विनय जोशी

जसजसे नवीन शोध लागत जातात, या विश्वाविषयी आपल्या ज्ञानात नवीन भर पडत जाते. कधी आधी खरे वाटलेले निष्कर्ष चूक ठरतात आणि  नवे सिद्धांत  मांडले जातात. साध्या डोळय़ांनी दिसणाऱ्या पाच ग्रहांमुळे इतकीच आपली सूर्यमाला असे शतकानुशतके वाटत असताना १८व्या शतकात युरेनस आणि नेपच्यूनचा शोध लागला. नेपच्यूनच्या कक्षेत आढळलेल्या अनियमिततेमुळे त्याच्या पुढे देखील एखादा ग्रह असावा असे अनुमान लावले गेले. २०व्या शतकाच्या सुरुवातीस नवव्या संभाव्य ग्रहाच्या शोधासाठी जगभर निरीक्षणे सुरू झाली. महाराष्ट्रातील  खगोलनिरीक्षक  व्यंकटेश  बापूजी केतकर यांनी १९११ मध्ये  नेपच्यून पलीकडे  २४२  वर्ष परिभ्रमण काळ असणारा ब्रह्मा आणि त्यापुढे विष्णू नावाचा असे दोन ग्रह असावेत असा दावा केला होता. अमेरिकन  खगोलशास्त्रज्ञ पर्सिव्हाल लॉवेल यांनी  अ‍ॅरिझोना येथे लॉवेल वेधशाळा स्थापन करून नववा ग्रह शोधण्याची मोहीम हाती घेतली. संभाव्य नवव्या ग्रहाला त्यांनी  प्लॅनेट एक्स असे नाव देऊनदेखील टाकले, पण हा ग्रह सापडला त्यांच्या  मृत्यूनंतर १४ वर्षांनी. १८ फेब्रुवारी १९३० ला लॉवेल वेधशाळेतील त्यांचा  साहाय्यक क्लाइड टॉमबॉगला एका छायाचित्रात मिथुन तारकासमूहात एक ठिपका आढळला. तोच हा नववा ग्रह- प्लुटो.

Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…

प्लुटोचा नववा ग्रह म्हणून मिरवण्याचा मान  फक्त ७६ वर्षे  टिकला. चंद्रापेक्षाही लहान आकार, अतिदीर्घ लंबवर्तुळाकार कक्षा यामुळे याला ग्रह म्हणावे की नाही याविषयी वाद सुरू होतेच. अशातच २००६  मध्ये मायकल ब्राऊन यांना प्लुटोपेक्षा २५ टक्के मोठा असलेला अजून एक ग्रहसदृश गोळा  सापडला, ज्याला एरिस असे नाव दिले गेले. आणि मग प्लुटोच्या पलीकडे क्यूपरच्या पट्टय़ात एकापाठोपाठ एक असे काही लहान ग्रह शोधले गेल्यानंतर ‘ग्रह’ या व्याख्येची व्याप्ती तपासण्याची वेळ आली. २००७ च्या आंतरराष्ट्रीय खगोल महासंघाच्या प्राग येथे भरलेल्या अधिवेशनात यावर चर्चा झाली. ग्रहाने सूर्याभोवती फिरावे, त्याला पुरेसे वस्तुमान आणि त्यामुळे आपसूकच येणारा गोलाकार आकार असावा याच बरोबर आपल्या कक्षेत येणाऱ्या उल्का, धूळ अशा वस्तूंचा ‘कचरा’ साफ करण्याएवढे गुरुत्वाकर्षण त्याला असावे असे ग्रह असण्याचे निकष ठरवले गेले. प्लुटो तिसऱ्या निकषावर बाद झाला. प्लुटोसारख्याच अशा  ग्रहसदृश गोळय़ांसाठी  ‘बटुग्रह’ (ऊ६ं१ऋ स्र्’ंल्ली३) ही नवी वर्गवारी ठरवली गेली. सेरेस, प्लुटो, हाउमीया, मेकमेक, एरिस हे पाच प्रमुख  बटुग्रह मानले गेले आहेत.

नेपच्यूनच्या कक्षेपासून पुढे सूर्यापासून सुमारे ३० खगोलशास्त्रीय एकक (अ. व.) ते ५० खगोलशास्त्रीय एकक यामध्ये  लघुग्रहांच्या पट्टय़ासारखा, पण प्रचंड मोठा पट्टा आपल्या सौरमालेभोवती पसरला आहे. याला कायपर पट्टा (ङ४्रस्र्ी१ ुी’३) म्हणून ओळखले जाते. सेरेस सोडून इतर बटुग्रह या पट्टय़ात आहेत. एरिस हा सर्वात मोठा बटुग्रह असून त्याला गॅब्रिएल  नावाचा उपग्रह आहे. मंगळ आणि गुरू यांच्यामध्ये असणाऱ्या सेरेसचा शोध १८०१ मध्ये ग्युसेप्पी पियाझ्झीयांना  लागला होता. आधी लघुग्रह मानला गेलेल्या सेरेसला पुढे बटुग्रहाचा दर्जा मिळाला. नेपच्युनच्या अलीकडे असणारा हा एकमेव बटुग्रह. बटुग्रहांपैकी प्लुटो आणि  सेरेस यांच्यासाठी अंतराळ मोहिमा पार पडल्या आहेत.

आधी ग्रह मानला गेलेला प्लुटो आता  दुसऱ्या क्रमांकाचा बटुग्रह ठरला आहे. प्लुटो खरं तर आपल्या चंद्रापेक्षा लहान आहे. पृथ्वी-सूर्य यांच्यातील अंतर म्हणजे एक खगोलीय एकक. प्लुटो सूर्यापासून सरासरी ३९ खगोलीय एकके दूर आहे. त्यामुळे याला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला तब्बल २४८ वर्षे लागतात. त्याला शेरॉन हा मोठय़ा आकारमानाचा आणि  स्टायक्स, निक्स, कर्बेरोस आणि हायड्रा हे छोटय़ा आकारमानाचे उपग्रह आहेत.

प्लुटोच्या अभ्यासासाठी नासाने न्यू होरायझन्स  मोहीम हाती घेतली. १९ जानेवारी २००६ रोजी केप कॅनाव्हेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून अ‍ॅटलस व्ही रॉकेटच्या साहाय्याने  न्यू होरायझन्स प्रक्षेपित करण्यात आले. २००७  मध्ये गुरू ग्रहाला भेट देऊन त्याने त्याचे निरीक्षण नोंदवले. गुरूच्या  गुरुत्वाकर्षणाची मदत घेत यानाची गती वाढवून ते प्लुटोकडे झेपावले. त्यापुढील प्रवासात यान  हायबरनेशन मोडमध्ये होते. डिसेंबर २०१४ मध्ये ते पुन्हा सक्रिय झाले. जानेवारी २०१५ मध्ये यानाने प्लुटोकडे जाण्याचा टप्पा सुरू केला. १४ जुलै २०१५ रोजी अंतराळ यानाने प्लुटोच्या सर्वात जवळचा पल्ला गाठला. यावेळी ते प्लुटोच्या पृष्ठभागापासून  १२,५०० किलोमीटर अंतरावरून   गेले.

न्यू होरायझन्सने प्लुटोवरील विस्तृत पर्वतरांगा शोधल्या. यातील दोन पर्वतांना सर्वप्रथम माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनिझग नोर्गे यांच्या स्मरणार्थ नोर्गे मॉन्टेस आणि हिलरी मॉन्टेस असे नाव देण्यात आले आहे. न्यू होरायझन्सने प्लुटोच्या पृष्ठभागावर सुमारे १५९० किमी विस्तृत, हृदयाच्या आकाराचा मोठा भूभाग पहिला. याला प्लुटोला शोधणाऱ्या  क्लाइड टॉमबॉगचे नाव देण्यात आले. ‘प्लुटोचे हृदय’ म्हणून टॉमबॉग रेजिओचे न्यू होरायझन्सने टिपलेले सर्वात प्रेक्षणीय  दृश्य ठरले. हा भूभाग  गोठलेल्या नायट्रोजन, मिथेन आणि कार्बन मोनॉक्साईडच्या  बनलेल्या  स्पुतनिक प्लानिटिया या  प्रदेशाचा भाग आहे. याशिवाय, न्यू होरायझन्सने  प्लुटोच्या विषुववृत्ताजवळ बेल्टन रेजिओ हा लांबलचक गडद प्रदेश दाखवला. या प्रदेशाचा गडद रंग इथल्या  थॉलिन नावाच्या जटिल हायड्रोकार्बनमुळे निर्माण झाला आहे. मिथेन बर्फापासून बनवलेल्या अरुंद, दातेरी कडय़ांची  ब्लेडेड टेरेन ही  न्यू होरायझन्सने शोधलेली  अजून एक वैशिष्टपूर्ण रचना आहे. यावरून प्लुटोच्या पृष्ठभागावर अजूनही भौगालिक हालचाली सुरू असाव्यात असा अंदाज बांधता येतो.

न्यू होरायझन्सने प्लुटोच्या वातावरणाविषयी  देखील अनेक महत्त्वाचे शोध लावले. त्याने प्लुटोभोवती  असणाऱ्या नायट्रोजनच्या विरळ वातावरणाच्या उपस्थितीची खात्री केली. वातावरणात मिथेनचे प्रमाण ०.२५ टक्के असल्याचे त्याने मोजले. प्लुटोच्या वातावरणाचा दाब पृथ्वीच्या वातावरणाच्या दाबापेक्षा सुमारे १,००,००० पट कमी असल्याचे कळले. न्यू होरायझन्सने प्लुटोच्या वातावरणात धुक्याच्या  अनेक थरांची रचना नोंदवली. तसेच त्याने  वातावरणातील वायूंची गळती होत तयार झालेली ‘प्लाझ्मा टेल’देखील टिपली.

न्यू होरायझन्सने प्लुटोच्या सगळय़ात मोठय़ा उपग्रह शेरॉनचेदेखील निरीक्षण केले. त्याने  शेरॉनपासून २७,००० किमी अंतरावरून झेपावत त्याच्या पृष्ठभागाच्या प्रतिमा टिपल्या. त्याच्या पृष्ठभागावर प्राचीन आणि अलीकडील अशा दोन्ही प्रकारच्या भौगोलिक घडामोडींचे  मिश्रण दिसून आले. त्याच्या उत्तर ध्रुवीय प्रदेशात ‘मॉडरेर’ नावाच्या अतिशय मोठय़ा गडद भागाचे चित्रण केले. प्लुटोच्या वातावरणातील निसटलेल्या वायूंचा इथे साठा होऊन हा भाग बनला असावा असा अंदाज आहे. शेरॉनबरोबरच यानाने प्लुटो प्रणालीतील स्टायक्स, निक्स, कर्बेरोस आणि हायड्रा या  लहान उपग्रहांच्या  वैशिष्टय़ांचे निरीक्षण केले. प्लुटो आणि शेरॉनवर आढळलेल्या गडद रंगाप्रमाणेच या उपग्रहावर देखील गडद रंगांचे प्रदेश आढळले.

प्लुटो निरीक्षणाचे निर्धारित उद्दिष्ट पार पडल्यावर पुढे जात २०१९ मध्ये न्यू होरायझन्सने कायपर पट्टय़ातील अरोकोथ या  नेपच्युनोत्तर घटकाला ( ट्रान्स-नेपच्युनियन ऑब्जेक्ट) भेट दिली. यानंतर सूर्यापासून दूर जात ते २०२१ मध्ये सूर्यापासून ५० खगोलीय एकक अंतरावर पोहचले. आणि यापुढे देखील त्याचा प्रवास  सुरू आहे.

सेरेसच्या अभ्यासासाठी डॉन (ऊं६ल्ल) मोहीम पार पडली. न्यू होरायझन्स प्लुटोजवळ पोहोचण्याच्या काही महिन्यांआधी  सेरेस येथे पोहोचणारे डॉन हे बटुग्रहाचा अभ्यास करणारे पहिले मिशन ठरले. २७ सप्टेंबर २००७ ला या मोहिमेचे  प्रक्षेपण झाले. २०११ मध्ये लघुग्रह पट्टय़ातील ‘४ व्हेस्टा’ या लघुग्रहाजवळ  पोहचून  डॉनने निरीक्षण नोंदवले. डॉन ६ मार्च २०१५ रोजी सेरेस कक्षेत  दाखल झाले. त्याने  सुरुवातीला सेरेसभोवती ध्रुवीय कक्षेत प्रवेश केला. नंतर कक्षेत अनेकदा बदल करत सेरेसच्या संपूर्ण पृष्ठभागाचे मापन केले आणि  पूर्ण स्थलाकृतिक नकाशा बनवला. त्याला सेरेसच्या पृष्ठभागावर अनेक चमकदार ठिपके आढळले. ओकाटो नावाच्या विवरामध्ये सर्वात तेजस्वी आणि सर्वात ठळक ठिपक्यांची मालिका सापडली. सोडियम काबरेनेटच्या निक्षेपणातून अशा ठिपक्यांची निर्मिती होत असावी. सेरेसवर पूर्वी पृथ्वीच्या तप्त ज्वालामुखी उद्रेकाप्रमाणेच बर्फ, पाणी यांचे  उद्रेक करणारे  क्रायोव्होल्कॅनो असावेत. अशा शीतउद्रेकातून पृष्ठभागावर आलेल्या द्रवाच्या बाष्पीभवनातून अशा क्षारांचे साठे जमा झाले असावेत असा शास्त्रज्ञांचा  अंदाज आहे.

पृथ्वीवरील निरीक्षणातून त्याच्या पृष्ठभागाखाली मोठय़ा प्रमाणात पाण्याचा बर्फ असल्याचा अंदाज वर्तवला गेला होता. या मोहिमेत त्याची खात्री झाली. डॉनमध्ये मॅग्नेटोमीटर नसल्याने  सेरेसला स्वत:चे  चुंबकीय क्षेत्र आहे की नाही याविषयी कळू शकले नाही, पण डॉनने सेरेसच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राचे अचूक मोजमाप केले. नोव्हेंबर २०१८ मध्ये  यानाचे इंधन संपल्याने डॉन मोहिमेचा अधिकृतपणे समारोप झाला. अंतराळयान सेरेसवर कोसळवण्याऐवजी सेरेसच्या कक्षेत निष्क्रिय होऊन फिरत  ठेवले गेले. सेरेस हा लघुग्रह पट्टय़ात तसा विजोड घटक ठरतो. लघुग्रह पट्टय़ाच्या वस्तुमानाचा एक तृतीयांश भाग त्यानेच व्यापला आहे. डॉनला सेरेसवर अमोनियाच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले. सौरमालेत कायपर पटय़ात अमोनियाचे मुबलक प्रमाण आढळते. यामुळे सेरेसची उत्पत्ती इतर बटुग्रहांप्रमाणे कायपर पट्टय़ात झाली असावी आणि नंतर काही कारणाने तो लघुग्रहांच्या पट्टय़ात दाखल झाला असावा असे काही शास्त्रज्ञांना वाटू लागले आहे. बटुग्रहांच्या  भविष्यातील मोहिमा कदाचित हे कोडे सोडवू शकतील. पण सध्या तरी ‘न्यू होरायझन्स’ आणि ‘डॉन’  मोहिमा  बटुग्रहांच्या माहितीविषयी आपल्या क्षितिजावर नवी पहाट ठरल्या आहेत यात शंका नाही !

viva@expressindia.com