डॉकयार्ड रोड येथील महापालिकेची दुरुस्ती आवश्यक असलेली इमारत पडल्याने तब्बल ६१ जणांचा जीव गेला. पण ‘म्हाडा’च्या अखत्यारीतील ‘एस्प्लनेड मॅन्शन’ ही शंभरहून अधिक वर्षांपूर्वीची इमारत अतिधोकादायक यादीत असूनही ती रिकामी झालेली नाही. कारण या इमारतीत तब्बल १३५ गाळय़ांमध्ये नामांकित वकिलांची कार्यालये आहेत. अतिधोकादायक इमारत कधीही पडू शकते, हे स्पष्ट असतानाही शेकडो लोकांचा जीव वेठीस धरून या इमारतीमधील व्यावसायिक आणि निवासी मंडळी इमारत न सोडण्याच्या हट्टावर ठाम आहेत.
‘एस्प्लनेड मॅन्शन’ ही इमारत जिल्हा सत्र न्यायालयाजवळ आहे. यात तब्बल १५० गाळे आहेत. त्यात १५ निवासी तर १३५ व्यावसायिक गाळे असून त्यात वकिलांची कार्यालये आहेत. निवासी गाळय़ांमध्ये सुमारे ६० जण राहतात. तर वकिलांकडे प्रत्येकी दोन-चार जण सहायक म्हणून कामाला असतात. शिवाय या वकिलांकडे अशील आणि इतर भेटायला येणाऱ्या मंडळींचा राबता असतो. ही इमारत शंभर वर्षांपेक्षा जुनी असल्याने ती हेरिटेज यादीतही आहे. या इमारतीचा काही भाग यापूर्वी कोसळला. नंतर ‘म्हाडा’ने वारंवार इमारत रिकामी करण्याची नोटीस बजावली. पण कायदेतज्ज्ञांपुढे नोटीसही फिकी पडली. बरेच कोर्टकज्जे होऊनही या इमारतीचा व्यावसायिक आणि निवासी वापर सुरूच आहे.
या इमारतीच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी सुमारे १७ कोटींचा खर्च येईल, असा प्राथमिक अंदाज असून त्याबाबत ‘म्हाडा’ने गाळेधारकांना पत्रही दिले आहे. या वर्षी पावसाळय़ापूर्वी अतिधोकादायक इमारती प्रसंगी बळाचा वापर करून रिकाम्या करण्यासाठी ‘म्हाडा’ने पुढाकार घेतला. पण या इमारतीमधील कायदेतज्ज्ञांपुढे त्यांची काहीही मात्रा चालली नाही. अखेर जागोजागी लाकडाचे टेकू देण्यात आले आहेत.
त्यानंतर गाळेधारकांनी आता दुरुस्तीचे काम आमच्या आम्ही करून घेऊ, असा अर्ज ‘म्हाडा’कडे सप्टेंबरमध्ये दिला आहे. त्यासाठीचा ‘ना हरकत परवाना’ देण्याची प्रक्रिया आता ‘म्हाडा’ने सुरू केली असून दुरुस्ती सुरू होईपर्यंत ही इमारत तगून राहावी अशी प्रार्थना ही अधिकारी करीत आहेत.