दहावी-बारावी परीक्षांमध्ये गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्याची तंबी जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांनी दिली.
राज्य परीक्षा मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये बारावी व दहावीची परीक्षा अनुक्रमे २० फेब्रुवारी व ३ मार्चपासून सुरू होणार आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बठक झाली. बठकीत प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे निर्देश त्यांनी दिले. ज्या विषयाचा पेपर असेल, अशा विषय शिक्षकांनी परीक्षा केंद्र व परिसरात प्रवेश करू नये. असे विषय शिक्षक आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. परीक्षा केंद्रावर कोणी परीक्षार्थी गरमार्गाच्या अवलंब करताना आढळून आल्यास संबंधित पर्यवेक्षक व केंद्र संचालक यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल. सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात पोलीस अधिनियम ३७ (१) (३) लागू करण्याबाबत सिंह यांनी आदेश दिले.
परीक्षा चालू असताना केंद्रांच्या परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात यावेत. झेरॉक्स मशीन चालू आढळल्यास कारवाई केली जाईल. केंद्र संचालकांनी परीक्षार्थींची बठक व्यवस्था एक डेस्कवर एक परीक्षार्थी अशी करावी. खाली जमिनीवर परीक्षार्थीना बसवू नये. परीक्षा केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दिले जावे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्ण वेळ बठे व भरारी पथक नियुक्त असेल. प्रत्येक तासाला पथक भेट देणार आहे. गरमार्ग आढळल्यास कारवाई करण्यात येईल. सर्व परीक्षा केंद्रांवर बंदोबस्त तैनाती असेल.
परीक्षार्थीनी कॉपीमुक्त व तणावमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिंह यांनी केले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक प्रणय, शिक्षणाधिकारी आर. बी. गिरी, अशोक आठवले आदी उपस्थित होते.