13 July 2020

News Flash

बसपाचे ‘सोशल इंजिनियरिंग’ यंदाही ‘फेल’

गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी संपूर्ण देशात गाजावाजा झालेल्या बसपाच्या ‘सोशल इंजिनिअरिंग’ प्रयोग यावर्षी विदर्भात मात्र ‘फेल’ झाला.

| May 23, 2014 07:44 am

गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी संपूर्ण देशात गाजावाजा झालेल्या बसपाच्या ‘सोशल इंजिनिअरिंग’ प्रयोग यावर्षी विदर्भात मात्र ‘फेल’ झाला. विदर्भातील दहाही जागांवर विविध जाती, धर्माला प्रतिनिधित्व देऊन बसपाने निवडणुकीपूर्वी चुरस निर्माण केली. मात्र, निकालात कुठेही त्यांची शक्ती वाढलेली दिसली नाही. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत विदर्भात बसपामुळे मतविभाजनाचा फटका काँग्रेसला बसला असताना यावेळी त्याची पुनरावृत्ती झाली नसून दहाही जागा जिंकून महायुतीने विदर्भावर वर्चस्व सिद्ध केले. बसपाच्या एकाही उमेदवाराला १ लाखाचा पल्ला गाठता आला नाही.
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचे ‘सोशल इंजिनियरिंग’चा प्रयोग करून विविध जाती, धर्मातील लोकांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांना यश आले होते. यावेळी पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी तो प्रयोग करून बघितला. मात्र, देशभरात असलेली नरेंद्र मोदीची लाट आणि काँग्रेस विरोधातील वातावरणामुळे बसपाचा देशभरात सफाया झाला. एकेकाळी काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना बसपामुळे झालेल्या मतविभाजनाचा फटका बसला. त्यामुळे यावेळी बसपाच्या उमेदवारांकडे सर्वाचेच लक्ष लागले होते. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये बसपाच्या ‘सोशल इंजिनिअरिंग’च्या प्रयोगाला उत्तर प्रदेशमध्ये मिळालेल्या यशानंतर तो याही निवडणुकीत महाराष्ट्रातही लागू करण्यात आला. मात्र, यावेळी त्यांच्या पदरी निराशा आली.
बसपाने विदर्भातील दहाही जागांवर उमेदवार उभे करताना हा प्रयोग केला. प्रथम भाजप, काँग्रेसमधील नाराज नेते मिळतात काय याची चाचपणी केली पण, त्यात त्यांना विशेष यश आले नाही. असे असले तरी काँग्रेससह विविध राजकीय पक्षाच्या नाराज नेत्यांचे अप्रत्यक्ष पाठबळ बसपा उमेदवारांना मिळाल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, रामटेक या पूर्व विदर्भातील लोकसभा मतदारसंघात बसपाचे उमेदवार निर्णायक स्थितीत होते. बसपाचे सोशल इंजिनिअिरग आणि नाराज काँग्रेस नेत्यांच्या पाठिंब्यामुळे हे उमेदवार काँग्रेसच्या पारंपारिक मताला छेद देत २००४ची पुनरावृत्ती होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात निकालानंतर हे चित्र कुठेही दिसले नाही. बसपाच्या उमेदवारांनी विदर्भातील विविध जिल्ह्य़ात तिसरे स्थान टिकविले असले तरी त्यांचे मताधिक्य कमी झाले. नागपूर लोकसभा मतदारसंघात उच्चशिक्षित असलेले मोहन गायकवाड तर रामटेकमधून नगरसेवक किरण पाटणकर यांना उमेदवारी दिली. मायावती यांची अमरावतीला झालेल्या सभेतील गर्दीमुळे बसपा निर्णायक स्थितीत राहील, अशी शक्यता होती. तसे वातावरण तयार करण्यात आले होते. मात्र, मतदारांनी त्यांना नाकारले. २००४ व २००९च्या निवडणुकीत बसपामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले होते. मागील निवडणुकीप्रमाणेच बसपाने यावेळी जोरदार शक्ती लावली होती. मात्र, त्यांना अपक्षेप्रमाणे यश मिळाले नाही.
विदर्भातील प्रत्येक जिल्ह्य़ात बहुजन समाज पक्षाची पारंपारिक मते ७० ते ९० हजारच्या घरात आहे. शिवाय जो उमेदवार असेल त्याची ४० ते ५० हजार  मते अशी दीड ते पावणे दोन लाख मते बसपाला मिळतात. यावेळी बसपाला पारंपारिक मते मिळाली मात्र उमेदवारांना मात्र स्वतची मते बसपाकडे खेचता आली नाही. गायकवाड यांना ९६ हजार ४२२ तर किरण पाटणकर यांना ९५ हजार ५१ मते मिळाली. वर्धा लोकसभा मतदारसंघातून चेतन पेंदाम या आदिवासी कार्यकर्त्यांला उमेदवारी दिली. मात्र, त्यांना ९० हजार ८६६ मते मिळाली. गडचिरोलीतील उमेदवार रामराव गोविंदा नन्नावरे ६६ हजार २०९, चंद्रपूमधील हंसराज कुंभारे यांना ४९ हजार २२९ मते मिळाली. या ठिकाणी बसपा चौथ्या स्थानावर गेली. अकोलामध्ये भानुदास कांबळे यांना केवळ ७ हजार ८५८, अमरावतीमध्ये गुणवंतराव देवपारे यांना ९८ हजार २००, यवतमाळमध्ये बळीराम राठोड यांना ४८ हजार तर बुलढाणामध्ये अफीस अ. अजीज यांना ३३ हजार ७८३ मते मिळाली. गायकवाड यांच्यामागे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी शक्ती उभी केली होती. त्यामुळे ते किमान दीड लाख मते घेतील, असा अंदाज भाजपच नव्हे तर काँग्रेसलाही होता.
प्रत्यक्षात उत्तर आणि दक्षिण नागपूर वगळता इतर भागात ‘हत्ती’ चाललाच नाही. रामटेक, वर्धा आणि भंडारा मतदारसंघातही असेच चित्र मतमोजणीनंतर पुढे आले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत विदर्भात ‘हत्ती’ चालेल की थांबेल हे येणारा काळ सांगेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2014 7:44 am

Web Title: bsps social engineering this year also fail
टॅग Bsp,Politics
Next Stories
1 पूर्व विदर्भातील सर्पमित्रांना वन विभागाकडून ओळखपत्रे
2 पत्रकार सहनिवासातील तीन सदनिकांवर दरोडा
3 सरत्या वर्षांत १४०५ कोटी उत्पादनशुल्क प्राप्त
Just Now!
X