|| सुमित जोशी

अलीकडेच ‘सुपर ३०’ हा चित्रपट पाहिला. त्यात ‘बसंती नो डान्स’ हे गाणं इंग्लिश आणि हिंदी भाषेत आहे. हृतिक रोशन मुलांच्या मनातील इंग्लिशविषयीची भीती काढण्यासाठी त्याच्या विद्यार्थ्यांना होळीच्या दिवशी इंग्लिशमध्ये गाणं गायला सांगतो. तेव्हा मुलांनी केलेला हा प्रयत्न म्हणजे हे गाणं. गाण्याच्या अखेरीस हृतिकच्या तोंडी अनेकदा लोक ‘मे आय कम इन?’ असं म्हणत नाहीत, म्हणून जगात असे खूप दरवाजे आहेत, जे त्यांच्यासाठी उघडत नाहीत, अशा आशयाचा संवाद आहे. हे सगळं सांगायचा उद्देश असा की, आपल्याला आपल्या समोर असणाऱ्या संधींची माहितीच नसते आणि त्या संधी साध्य करायचा प्रयत्नही आपण करत नाही. हा विचार करताना मला आठवू लागला माझ्या करिअरचा प्रवास. त्यातले महत्त्वाचे आत्मविश्वसानं घेतलेले निर्णय आणि संधीदेखील..

मुंबईत भरलेल्या एका शैक्षणिक मेळाव्यात ‘युनिव्हर्सिटी ऑफ टास्मानिया’तील अभ्यासक्रमाविषयी कळलं. हे विद्यापीठ संशोधनाच्या प्रांतात अव्वल दर्जाचं आहे. हा अभ्यासक्रम आणि एकूणच विद्यापीठाची माहिती इंटरेस्टिंग वाटली. मी ‘अ‍ॅटॉस’मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर पदावर होतो. भारतात मास्टर्समध्ये रिसर्च (संशोधन) करण्याचा पर्याय अल्प प्रमाणात आहे. देशासाठी काम करण्यात खारीचा वाटा उचलायचा असेल किंवा स्वत: काही शोध लावायचा असेल तर रिसर्च हाही पर्याय असतो. मात्र आपल्याकडे फक्त पीएचडीचाच पर्याय अधिक चटकन दिसतो. ऑस्ट्रेलियामध्ये मास्टर्सच्या अभ्यासक्रमात संशोधनाची संधी दिली जाते. ही माहिती कळल्यावर त्यावर विचार केला. आयटीमध्ये काम करताना तेच ते काम करत असल्याची जाणीव होत होती. त्यामुळे काही वेगळं करावं, संशोधनपर करावं, असं मनात आलं. त्या विचारांना पत्नी अमृता नेनेने लगेच कृतीची जोड दिली. माझा अर्ज पाठवला. तो स्वीकृत झाला. मला ‘मास्टर्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सिस्टिम्स’च्या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला. नोकरीचा अनुभव जमेस धरल्याने व्हिसाचं काम लगोलग झालं.

आत्ता सांगतो आहे, तितक्या आणि तेवढय़ा सहजसोप्या गोष्टी घडल्या नाहीत. मी ‘अ‍ॅटॉस’मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर होतो. चांगला पगार होता. अमृता बँकेत नोकरी करत होती. इथे यायचा निर्णय घेतला तेव्हा मुलगी अधिरा अगदी लहान होती. भाऊ -बहीण आणि सासूबाईंनी या निर्णयाला पाठिंबा दिला तरी हा निर्णय खरंच विचारपूर्वक घेतला आहेस ना, असं त्यांनी काळजीपोटी अनेकदा विचारलं. अमृता या निर्णयावर ठामच होती. या संधीचं आव्हान तिनं स्वीकारलं होतं आणि आल्या परिस्थितीला तोंड द्यायची तिची तयारी होती. आम्ही दुसऱ्या पर्यायांचा विचार करून ठेवलेला होता, पण सुदैवाने ती वेळच आली नाही. इथे येऊन चार महिने झाले, मात्र त्या दोघींचा व्हिसा मिळायला विलंब लागला. तो सुरुवातीचा काळ थोडा कठीण गेला. नोकरी मिळणं सोपं नव्हतं. आर्थिकदृष्टय़ा किंचित ओढाताण होत होती. कधीकधी परत जावं, असा विचारही मनात यायचा. त्या दोघी इथे आल्यावर थोडंसं स्थिरावलो. सासूबाईंना वर्षभराचा व्हिसा मिळून त्या आल्याने लेकीची चिंता मिटली. त्यानंतर त्यांना दोन वर्षांचा व्हिसा रिन्यू करून मिळाला आहे.

आम्हाला आठवडय़ाला काही ना काही असाइन्मेंट द्यायची असते. त्यासाठी प्राध्यापकांशी चर्चा करता येते. त्यांचं मार्गदर्शन मिळू शकतं. कोणताही मजकूर कॉपी करून लिहू शकत नाही. अगदी आवश्यकतेनुसार तसं केल्यास तो संदर्भ द्यावाच लागतो. कॉपी शोधणारी अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित असते. स्वअभ्यास आणि प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. केवळ घोकंपट्टीवर भर न देता संकल्पना समजल्या आहेत का, हे तपासलं जातं. पुन्हा नव्याने शिक्षणाचा श्रीगणेशा करायला खूपच अवघड गेलं. आयटी क्षेत्रात लिखापढी नसतेच. उलट इथली परीक्षा लेखी आहे. परीक्षेतली १०० गुणांची प्रश्नपत्रिका सोडवू शकेन का, याविषयी साशंक होतो. आमच्या असाइन्मेंट कॉम्प्युटराइज्ड आहेत. पण लिखाणाची सवय होण्याच्या दृष्टीने मी त्या वहीत लिहायचो. कधीकधी शब्दांची स्पेलिंग आठवायची नाहीत चटकन. त्यामुळे आत्मविश्वास किंचितसा डगमगायचा. मात्र नेटानं सराव करत राहिलो, लिहिणं जमायला लागलं आणि पहिली प्रश्नपत्रिका सोडवल्यावर आपण लिहू शकतो, हा आत्मविश्वास आला. नंतरच्या लिहिण्यात सहजता आली.

पहिल्याच सेमिस्टरच्या एका असाइन्मेंटमध्ये टास्मानियामधली स्थानिक कंपनी शोधून त्यांच्या उद्योगाबद्दल मालक आणि अन्य घटकांशी बोलून संशोधन करायचं होतं. त्या विषयाचं नाव होतं ई लॉजिस्टिक. त्यात लॉजिस्टिक्स आणि आयटीची सांगड घालायची होती. आयटीमुळे त्यांच्या उद्योगात कशी भरभराट होईल, ते दाखवायचं होतं. ही असाइन्मेंट काहीजणांना जराशी कठीण गेली. मात्र मला कामाचा अनुभव गाठीशी असल्याचा फायदा झाला आणि ९० गुण मिळाले. प्राध्यापकांनी कौतुक केलं. त्यांच्याशी मी अजूनही संपर्कात आहे. सध्या ‘ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी’ या विषयाचा बराच बोलबाला होतो आहे. ती अजून खूपच विकसित व्हायची आहे. पहिलं वर्ष पूर्ण झाल्यावर मी संशोधन करण्याच्या उद्देशाने सुपरवाइजरना भेटत होतो. तेव्हा डॉ. सौरभ गर्ग या सुपरवाइजरनी माझ्या अनुभवाबद्दल विचारणा करून ‘या तंत्रज्ञानाच्या संदर्भात तू संशोधन करू शकतोस का?’, अशी विचारणा केली. याआधीही मी तंत्रज्ञानाचा चांगला वापर करून काम केलेलं आहे. त्यामुळे मी या विषयाच्या संशोधनाला सुरुवात के ली. सध्या पैशांचे व्यवहार बँकांवर, घरांचे व्यवहार दलालावर किंवा विद्युत वितरण हे विद्युत कंपनीवर अवलंबून असतात. म्हणजे हे व्यवहार कुठल्याही एका संस्थेवर किंवा व्यक्तीवर अवलंबून असतात. मात्र ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञाना’मुळे हेच व्यवहार किंवा देवाणघेवाण अवलंबित नियंत्रणाखेरीज, पारदर्शकपणे आणि त्यात अन्य कुणाला बदल करणं शक्य नाही अशा पद्धतीने करता येणार आहेत. या डिजिटल व्यवहारांत कागदपत्रांचा वापर टाळता येणं शक्य होईल. मात्र हे तंत्रज्ञान अद्याप फारच बाल्यावस्थेत असून त्याची कार्यक्षमता सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जागी वापरता येऊ शकते का, या विषयावर डॉ. सौरभ गर्ग यांनी ‘युनिव्हर्सिटी ऑफ टास्मानिया’मध्ये संशोधन सुरू केलं आहे. संशोधनाचे बरेच टप्पे पार करून हे तंत्रज्ञान विकसित करायचं आहे. डॉ. गर्ग यांनी आयआयटी दिल्लीमधून मास्टर्स केल्यानंतर ‘मेलबर्न युनिव्हर्सिटी’मध्ये तीन वर्षांहून कमी कालावधीत पीएचडी मिळवली आहे. त्यांच्या नावावर तीसहून अधिक संशोधनाचे पेपर्स आहेत.

