आरोग्य विद्यापीठाच्या चर्चासत्रातील सूर
सिंहस्थासाठी सर्वच स्तरांवरून नियोजन सुरू झाले असले तरी ते सर्व विभागांच्या समन्वयाने होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व प्रमुख विभागांच्या प्रतिनिधींचे एक सर्वसमावेशक कृतिदल आवश्यक असल्याचा सूर येथे महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठाच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळ्यातील आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडय़ासंदर्भात आयोजित चर्चासत्रातून व्यक्त झाला.
सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून पोलीस, होमगार्ड, अग्निशमन दर, पाणीपुरवठा, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य इत्यादी सर्व विभाग कार्यरत आहेत. परंतु सुयोग्य व्यवस्थापन व काटेकोर नियोजनासाठी सर्वच विभागांचा समावेश असणारे कृतिदल आवश्यक आहे. या कृतिदलाच्या माध्यमातून वेळोवेळी बैठका घेण्यात याव्यात, असा विचार या वेळी मांडण्यात आला. या दलात सर्वच महत्त्वाच्या संस्था व विभागांना प्रतिनिधित्व द्यावे, दलातील सदस्यांचा अलाहाबादला होणाऱ्या कुंभमेळ्यात अभ्यास दौरा आयोजित करावा तसेच सातत्याने बैठकांचे आयोजन करावे, असे विचार बैठकीत मांडण्यात आले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठय़ा प्रमाणावर लोक एकत्र आल्यानंतर कशा प्रकारे गर्दीचे नियोजन करण्यात येते, याबाबतची माहिती घेण्यात आली. याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे परदेशातील तज्ज्ञांशी संपर्क साधण्यात आला. उपस्थितांनी आपल्या शंका व स्थानिक परिस्थितीमध्ये उद्भवणाऱ्या समस्यांच्या बाबतीत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून माहिती घेतली.
सुबद्ध नियोजन केल्यास दुर्घटना टाळता येणे शक्य असल्याचे मत अ‍ॅड. ढिकले यांनी मांडले. कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर यांनी आगामी कुंभमेळा तसेच निर्माण होणाऱ्या आपत्तींना प्रगत तंत्रज्ञान व प्रशिक्षणाद्वारे योग्यरीतीने सामोरे जाणे शक्य असल्याचे सांगितले. विद्यापीठातर्फे आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून पोलिसांना दिलेले प्रशिक्षण उपयोगी पडणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचा गतअनुभव बघता रस्त्यांचे नियोजन, शाही मार्गाचे रुंदीकरण, रामकुंडाचे विस्तारीकरण, साधूग्रामचे विस्तारीकरण, शाही स्नानाच्या दिवशीचे नियोजन, हे सर्व योग्य पद्धतीने होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सिंहस्थाच्या सुनियोजित व्यवस्थापनासाठी सिंहस्थ कुंभमेळा भरत असलेल्या हरिद्वार येथे पोलिसांचे एक पथक पाठविण्यात आले होते. तसेच अलाहाबाद येथेही पोलिसांचे पथक जाणार असून तेथील नियोजनाचा अभ्यास करणार असल्याचे पोलीस आयुक्त सरंगल यांनी सांगितले. मुंबईच्या टाटा सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेंटचे तज्ज्ञ डॉ. नभोजित रॉय यांनी बैठकीचे समन्वयन केले. बैठकीत आ. ढिकले, कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते.