News Flash

अभियंता कोणत्याही संकटावर मात करू शकतो -डॉ.भटकर

जगातील प्रत्येक जीवजंतू आयुष्यभर आपापल्या परीने नवनिर्मितीसाठी प्रयत्न करतो. आपला देश आणि त्याची प्रगती करणे आपल्या हातात असून त्यासाठी आज आणि आत्ताच प्रयत्न करायला हवा.

| March 17, 2013 12:53 pm

जगातील प्रत्येक जीवजंतू आयुष्यभर आपापल्या परीने नवनिर्मितीसाठी प्रयत्न करतो. आपला देश आणि त्याची प्रगती करणे आपल्या हातात असून त्यासाठी आज आणि आत्ताच प्रयत्न करायला हवा. ही बाब निश्चितच कठीण नाही. खरा अभियंता हा कोणत्याही संकटावर मात करू शकतो, हे अभियंत्यांनी कधीही विसरू नये, असा उपदेश परम महासंगणकाचे जनक डॉ.विजय भटकर यांनी आज येथे दिला.
स्थानिक जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात एक्सप्लोर-१३ चा उदघाटन सोहळा आज डॉ.भटकर यांच्या हस्ते करण्यता आला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मोहन खेडकर, संस्थेचे सचिव शीतल वातीले, संचालन पवन वातीले,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेंद्र कळसपूरकर, एक्स्प्लोर-१३ चे संयोजक डॉ.प्रदीप जावंधिया, सहसंयोजक प्रा.हेमंत बारडकर, प्रा. विजय नेव्हे, प्रा. महेश नालमवार, आयोजन समिती सचिव प्रा.हेमंत भगत पाटील, सहसचिव डॉ.अमरदीप शेंडे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ.विजय भटकर अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, ज्ञानासारखा मोठा समुद्र कोठेही नाही. ज्या देशात विद्येची देवता सरस्वतीचे पूजन होते व डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्यासारख्या श्रेष्ठ व विद्वान अभियंत्याचे नमन केले जाते तो देश शिक्षणाच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. एक्स्प्लोर-१३ वर बोलतांना ते म्हणाले, एक्स्प्लोर म्हणजे शोध करणे व त्याचा विकास करणे. जगातील प्रत्येक जीवजंतू आयुष्यभर आपापल्या परीने नवनिर्मितीसाठी शोध करत राहतो. लावलेले शोध याकडे लक्ष न देता त्यांनी या गोष्टी घडवून आणण्याकरिता कोणकोणत्या मार्गाचा अवलंब केला, यावर विद्यार्थ्यांंचे लक्ष केंद्रित करायला हवे, हे पटवून देण्यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंद, डॉ. विश्वेश्वरैय्या, वैज्ञानिक फॅरेडे, वैज्ञानिक जगदिशचंद्र बोस यांच्या जीवनशैलीचे महत्व पटवून दिले. आपण ज्या गावात राहतो ते लहान जरी असले तरी आपल्या इच्छा, आकांक्षा आणि ध्येय लहान नसायला हवे. यवतमाळातील अभियंत्याने पुढाकार घेऊन यवतमाळातील टाकाऊ वस्तूंचा ऊर्जा निर्मितीसाठी उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.
अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मोहन खेडकर यांनी आपल्याकडील सर्व चांगल्या गोष्टी समाजाला देण्याचे आवाहन केले. अभियांत्रिकी व्यवसायाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता आपला स्वयंरोजगार सुरू करून इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता भारतातील विद्यार्थ्यांमध्ये आहे व त्यांचा अंगीकार त्यांनी केल्यास तांत्रिक विकासासोबतच देशाचा आर्थिक विकासही होईल, असा आशावादही डॉ. खेडकर यांनी व्यक्त केला. प्राचार्य डॉ. सुरेंद्र कळसपूरकर यांनी याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेत पुढील वर्षी नियोजित एक्स्प्लोर-14 बद्दल मनोगत व्यक्त करुन सहभागी विद्यार्थ्यांंचे कौतुकही केले. एक्स्प्लोर -१३ चे संयोजक डॉ.जावंधिया यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजित विविध स्पर्धाची माहिती दिली . दोन दिवसीय कार्यक्रमात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. देशभरातून सुमारे १५०० विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत. त्यांना आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती आयोजन समिती सचिव प्रा.हेमंत भगत पाटील यांनी दिली. कार्यक्रमासाठी विविध विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच सर्व विद्यार्थी प्रयत्न करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 12:53 pm

Web Title: engineer can dominate on any adversity dr bhatkar
Next Stories
1 ‘काटोल फळ संशोधन केंद्राला १४ कोटी द्या’
2 बहिरमजवळील अपघातात २ ठार
3 उजाड खाण परिसरात वृक्षारोपण करा -क्षत्रीय
Just Now!
X