव्हा त्याचं महत्त्व नव्हतं. माझी चित्रकला थोर आणि पुन्हा तेच का म्हणून चिडचिड व्हायची. माझा मित्र आणि ‘एनएसडी’तला सीनिअर राजू वेल्लाशेट्टी या मित्रानं एकदा याचं महत्त्व पटवून दिलं. चित्र कसं काढतेस हे महत्त्वाचं नाही, ते काढताना काय विचार करते आहेस, हे महत्त्वाचं. हा विचार भूमिका साकारताना खूप फायदेशीर होईल. कादगावर काय उतरतंय ते इथे महत्त्वाचं नाहीच. आत काय उतरतंय हे महत्त्वाचं.

अनुभवण्याजोगा सिनेमा
सिनेमा म्हणजे भव्यता. आवाज, छायांकन, कलर करेक्शन, प्रकाशयोजना, चित्राची खोली या सगळ्याला न्याय द्यायचा असेल तर तो चित्रपटगृहांतच पाहायला हवा. नाटकांचंही तसंच आहे. नाटकाचं चित्रीकरण करू नये याबद्दल सांगताना नासीरुद्दीन शहा एकदा म्हणाले होते, ‘‘नाटक पानी पे लिखी हुई कहानी है, शूट कर के देखना, मतलब खाना ठंडा कर के खाने जैसा है’’ कारण ते अनुभवण्यासारखं असतं. तसाच चित्रपट मोठय़ा पडद्यावरच अनुभवायला हवा.

बालपणातलं सादरीकरण
आता ऐकताना थोडं हास्यास्पद वाटेल पण लहानपणी मी लाजरीबुजरी, शांत, घुमी होते. घरी पाहुणे आले की, आतल्या खोलीत जाऊन बसायचे. पण पाहुण्यांसमोर मला गायला नक्की बोलावणार याची वाट बघत बसायचे. आतल्या खोलीत जाऊन गाण्याची पट्टी वगैरे तालीम करायचे. माझं सादरीकरण चांगलंच व्हायला हवं, याची मी तेव्हापासून काळजी घ्यायचे. पाहुण्यांसमोर नुसतं जायला लाजणारी मी त्यांच्यासमोर गाणं सादर करायचे तेव्हा मला कसलीच लाज वाटायची नाही. तेव्हा जाणवायचं की, हे सादर करण्याची जागा आहे जिथे मोकळं वाटतं, जिथे कसलाच अडसर वाटत नाही. सादरीकरणातून मी मोकळी होत असते. रंगमंचाची ओढ तेव्हापासूनच लागली. वाढत्या वयात स्वप्न बघतो, तशी मीदेखील बघितली होतीच. तेव्हा ‘उडान’ सीरिअल बघून मला ऑफिसर व्हायचं होतं. त्यासाठी अभ्यास तर चांगलाच करायचा होता. मला मार्कही चांगले पडले दहावीत. पण नाटक आवडतंय, मोकळं होणं आवडतंय हे तेव्हाच जाणवलं आणि आर्ट्सलाच जायचं पक्कं केलं. चांगले मार्क मिळूनही सायन्सला गेले नाही. विचारातली क्लॅरिटी तेव्हा उपयोगी पडली. घरूनही या स्पष्ट विचारांचं स्वागतच झालं. कधीही तू इकडे जा- तिकडे जाऊ नको असं सांगितलं गेलं नाही.

दुबे गुरुजींची शिकवण
मी पुण्यात कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत ‘पार्टनर्स’ नावाची एकांकिका केली होती. ती खूप गाजली. त्यात मला परितोषिकही मिळालं होतं. (ते नाटक संदेश कुलकर्णीनं लिहिलं होतं आणि त्यानंतर आम्ही प्रत्यक्षातही लाइफ पार्टनर्स झालो.) एकांकिका एवढी गाजल्यावर मी मुंबईला जायला सज्ज झाले होते.. स्टार व्हायला. ‘एनएसडी’मध्ये वगैरे शिकायला जायची काय गरज, असं मला वाटलं होतं. आईने तुमचे मार्ग तुम्हीच निवडा सांगितलं होतं. त्या टप्प्यावर पं. सत्यदेव दुबे यांच्यासारखा गुरू लाभला आणि मी जमिनीवर आले. त्यांनी चक्क एनएसडीत जाणार नाही म्हणाले तेव्हा आय विल स्लॅप यू.. थोबाडीत देईन या भाषेत सुनावलं. तसंच डॉ. श्रीराम लागू यांनी मला समजावलं होतं. तिथे दिल्लीला जाऊन स्वत:चं शिक्षण स्वत: घे. तिथे जाऊन वेगवेगळ्या भाषांतील, प्रदेशातली पुस्तकं, माणसं भेटतील, चित्रपट पाहता येईल आणि स्वत:ची पाठशाळा स्वत: होता येईल असं सांगितलं आणि मी ‘एनएसडी’त जायचा निर्णय घेतला.

कलाकाराचं समाजभान
कला क्षेत्रात घडणाऱ्या किंवा समाजात घडणाऱ्या घटनांमध्ये कलाकार म्हणून आपण नक्कीच भूमिका घ्यायला हवी, असं मला वाटतं. पुण्याच्या एफटीआयआयच्या संचालक पदासंदर्भात झालेला निर्णय बदलायला हवा, असं एक कलाकार म्हणून मला वाटतं. ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांना माझा पूर्ण पािठबा आहे. ज्यांच्याकडून आपण शिकतो किंवा जे आपल्यासाठी नवीन योजना करणार असतात, राबवणार असतातत्याचं विद्यार्थ्यांना भान असावंच. त्यांच्याबाबत निर्णय घेणाऱ्या माणसाला तशी दृष्टी पाहिजे, हेही खरं.

१५ मिनिटं स्वत:साठी..
आपण मानसिक आरोग्यासोबत शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. सगळ्यांनी दररोज आनंदाचा व्यायाम करा आणि रोज निदान १५ मिनिटं स्वत:जवळ असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातून आपल्याला माहीत नसलेलं आपल्यातलं आपल्यासमोर येईल. ते समोर येण्याचा शांतपणा ती १५ मिनिटं तुम्हाला देतील.

मोठा खजिना
घर आणि करिअर.. नातं सांभाळण्यासाठी मला खरंच काही काळजी करावी लागत नाही. मला निर्धोकपणे जगता येतं, कारण संदेशच्या रूपाने मला चांगला जोडीदार मिळालाय. माझ्यासाठी माझा नवरा हा सगळ्यात मोठा खजिना आहे. मला त्याचं अप्रूप आहे. त्याने मला खूप समजून घेतलंय. ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’मधल्या माझ्या लेखाचा पहिला वाचक तो होता नि त्याने मला काही बदल सांगितले. ते केल्यानंतर मला खूप चांगला प्रतिसाद आला. मी असं म्हणेन की ते लेख आमची बाळं आहेत.

लेखन आणि दिग्दर्शन
‘आजी’ या लघुचित्रपटाचं मी दिग्दर्शन केलेय. स्वत दिग्दर्शन करताना हे माझं खरं काम आहे असं मला वाटतं. ‘तुझ्यातलं खूप काही या निमित्ताने बाहेर येईल, व्यक्त होईल’, असं संदेश मला नेहमी सांगत असतो. तीच गोष्ट लेखनाची. ‘लोकसत्ता’नेच मला माझ्यातल्या लेखनकौशल्याची जाणीव करून दिली. ‘चतुरंग’मधल्या ‘एक उलट एक सुलट’च्या निमित्ताने सातत्याने अडीच र्वष मला ‘लोकसत्ता’ने लिहितं ठेवलं, त्याबद्दल मी त्यांची खूप ऋणी आहे. भूमिकेच्या, शॉटच्या तयारीत असताना मी लेख लिहिले आहेत पण घरी असले की मी टची व्हायचे. एका वेगळ्या जगात घेऊन जाण्याची ताकद लिखाणात असते .
यशस्वी होत असताना आपल्याशीच आपला संवाद वाढत जाणं हे महत्त्वाचं आहे. तेच खरं
यश आहे.

नासीरुद्दीन शहांचे धडे
मला राष्ट्रीय राष्ट्रीय नाटय़ विद्यालात नासीरुद्दीन शहा यांच्यासारखे गुरू लाभले. त्यांचे क्लासेस म्हणजे माझ्यासाठी पर्वणी होती. एका नाटय़प्रयोगाला सर आले असताना माझ्या अभिनयासाठी मला अनेकदा टाळ्या मिळाल्या. आता सरही आपलं कौतुक करतील असं मला वाटलं. पण त्यांनी मला विचारलं, ‘तुला असं वाटत नाही का की, तू तुझ्या भात्यातले बाण बदलायला पाहिजेस? मी दोन-तीन प्रयोग पहिले तुझे, जो बाण प्रेक्षकांना लागतो आहे तोच काढून तू मारत राहिलीस तर तू अभिनेत्री म्हणून कशी घडणार? तेच तेच करण्यापेक्षा पुढच्या प्रयोगात काही तरी नवीन कर, कदाचित ते फसेल पण निदान नवीन काही तरी देण्याचा तुझा प्रयत्न असेल.’ त्यांचा हा सल्ला मी आयुष्यभर माझ्या गाठीशी ठेवलाय.

viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 1:23 am

Web Title: interview with amruta
Next Stories
1 ‘वेग ‘वेग’वती
2 अमृतानेजिंकलं
3 टावल
Just Now!
X