आमचे सगळेच प्राध्यापक त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. ठरावीक चौकटीच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांना अपडेट करण्यावर त्यांचा भर असतो. तंत्रज्ञानातल्या नवीन गोष्टी लॅबमध्ये लगेच अपग्रेड केल्या जातात. प्राध्यापक स्थानिक आणि दक्षिण कोरिया, भारत, रशिया आदी देशांतील आहेत. त्यांच्याशी संवाद साधून बरीच माहिती मिळते. माझ्या सहसंशोधकांमध्ये भारतीय, दक्षिण कोरिया, पाकिस्तान, बांगलादेश, इराण या देशांतील आहेत. एकमेकांशी गप्पा मारताना पूर्वग्रह दूर होतात. प्राध्यापक आणि विद्यार्थी खेळीमेळीने राहतात. इथे अनेक इव्हेंट्स सतत होत असतात. कधी सांस्कृतिक कार्यक्रमही होतात. मी अभ्यास आणि कामातून सवड काढून आवर्जून विद्यापीठातल्या काही इव्हेंट्सना हजेरी लावतो.

इथल्या इंडस्ट्रीत नोकरी मिळवण्यासाठी अनुभव महत्त्वाचा गणला जातो. तो माझ्या गाठीशी असल्याने इथे तुलनेने दुर्मीळ मानला जाणारा जॉब कॉल मला आला होता. विद्यार्थ्यांनी वीस तास काम के ल्यानंतर चांगला पगार मिळतो. ‘हायड्रो टास्मानिया’ या कंपनीत मी आयटी विभागात सिक्युरिटी अ‍ॅडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करतो आहे. या अनुभवाच्या जोरावर पुढे इंडस्ट्रीत नोकरी मिळवणं सोपं जाईल. सुरुवातीला अभ्यास आणि काम या दोन्ही आघाडय़ांवर लढणं थोडंसं कठीण गेलं; विशेषत: वेळेच्या बाबतीत. मग डॉ. गर्ग यांनी कामाचं नियोजन करायला शिकवलं. त्यांना आठवडय़ातून एकदा भेटून संशोधनातले अपडेट त्यांना देतो. कं पनीतही माझ्या शिक्षणाची कल्पना असल्याने तिथेही चांगला पाठिंबा मिळतो आहे. सुरुवातीला थोडी भीती वाटायची. लेक्चर सुरू व्हायची वेळ आणि ऑफिसमध्ये निघायचं हे विचारायचीही.. मात्र कंपनीच्या वरिष्ठांनी वेळेत काम पूर्ण करून जायची परवानगी दिली. अमृताला फुलटाइम राइट्स असल्याने कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करता येणार होता. तिला सुरुवातीला छोटे जॉब करायला लागले. आता ती विशेष लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थेत त्यांना मोटिव्हेट करण्याचं काम करते आहे. हे नवीन आव्हान तिने मनापासून स्वीकारलं आहे. इथे येताना विद्यार्थ्यांनी रेफरन्सेस मिळवायला हवेत. विविध कारणांनी भेटीगाठी होणाऱ्या ऑस्ट्रेलियातील लोकांशी मैत्री करून त्यांच्या परवानगीने भाडय़ाची जागा-नोकरी मिळवण्यासाठी त्यांचा रेफरन्स देता येतो. ते तुलनेने सोपं जातं. शिवाय होबार्टमध्ये भाडय़ाने घर मिळणं ही मोठी अवघड गोष्ट आहे. त्यातही कुटुंबासाठी घर मिळणं ही आणखीन अवघड गोष्ट असते. मी घराच्या शोधात असताना एका ऑस्ट्रेलियन घरमालकिणीशी ओळख झाली. तिने आमच्यावर विश्वास दाखवल्याने आम्हाला घर मिळालं. आता तिच्याच दुसऱ्या घरी राहतो आहोत.

