थकबाकीमुळे कंबरडे मोडण्याची वेळ आल्याने थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम सुरू करणाऱ्या महावितरण कंपनीचे
‘खाण्याचे दात वेगळे अन् दाखवायचे वेगळे’ असल्याचे एका कारवाईतून स्पष्ट झाले आहे. मनमाड नगरपालिका हद्दीतील पथदीपांचा वीज पुरवठा कोटय़वधीच्या थकबाकीच्या कारणावरून खंडित करणाऱ्या अधिकाऱ्याला महावितरणने तडकाफडकी निलंबित करण्याचा मार्ग अनुसरला आहे. विशेष म्हणजे, या थकबाकीविरुद्ध आधी कारवाई का करण्यात आली नाही, असे कारण त्याकरिता कंपनीने पुढे केले. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे संतप्त झालेल्या मनमाडकरांनी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ व स्थानिक आमदार पंकज भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले होते. या रोषाचा राजकीय फटका धुरिणांना बसू नये, म्हणून वीज अभियंत्याला ‘बळीचा बकरा’ बनविला गेले की काय, अशी साशंकताही व्यक्त होत आहे.  मनमाड नगरपालिकेची पथदीपांच्या जोडणीची तीन कोटी २० लाख रूपयांची थकबाकी आहे. म्हणजे, गेल्या कित्येक वर्षांपासून नगरपालिकेने वीज बिलाचा भरणा केलेला नाही. गळती, चोरी व वर्षांनुवर्ष थकणारे बील या दृष्टचक्रात सापडलेल्या महावितरणने काही दिवसांपूर्वीच अप्रामाणिक ग्राहकांकडून कंपनीला धक्के बसत असल्याचे अधोरेखीत केले होते. नाशिक परिमंडलात तब्बल एक हजार कोटीची थकबाकी असून या वसुलीसाठी कारवाई करण्याचा इशारा कंपनीने दिला होता. त्यानंतर कंपनीचे परिमंडलातील सर्व पातळीवरील अभियंते वसुलीच्या मोहिमेत कार्यप्रवण होणे साहजिकच होते. त्या अनुषंगाने मनमाड येथील कार्यकारी अभियंता प्र. ना. पौनिकर यांनी दोन जानेवारीला नगरपालिकेची पथदीपांची जोडणी खंडित केली. या कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळनंतर शहरात अंधार पसरला. त्याचा गैरफायदा घेत रात्रीच्या सुमारास बाजारपेठेत १२ घरफोडय़ांचे प्रकार घडले. या घडामोडींचा उद्रेक म्हणून स्थानिकांनी चार तारखेला बंद पाळून तीन तास रास्ता रोको केले. व्यापारी, सर्वपक्षीय कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरीक उत्स्फुर्तपणे रस्त्यावर उतरले. मोर्चा काढून, अधिकाऱ्यांना घेराव घालून बंद पाळण्यात आला. यावेळी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ व आ. पंकज भुजबळ यांच्यावर कठोर टीका करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.
पथदीपांचा वीज पुरवठा खंडित करतानाच महावितरणने नगरपालिकेने किमान २० लाख रूपये द्यावेत, अशी मागणी केली होती. परंतु, नंतर तीन लाख ६२ हजार रूपयांचा धनादेश घेऊन सहाय्यक अभियंत्यांनी पथदीपांचा वीज पुरवठा तूर्त सुरू केला.  या एकंदर प्रकाराशी कार्यकारी अभियंता पौनिकर यांच्या निलंबनाशी जोडला जात आहे. त्यांनी कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याचा ठपका निलंबनाची कारवाई करताना कंपनीने ठेवला आहे. थकबाकी वसुलीसाठी खास मोहीम राबविणारी महावितरण अभियंत्यांनी जोडणी खंडित केल्यास या प्रकारे कारवाई करणार असेल, तर कोणी अभियंता असे धाडस करू शकणार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. निलंबनाच्या कारवाईची माहिती समजल्यानंतर इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही खळबळ उडाली. पथदीपाच्या थकबाकीविरुद्ध आधी कारवाई का केली गेली नाही, असे कारण महावितरणने दाखविले आहे. कंपनीच्या दुहेरी नितीमुळे अभियंते व कर्मचारी बुचकळ्यात पडले आहे.

Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप