पदाचा दुरुपयोग केल्याबाबत गंभीर तक्रारी झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पाली भाषा व बुद्धिझम विभागाचे प्रमुख डॉ. भाऊसाहेब कुऱ्हाडे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली. कुऱ्हाडे यांनी पदाचा दुरुपयोग करून विविध गैरप्रकार केल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवल्यानंतर ही कारवाई झाली. एखाद्या विभागप्रमुखावर अशी कारवाई होण्याची विद्यापीठामधील ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जाते.
पीएच.डी. करण्यासाठी आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन विद्यापीठाची दिशाभूल करणे, तसेच स्वत:च्या मुलीचे पेपर स्वत:च काढून ते तपासणे या व अशा काही गंभीर तक्रारी डॉ. कुऱ्हाडे यांच्याविरोधात करण्यात आल्या होत्या. राज्यपाल तथा कुलपतींकडेही तक्रारी करून लक्ष वेधण्यात आले होते. या पाश्र्वभूमीवर विद्यापीठाने डॉ. कुऱ्हाडे यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी प्राथमिक समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालात कुऱ्हाडे दोषी असल्याचे म्हणणे मांडले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने याची गंभीर दखल घेत डॉ. कुऱ्हाडे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई केली. निवृत्त न्यायमूर्ती चावरे, उपकुलसचिव नेटके यांची समिती कुऱ्हाडे यांच्यावरील आरोपांची सखोल चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.