इथे आल्यावर माझा आत्मविश्वास अधिक वाढला. प्रोफेशनल प्रेझेंटेशनमधली क्रिएटिव्हिटी वाढली. कटाक्षाने वेळेचं व्यवस्थापन करायला शिकलो. भारतातले कुटुंबीय, मित्रपरिवार आणि त्यांच्या भेटीगाठी मिस करतो. अर्थात इथेही काही मित्रमैत्रिणी जोडले गेले आहेत. विशेष म्हणजे बरेच चिनी मित्रही झाले आहेत. त्यांच्याशी सांस्कृतिक गप्पाटप्पा होतात. जेवणखाणच्या वेळी मी पूर्ण शाकाहारी असल्याचं भान ते अगदी अगत्याने ठेवतात. इथे पंजाबी लोक बरेच आहेत. या दोन वर्षांत सुरू झालेल्या मंदिर आणि गुरुद्वारामध्ये गेल्यावर अनेक लोक भेटतात, ओळखी होतात. त्यांची ख्यालीखुशाली बिनधास्तपणे विचारायची क्षमता अंगी आली आहे. मला ड्रायव्हिंगची आवड आहे. त्यावरून आठवलं की, आम्ही भारतातले मित्र पहिल्या पावसात दरवर्षी गाडी काढून पिकनिकला जातोच. गेली दोन र्वष ते मिस झालं. आत्ताच्या पावसाळ्यात मित्र जमले, पिकनिकला गेले आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून का होईना मी त्यांच्यात सहभागी होऊ  शकलो. हा क्षण कायमच आठवणीत राहील. सध्या माझी चौथी सेमिस्टर सुरू आहे. हा अभ्यासक्रम संपल्यावर नोकरी करणार आहे. व्हिसाची मुदत वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करून पीआरसाठी (पर्मनंट रेसिडन्सी) अर्ज करणार आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये पीएचडीसाठीही अर्ज करायचा विचार सुरू आहे. शिक्षण आणि संधी या गोष्टींना वयाची अट नाही. ज्ञान कमवाल तितकं ते वाढतच जातं. फक्त त्यासाठी ‘मे आय कम इन?’, हा संवाद ध्यानात ठेवा. ऑल द बेस्ट.

कानमंत्र

  • इथे आल्यावर लगेचच मिळकत कमावता येईल असं नाही. त्यामुळे आर्थिक आघाडीसाठी थोडी अधिकची तरतूद करून ठेवा.
  • स्वावलंबी व्हा. एकटं राहण्याची मानसिक आणि व्यावहारिक तयारी करायलाच हवी.

 

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com