पटसंख्याअभावी निर्णय घेण्याची वेळ
 अनेक गावे मिळून एकत्र शाळा भरविण्याचा प्रस्ताव
उरण तालुक्यात एकूण ६४ पेक्षा अधिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा असून या शाळांतील पटसंख्या घटत असल्याने यापैकी अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पटसंख्या कमी असल्याने पूर्वीप्रमाणेच दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरातील तीन ते चार गावांसाठी एक शाळा पद्धत पुन्हा एकदा सुरू करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे गावोगाव पूर्वजांनी स्वकष्टाने व अंगमेहनतीने उभारलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा ओस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याचा फटका विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांची संख्या कमी होण्यावर होणार आहे.
प्राथमिक शिक्षणासासाठी चार ते पाच किलोमीटरचे अंतर तुडवीत जावे लागत होते. अनेक ठिकाणी दहा गाव मिळून एखादी प्राथमिक शाळा असायची. त्यामुळे शिक्षणाची गंगा गावोगावी पोहचावी, सर्वाना शिक्षण मिळावे याकरिता सुरुवातीला गावातील ज्येष्ठांनी आपापल्या परीने सहकार्य करून तर काहींनी आपल्या जमिनी दान करून भावी पिढीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावागावात प्राथमिक शाळा सुरू केल्या. याच शाळांतून निर्माण झालेल्या भावी पिढीने नंतर गावातील शाळांकडे दुर्लक्ष केल्याने व गावातील पुढाऱ्यांचीच मुले इंग्रजी माध्यम व शहरातील शाळेत जाऊ लागल्याने स्पर्धेत उतरण्यासाठी सर्वसामान्यांनीही आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी तीच वाट धरली.
यामुळे सातवीपर्यंत असलेल्या अनेक शाळा चौथीपर्यंत आल्या. त्यामुळे पटसंख्याही घटली. आता तर या बहुतेक गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून गावातील अत्यंत हलाखीची स्थिती असलेल्या गरिबाशिवाय एकही विद्यार्थी शिक्षण घेत नाही अशी स्थिती आहे. उलट या शाळांतून आता अमराठी विद्यार्थ्यांंची संख्या अधिक असून अनेक गावातील शाळेत तीन ते नऊ विद्यार्थी संख्या असून या विद्यार्थ्यांसाठी दरमहा साठ ते सत्तर हजार रुपये वेतन घेणारे दोन शिक्षक शिकविण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे एका विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर शासन दरमहा पाच ते सहा हजाराचा खर्च करीत असल्याची स्थिती आहे. अशाही स्थितीत काही ग्रामस्थांनी पुढाकार घेत आपल्या गावातील शाळांची पटसंख्या टिकविण्याचा प्रयत्न चालविला असला तरी बहुतांशी शाळांमधील दरवर्षीच्या घटत्या पटसंख्येमुळे गावातील शाळा आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.