राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १००वा दीक्षांत सोहळा म्हणजेच या विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या १०० तुकडय़ा नव्या शिक्षण पद्धतीसह आणि एकात्मता व ज्ञानासह राष्ट्राला समर्पित केल्या आहेत. एकविसाव्या शतकातील जग हे ज्ञानावर आधारित समाजासह विविध संधी उपलब्ध करून देणारे असेल आणि या ज्ञानाकरिता विद्यापीठ हे ऊर्जा पुरविणारे घर म्हणून कार्य करेल, असे प्रतिपादन ‘मिसाईल मॅन’ भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १००वा दीक्षांत सोहळा विद्यापीठाच्या रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण परिसरातील क्रीडांगणावर झाला.
या समारंभात डॉ. कलाम बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. अभय बंग, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय चहांदे, परम संगणकाचे निर्माते डॉ. विजय भटकर, प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे तसेच व्यवस्थापन परिषदेचे आणि विधिसभेचे सदस्य, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते.
‘राष्ट्रीय ध्येय : शाश्वत विकास’ या विषयावर भाष्य करताना त्यांनी विविध मुद्दय़ांना हात घातला. संशोधन-शिक्षण-संशोधन यांच्यातील संबंधाचा उलगडा त्यांनी केला. विचार आणि कृतीमधील उत्कृष्टता हा कोणत्याही ध्येयाचा पाया असतो. त्यामुळे ही उत्कृष्टता काय आहे हे त्यांनी यावेळी सांगितले.  शाश्वत विकासाची साहित्ये आणि संबंधित विषयावर डॉ. कलाम यांनी ज्ञानार्जन केले.
पदवीच्या एका बाजूला तुमचे नाव आणि दुसरी बाजू कोरी आहे. त्या कोऱ्या बाजूवर तुमचे भविष्य लिहायचे आहे, असे आवाहन डॉ. अभय बंग यांनी केले. त्याचवेळी मूल्यहीन पैशासाठी आपले जीवन विकू नका, असा प्रेमळ सल्ला देखील त्यांनी दिला. जेथे प्रश्न नाहीत तेथे जाण्यासाठी सर्वच धडपडतात, पण जेथे प्रश्न आहे, समस्या आहे तेथे जा. आज येथे पदवी आणि पुरस्कार घेणारे अनेक विद्यार्थी विदर्भातील आहेत आणि विदर्भात अनेक समस्या आहेत. या समस्यांमध्ये जीवनाचे प्रयोजन तुमची वाट बघत आहे. त्याचे यात्रेकरु होण्याचा सल्ला डॉ. बंग यांनी विद्यार्थ्यांना दिला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारख्या संतांची आणि सामाजिक व आध्यात्मिक सुधारकांची ही भूमी आहे. त्यांचे नाव या विद्यापीठाला दिले गेले आहे. त्या भूमीत भारतीय तरुणांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ असणारे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे स्वागत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुप कुमार यांनी केले. डॉ. कलाम यांच्या हस्ते यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

पारितोषिक विजेत्यांचा सन्मान
याप्रसंगी पारितोषिक विजेत्यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते सुवर्णपदके, रौप्यपदके आणि पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान महाविद्यालयाची रुपाली चौधरी, न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज वर्धाचा सिद्धार्थ शंभरकर (९ पदके), एस.एफ.एस. कॉलेजची प्रियंका बेरत्रम (१७ पदके), डॉ. आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमीचा आशुतोष आपटे (१५ पदके), जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ लॉ ची खुशबू छाजेड (१५ पदके), औषधी विज्ञानशास्त्र विभागाची धनश्री मुंडे , रामदेवबाबा कमला नेहरू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची विकीता अग्रवाल, जुलेखा कॉलेज ऑफ एज्युकेशनची जयश्री लुलेकर, रामदेवबाबा कमला नेहरू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा मोहित शर्मा (१० पदके), डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स ब्रम्हपुरीचा नरेश मोरे (११ पदके), एलएडी अँड श्रीमती रत्नीदेवी पुरोहित कॉलेज फॉर वुमेनची नेहा मंसाता (९ पदके) यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
यानंतर उर्वरित पारितोषिक विजेत्यांना डॉ. अभय बंग, डॉ. संजय चहांदे यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. राष्ट्रगीताने दीक्षांत सोहळ्याची सांगता झाली.

डॉ. विजय भटकर यांना मानद् पदवी व मानपत्र प्रदान
याप्रसंगी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते डॉ. विजय भटकर यांना मानद् पदवी व मानपत्र प्रदान करण्यात आले. दिवं. डॉ. नय्यर परवीन मोहम्मद हनीफ सिद्दीकी यांच्यावतीने डॉ. सरोश पठाण यांनी ‘वाड्.मय पंडित’ही पदवी स्वीकारली. डॉ. प्रभाकर गद्रे यांना ‘समाजविज्ञान पंडित’ ही पदवी देऊन पुरस्कृत करण्यात आले. यानंतर वाड्.मय विद्याशाखेतील वाड्:मय आचार्य, विज्ञान विद्याशाखेतील विज्ञान आचार्य, विधी विद्याशाखेतील विधी आचार्य, वैद्यक विद्याशाखेतील आयुर्विज्ञान आचार्य, वाणिज्य विद्याशाखेतील वाणिज्य आचार्य, शिक्षण विद्याशाखेतील शिक्षण आचार्य, अभियांत्रिकी व तांत्रिकी विद्याशाखेतील अभियांत्रिकी व तांत्रिकी आचार्य, समाजविज्ञान विद्याशाखेतील समाजविज्ञान आचार्य आणि गृहविज्ञान विद्याशाखेतील गृहविज्ञान आचार्य पदवीकांक्षींना संबंधित विद्याशाखेच्या अधिष्ठातांनी पदवी प्रदान केली.